Showing posts with label (चुकून) वैचारिक. Show all posts
Showing posts with label (चुकून) वैचारिक. Show all posts

Sunday, June 25, 2017

Aal iz well...!!


सलं काय रे ऑस्ट्रियामध्ये स्कीइंग? गेला आठवडा झाला शिफ्टिंग, सामानाचे बॉक्सेस, शाळेची ऍडमिशन, नवीन घरगुती वस्तूंची शॉपिंग आणि दुनियाभरची हमाली करतोय...!!

१ एप्रिल आपला पहिल्यापासूनच आवडता दिवस. वाटेल ते बोला... वाटेल ते लिहा.. पोस्टा.. लोकं काय टेन्शन घेत नायत.. (तसे ते एरवी पण घेत नाहीत.. पण गचांडी पकडायचं टेन्शन रे बावा..) फुकटची लफरी..!!

आपल्या जन्ममासाचा पहिलाच दिवस साला मूर्खदिन... ज्जे बात..!! पोरकटपणा कसा कर्णाच्या कवचकुंडलासारखा जन्मजातच चिकटलेला... मग हा दिवस तर पेशल झालाच पायजेले. दरवर्षी कायतरी निरुपद्रवी रिकामटेकडं पोस्टायचा विडाच उचललाय ना..!! पुन्हा वर्षभर मापात पाप...!!

कामात पेकाट मोडून गेलेलं असताना अचानक हा फोटो समोर आला. एक क्षण वाटून गेलं साला आत्ता हेच करायला पायजेले. १ एप्रिल... दिला डकवून भिंतीवर आणि पुन्हा लागलो ओझी उचलायला..!! तेवढंच दोन क्षण मनाला 'Aal iz well' वाटतं हे बाबा रणछोडदासने सांगितलंय ना इडियट लोकांना... म्हणून...!!

आमचे दोस्त पण भारीच की.. ऑस्ट्रिया आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही सारखेच. दिसला फोटो की ठोक लाईक. पण त्या लाईक्स आणि कॉमेंट्सनी एकीकडे मान मोडून काम करत असताना मन मात्र बर्फात स्कीइंग करत होतं. ह्या स्ट्रेस रिलीजसाठी तर असतं बे फेबु...!!

दैवदयेने आता मेलबर्नपासून अडीचशे किलोमीटरवर बर्फाचे पर्वत आणि स्कीइंग करता येणार आहे. पुरता विंटर सुरू होण्याची देरी आहे फक्त. तेव्हा अगदी असाच view आणि फोटो टाकू बे... खरोखर...!! एप्रिल फुल नाय... तेव्हा पण असाच लाईक ठोका हां... नायतर कराल एप्रिल मामु...!!

फुल प्रणव.

वजीर


महाराष्ट्राचा राजपट... चौसष्ठ नाही.. बत्तीसच चौकड्यात रमणारा..

आठ प्याद्यांची ये जा.. मागे आठ पल्लेदार लढवय्ये उभे.. सगळ्यांची तोंडे एका बाजूला नाही तर समोरासमोर...

आपल्या-आपल्यातच धोबी पछाड देण्यात मग्न... दिसायला चाल कट्टर शत्रूची पण कोण कधी कुणाचा खासा मित्र, कोण कुणाचा साडू तर कुणी सख्खे चुलत भाऊ...!!

काळ सरे तसा खेळ.. एकेक मावळा पडला तसा त्याचा वीर..

अडीच पावलात थेट शत्रूच्या गोटात शह देणारा अश्व पडला आणि खेळातला 'प्रमोद' नाहीसा झाला...

नाकासमोर सरळ चालून धडकेत गनिम गारद करत गजचाल करणारा 'आबा' गेला..

तिरक्या अन सुसाट चालीत बत्तीस चौकड्या ओलांडलेला 'गोपीनाथ' गेला.. अन दिनदुबळा अनुयायी पुन्हा अनाथ झाला...

कहर उडाला जेव्हा 'महाराष्ट्र हृदय सम्राट'च शिवचरणी विलीन झाला.. खरं तर डाव तिथेच संपला होता. महाराष्ट्र चार शतकानंतर पुन्हा एकदा पोरका झाला होता...!!

नवीन पट मांडायला हवा होता... पण... पण...

अजून पटावर वजीर उभा आहे. दिशेचं बंधन नसलेला.. एकाच डावात कितीही चौकड्या ओलांडू शकणारा.. कुणालाही कुठेही गारद करण्याचे सामर्थ्य असलेला..

ह्याच्या समशेरीइतका खणखणाट कुणीच पाहिला नसेल... इतके उन्हाळे रणरणताना... इतकी वादळे कोसळताना... तोरणे लागताना आणि सीमा उल्लंघताना.. पटाचे चारही कोपरे पादाक्रांत केलेला... ह्यासम हाच...!!

पण हाय दुर्दैवा.. द्वादशगुणीमती व्यर्थ.. अनुभव व्यर्थ.. गुरुविद्या व्यर्थ.. मित्रसोबती व्यर्थ...

आपल्याच बत्तीस चौकड्यात रमतोय.. आपल्याच प्याद्यात भिन्न रंग ठरवतोय... त्यांना एकमेकातच भिडवतोय.. त्यांच्याच खांद्यावर बसून सम्राट बनण्याचे स्वप्न बघितोय…!!

दुर्दैव... शौर्यवान आणि सामर्थ्यवान योद्धे पटावर असून शतकानुशतके दुय्यम स्थान मिळालेल्या माझ्या महाराष्ट्राचे अखंड दुर्दैव...!!

अंधेरा कायम रहे..!!

प्रणव

॥ जाणता राजा ॥

बारामतीला जाणता राजा नाटकाचे प्रयोग सुरु होते. दुसर्याच दिवशीच्या प्रयोगावर राष्ट्रवादी+ब्रिगेडने बंदी आणली. मुद्दा होता.. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळच्या ललकारी मध्ये 'गोब्राम्हण प्रतिपालक' शब्द आहेत.. ते काढून टाका म्हणून. 

आता संपूर्ण नाटक प्रीरेकॉर्डेड आहे. लास्ट मिनिट चेंज कसा करणार...!?
वाद काही मिटेना. खेळ बंद पडतोय की काय अशी वेळ आलेली. चर्चा दिल्लीपासून गल्लीपर्यंत येते तशी वरच्या राजकारणाची आमच्या पोरंटोरांमध्ये खडाजंगी पेटली.

एका कडकडीत राष्ट्रवादी ब्रिगेडीनी माझ्याकडे जळजळीत कटाक्ष टाकून विचारलं... 'पण हे गोब्राह्मण प्रतिपालक आलंच कुठून..!?' 

मी समोरच्या 'साहेबांच्या' होर्डिंगकडे बोट दाखवत गौतम बुद्धाच्या शांत समाधानी डोळ्यांनी उत्तर दिलं... 'जाणता राजा' आलं तिथूनच...!! 

यशवंत कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत । 
पुण्यवंत आणि जयवंत । जाणता राजा ॥

प्रणव

Saturday, June 24, 2017

चुकलेले निर्णय

चुकलेले निर्णय सुधारण्याची संधी पुन्हा पुन्हा मिळत असते. गेलेली वेळ पुन्हा मिळत नाही हे मान्य पण म्हणून त्या गेलेल्या वेळेसाठी हातातली वेळ घालवणं अजूनच चुकीचं...!!

म्हणजे...

ठिणगी टाकलीस तू नशीबा...
आयुष्य जाळतो मीच त्यावर
ढलप्या-ढलप्या कुर्हाडीने 
घाव घालतो मीच त्यावर...!!

प्रणव

Tuesday, May 23, 2017

स्वप्न

          काल माझ्या स्वप्नात आपले दादा आले होते. खुश दिसत होते एकदम. तब्बेतसुद्धा थोडी सुधारल्यासारखी दिसत होती. एकदम गोल गरगरीत चेहरा आणि नेहमीप्रमाणे कवळीचे एकसारखे दात चमकत होते हसताना.
चेहरा थोडा टॅन वाटला. पुण्यात असतानाची तुकतुकी नव्हती चेहर्यावर. उन्हा-पावसाची तमा न बाळगता फिरत असावेत असं वाटलं.
         आश्चर्य म्हणजे आयुष्यभर कधी न दिसलेली एक जाड आणि चकचकीत सोन्याची साखळी होती गळ्यात. मी विचारलं सुद्धा हे काय म्हणून... तर मोठा आवाज करत त्यांच्या स्टाईलने हसले जोरात. उत्तर काही नाही दिलं.
मी हॉस्टेल / हॉस्पिटल / रेस्ट हाऊस अश्या कुठल्याश्या फिल येणार्या ठिकाणी गेलो होतो. वेगळीच जागा होती. मोठा लाकडी डबल बेड होता. पांढर्या शुभ्र बेडशीट्स घातलेल्या. त्यातल्याच एका बेडवर बसून दादा म्हणले... "हा माझा पलंग..!! हा शेजारी आहे तो मित्र आहे माझा. मौज येते अगदी इकडे...!!" आणि पुन्हा हसले मोठयाने..!!
          इन्नाविषयी मी विचारलं नाही. तेसुद्धा काही बोलले नाहीत. एकूणच आनंदी वाटले पण. बाकी बरंच बोलायचं होतं... पण...!!
आज नवीन गजराचं घड्याळ आणायला पाहिजे. चायनीज नसतं तर मोडलं नसतं हे घड्याळ... फुटलं पण. दादांना म्हणूनच चायनीज लोकं आवडायची नाहीत मला वाटतं...!!


प्रणव.

Monday, May 22, 2017

प्लस की मायनस..? 😕

प्रसंग १

          पौड रोडला एका गार्डन रेस्टोरंटला जेवायला गेलो होतो. बदलत राहणं हा पुण्याचा स्थायीभाव आहे हे पुलंनी म्हणल्याप्रमाणे बिल्डिंग, ट्रॅफिक, हॉटेल्स इतकंच काय पुणेकरांच्या राहणीमानातसुद्धा आमूलाग्र बदल जाणवतोय.
          बिर्याणीचं तुडुंब जेवण झालं. पूर्वी गरम पाण्याच्या बाऊलमध्ये लिंबाची फोड टाकून हात धुवायला 'फिंगर बाऊल' देत. मी आपलं वाट बघत बसलो तर एक पोर्यावजा वेटर हातात पिकदाणी आणि गरम पाण्याची सुराई घेऊन आला. नुसताच अदबीने समोर उभा राहिल्याने मला काहीच टोटल लागेना. माझ्या बरोबर असलेल्या मैत्रिणीने मला वेड्यात काढत सांगितलं की हात त्या पिकदाणीमध्ये धर... आणि मग माझ्या हातावर गरम पाणी ओतत त्याने माझा हात धुऊन दिला. जणू काही मी कुणी महाराजच आहे आणि हा नोकर. ह्याच्या हॉटेलात जेवण करून मी ह्याच्यावर उपकारच केलेत. मला त्याक्षणी इतकी चिड आली ना ह्याप्रकाराची...!!
         आपल्याकडे सोसायटीत, ऑफिसात, रिलेटिव्हज आणि एकूणच सगळीकडे कामावरून, आर्थिक स्थितीवरून, शैक्षणिक दर्जावरून अगदी रंगरूपावरून देखील पातळी पाडण्याची आणि त्यावरून ट्रीट करण्याची महाहलकट खोड आहे...!!
हे ताबडतोब बंद होणं अत्यंत गरजेचं आहे...!!


प्रसंग २

         माझ्या बाबांचं चित्रप्रदर्शन होतं. मोठमोठ्या फ्रेम्स टेम्पो करून हॉलवर घेऊन गेलो. येवढ्या मोठ्या आणि जड फ्रेम्स की एकटा टेम्पोवाला आणि त्याला एक हॉलवरचाच मदतनीस ह्या दोघांचा घाम निघायला लागला. एक एक फ्रेम चार जिने चढून वरच्या मजल्यावर न्यायच्या होत्या. आधल्या रात्रीचा वेटरचा प्रसंग माझ्या डोक्यात अजून झणझणत होता. प्रत्येकाला समान वागणूक देण्याचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे ह्याच कैफामध्ये मी पुढे होऊन त्या दोघांबरोबर फ्रेम्स उचलायला सुरुवात केली.
        तिघांनी मिळून घामाघूम होत सगळ्या फ्रेम्स वर चढवल्या. धापा टाकत मी आणि तो हॉलवरचा मदतनीस जिन्यात जाऊन पायरीवर बसलो. आता समान म्हणलं की समान.
त्यात सकाळी जरा उशीरा उठल्याने पारोसच गेलो होतो. अगदी ट्रॅक पँट टी शर्ट... पायात स्लीपर अश्या अवतारात... दाढी म्हणलं घरी आलो की करावी...!!
        त्याने चौकशी सुरु केली... "लै जड हयात राव चित्र.. साहेबांनी सोता काल्डी हाय का?" "तुमी सगळीकडं जाता का चित्र लावायला त्यांच्यासंग?" "कंदीपासून काम करताय थित" "पुडी घेनार का? कवा सोल्डी...!?" 😛
समानतेची खळ आपटून धोपटून मऊ पडलेला मी उठलो आणि कारमध्ये बसून निघून गेलो. 😕

Tuesday, June 2, 2015

वेडा... कोण...!?

मी विमाननगरला असनाता आमच्या साईटच्या शेजारी एक झोपडी वजा खोपटं होतं. त्यात एक वेडा 'सरदार'जी (हो पंजाबी भिकारी... सहसा दिसत नाही) राहायचा.

भंगारच्या गाडीवरून त्याने एक रेडिओ मिळवला होता. मिळालेल्या भिकेच्या पैश्यातून तो चक्क सेल विकत घेऊन दिवसभर मस्त FM ऐकत पडलेला असे.

समोरच नानक डेअरी होती. तिथला मालक सरदार रोज एक अर्धा लिटर दुधाची पिशवी ह्या आपल्या पंजाबी बांधवाला देत असे.

समोरच आम्ही इंजिनियर कामावर एवढी मर-मर करताना हा वेडा एखाद्या पिक्चरमधल्या सुलतानाच्या द्राक्ष खाण्याच्या शाही पोज मध्ये बसून... दुधाची पिशवी तोंडाला लावून... निवांत गाणी ऐकत पडलेला असे च्यायला.

प्रणव.

अलिखित नियम

मला आठवतं... माझी पणजी, आज्जी आणि बर्याच वेळा आईसुद्धा असे बरेच अलिखित नियम किंवा उपाय (ज्याच्या शास्त्रीय आधार त्यांनासुद्धा माहित नव्हता.) किंवा प्रथा सांगायचे. पुर्वीच्या लोकांमध्ये हे खुप होतं. ते अंधश्रद्ध नव्हते पण ह्या गोष्टी त्यांच्या दैनंदिन जगण्यात अगदी सहज यायच्या... मागच्या पिढीने सांगितल्या म्हणुन पुढे... कुणाच्या चुका काढायच्या म्हणून नाही... पण गंमत यायची ह्या सगळ्यातुन. मला आठवत आहेत त्याची यादी करत आहे. तुम्हाला माहित असलेल्या ह्यात भर टाका... शास्त्रीय आधार माहीत असेल तर तो पण सांगा... गंमत म्हणून...

१. शनिवारी केस कापायला जायचं नाही. रात्री नखं कापायची नाहीत.
२. कुणाला बाहेरुन यायला उशीर होत असेल तर उंबर्यावर डावीकडे मीठ ठेवायचं.
३. ज्याची तुम्ही वाट बघत आहात त्याचं जेवणाचं ताट वाढून ठेवायचं नाही, त्याला यायला अजून उशीर होतो.
४. बाहेर जाणार्याला ’कुठे जातोस’ म्हणुन मागुन विचारायचं नाही, काम होत नाही.
५. बाहेर जाणार्याने ’मी जातो’ म्हणायचं नाही... ’मी येतो’ म्हणायचं.
६. पालथी मांडी घालून पुजेला बसायचं नाही. हे कदाचित नमाज पालथ्या मांडीने करतात म्हणुन म्हणत असावेत.
७. कावळा अंगाला धडकला तर मोठा अपशकुन होतो. माझ्या मित्राच्या आईने कसलीतरी पुजा सुचवली होती कावळा धडकल्यावर.
७अ. हाच कावळा अंगावर शिटला तर मात्र शकुन होत असे. हे काय लॊजीक आहे माहीत नाही ब्वा.
८. कुत्रा किंवा मांजर समोर असताना जेवायला बसू नये.
९. मोलकरीण किंवा घरकाम करणारे लोक किचनमध्ये आले तर अन्न झाकून ठेवावं. काही गोडधोड केलं असेल तर त्यांनासुद्धा शेअर करावं. अन्नाला वासना लागून राहते म्हणुन.
१०. लहान बाळाला पहिल्या काही महिन्यात नविन कपडे घालायचे नाहीत... विकतही घ्यायचे नाहीत. बाळाचा जन्म व्हायच्या आधी काहीही खरेदी करायची नाही.
११. शनिवारी तेल विकत आणायचं नाही, हरभरा-डहाळा खायचा नाही, लोखंडाच्या कढईमध्ये पिठलं करायचं नाही. नविन काम सुरु करायचं नाही.
१२. चिमट्याचा, कात्रीचा, रिकाम्या भांड्यांचा आणि चपलांचा आवाज करायचा नाही.
१३. संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी कडकडीत सात वाजता अंघोळीला जायचं नाही किंवा जेवायलासुद्धा बसायचं नाही.
१४. नुसता पांढरा भात ताटात वाढायचा नाही. आधी मीठ वाढायचं. (ह्याचं कारण श्राद्धाला बिनामिठाचा भात ताटात वाढतात हे होतं.)
१५. माहेरवाशिणीनं बुधवारी सासरी परत जायचं नाही. (ही त्या माहेरी आलेल्या मुलीनी आणि तिनं अजुन राहावं असं वाटणार्या आईनं केलेली गेम असणार.)
१६. चप्पल उलटी पडली की भांडणं होतात. (अर्थात उलटी पडलेली चप्पल घाणेरडीच दिसते. ती बघूनच चप्पलवाल्याला हाणावं वाटून भांडणं होणार ना.)
१७. देवापुढचा दिवा तेल संपून विझला की तो ’विझला’ म्हणायचं नाही.. दिवा ’शांत झाला’ म्हणायचं.
१८. रात्रीच्या जेवणात केलेला सगळा भात आणि घरातलं दूध कधीच संपु द्यायचं नाही. (घर म्हणुन थोडं तरी असू द्यावं म्हणे.)
१९. एखादी गोष्ट बोलल्याच्या दुसर्याच क्षणी दारावरची घंटा, फोनची बेल वाजली किंवा त्याच वेळेस गेलेले लाईट आले की... ’बघ सत्य आहे’. म्हणजे जे बोललं ते खरंच आहे.
२०. एखाद्याचं... विशेषत: मुलांचं कौतुक केलं की ’डाव्या पायाकडं बघ’ असं त्याला सांगायचं म्हणजे दृष्ट लागत नाही.
२१. शनिवारी नारळ फोडायचा नाही. नारळ उभा फुटला किंवा नासका निघाला की ’पावला’ म्हणायचं. (हे कदाचित फोडणार्याने शिव्या खाऊ नयेत म्हणुन म्हणत असावेत.)
२२. लिंबू उभं चिरायचं नाही. लिंबू कापलं म्हणायचं नाही. चिरलं म्हणायचं.
२३. पाणी घेतल्याशिवाय जेवायला बसायचं नाही. (हे कदाचित ठसका लागला तर असावं.) पाणी पिताना पेला डाव्या हातात असला तरी उजवा हात नुसता खालून लावायचा.

कितीतरी आहेत अजुन. सध्या येवढ्याच आठवत आहेत. ह्या गोष्टींचा अट्टाहास नसायचा... कुणाचा जीव घेणारी अंधश्रद्धा नसायची, पण आपल्या पोराबाळांची काळजी करणार्या आईची भाबडी माया मात्र स्पष्ट दिसायची. आपल्या आज्जी किंवा आईचा एखादा गोंडस वेडगळपणा आपण जेवढ्या आपलेपणाने घेतो तसाच हा विषय घ्या. उगाच धार्मिक, जातीय किंवा अंधश्रद्धेची काशी करुन मजा कमी करुन घेऊ नये ही विनंती...!!

प्रणव.

मोकाट

खरंतर एका टुकार आणि फुटकळ नटाला (?) केलेल्या चुकीसाठी शिक्षा मिळालीये. त्यात सगळ्यांनी एवढी चर्चा करण्यासारखं काय आहे येवढं? काही मोजके (दोन किंवा अडीच) सिनेमे सोडले तर काय मोठं कर्तृत्व ?
बाकी सिनेमे आणि माकडचेश्टा पाहता नुसता जरी आत टाकला असता तरी गळे काढण्याची गरज नव्हती. पण भिकार अभिनय करणार्यांसाठी बाबासाहेबांनी कायद्यात काही कलमच ठेवलं नसल्याने निम्मं बॉलीवूड असं बाहेर मोकाट फिरतंय.

त्यात इथे तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आहे. ते पण चुकून नव्हे... चांगली पार्टी करून घरी जाताना... नशेत...!! त्या मानाने पाच वर्ष म्हणजे देशपांडे साहेबांनी जरा सबुरीनंच घेतलं म्हणायचं...!!

आणि वर ह्यांच्या शिक्षा म्हणजे माहितीये. तो दत्त नाव लावणारा अतिरेकी बघितला नाही का. दहा वर्ष जेलमध्ये कागदोपत्रीच आहे. इकडे दुसरं लग्न झालं... पोरंबाळं झाली... पाच-पन्नास सिनेमे घालून झाले. सलग पन्नास दिवस सुट्टी मी माझ्या लग्नाच्या वेळीसुद्धा घेतली नव्हती. हे साहेब बायको आजारी आहे म्हणून परोल वर मोकाट हिंडत असतात.

बरं ते जाऊ देत... फुटपाथवर झोपलेला त्याच रात्री मेला. पण ह्या बिनलायकीच्या धेंडापाठी सगळा आरोप स्वत:वर घेऊन आयुष्याची काशी करून घेतलेल्या त्या ड्रायव्हरची दशा आता त्या चेंगरुन मेलेल्यापेक्षा वाईट होणार आहे त्याच्याकडे कुणाचं लक्ष आहे काय...!?

प्रणव.

Feeling चिंतनकेसरी

जे जे आपणासी ठावे l ते ते इतरासी शिकवावे ll
शहाणे करुन सोडावे l सकल जन ll

समर्थांच्या ह्या वचनाप्रमाणे... जे जे म्हणजे अगदी दोन-तीन गोष्टी जरी माहित झाल्या तरी लगेच तोंड फिरवून सकल जनांस शहाणपणा शिकवण्यास आम्ही अगदी उतावीळ असतो. त्यात आम्ही पडलो पुणेकर... त्यामुळे जन्मत:च कर्णाच्या कवचकुंडलाप्रमाणे... (श्या: बोअर झाली राव ही उपमा आता खरंच...) हा अधिकार आम्ही जन्मत:च घेऊन आलो आहोत. ह्याच (फुकाच्या) आत्मविश्वासावर आणि (नवटाक) अनुभवांवर आधुनिक ई-लेखांचे तीन प्रमुख प्रकार खालीलप्रमाणे कथन करत आहोत:

१. पहिला प्रकार - फेसबुकवरच्या पोष्टी:

अलिकडच्या काळात ज्यांना मराठी टायपिंग थोडे का होईना जमते ते अगदी वाट्टेल ते लिहून (तुझ्यासारखेच कोण म्हणलं रे ते...!?) फेसबुकवर पोष्टत असते. ह्यात हलक्या-फुलक्या पोष्टांपासून, लांबलचक बोरिंग लेखांपर्यंत आणि पांचट चारोळ्यांपासून पावसाच्या अगर प्रेमाच्या कढ आणणार्या कवितांपर्यंत सगळं येतं. एकदा का पोष्टून झालं की ’लाईक्स’ आणि कॉमेंन्टा मोजण्यात आणि त्यांचे नोटीफिकेश्न्स मोजण्यात पोष्टकर दंग (खरंतर addict) होऊन जातात. फेसबुकच्या भिंतीवरच्या पोस्ट्स ह्या स्वत:च्या घराच्या कंपांऊडवरच्या जाहिरातीसारख्या असतात. स्वत:ला जे पाहिजे ते चिकटवा. बघणारे बघतात... दुर्लक्ष करणारे तेवढेच. यादीत तीन-चारशे मित्र असतील तर लाईकर तीस... पाच-पाच हजार फ्रेंड्सवाले लेखकांचे लाईकर्स दोनशे-तीनशे जातात फार तर...!! (जळ-जळ हो नुसती.. बाकी काही नाही...!!). ह्या भिंतीवरच्या पोष्टी काही काळाने हरवून जातात... भिंतीला व्हाईट वॉश दिल्यासारख्या विरुन जातात... दिसेनाश्या होतात.

२. दूसरा प्रकार - ब्लॉगिंग:

घरंदाज ई-लेखकाचं प्रमुख लक्षण म्हणजे स्वत:चा ब्लॉग असणं. (माझाही आहे बरं...!! अहो फुकट काढता येतो तो गुगलवर.) फेसबुकच्या पोस्ट्स म्हणजे Point & Shoot डिजीटल कॅमेराप्रमाणे. कुणीही क्लिकक्लिकाट करु शकतं. पण ब्लॉग एकदम प्रोफेशनल DSLR ने फोटो काढण्यापैकी काम आहे. त्यात एक नजाकत आहे. स्वत:ला ब्लॉगर म्हणवून घेण्यात एक धन्यता आहे. पण ह्यात एक खुप मोठी त्रुटी आहे. वाचकांचा सहवास जो फेसबुकवरच्या पोस्टवर जाणवतो तो ब्लॉगवर नाही. कारण इथे कॉमेंट करणे हे फेसबुकपेक्षा कॉप्लीकेटेड आहे. इथे ’लाईक’चा handy पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे कॉमेंट न करता नुसती ’लाईकची’ हजेरी लावण्याची सोय इथे नाही. इथे तुमचे फॉलोअर्स सहजा-सहजी मिळत नाहीत... ते तुम्हाला earn करावे लागतात. (आपले नऊ फॉलोअर्स आहेत बरं का... त्यात ’दोन’ चक्क अनोळखी आहेत. अहो खुप मोठी achievement आहे महाराजा... अहो आम्ही काय अमिताभ बच्चन आहे का... एका रात्रीत दहा लाख फॉलोअर्स मिळवायला...!! असो... तुम्हाला आपल्या माणसाचं कौतुकच नाही बुवा.)

३. तिसरा प्रकार - फेसबुकवर पेज:

हा पर्याय फेसबुक पोस्ट्स आणि ब्लॉगच्या मधला पर्याय आहे. झुक्याने गुगलच्या पोटावर पाय आणायला काढलेला... दिसायला एकदम ब्लॉगसारखाच. ब्लॉगमध्ये तारखेप्रमाणे सगळे ई-लेख लाईनशीर दिसतात. तसेच इथेही. मध्ये-मध्ये टाकलेले फोटो अल्बम... पिक्चर बघितल्याचे tag... एयरपोर्टला केलेले travelling tags... हॉटेलात जेवायला गेलेले tags... असले अडथळे ह्यात नाहीत. शिवाय कॉमेंट्स आणि लाईक्स अगदी फेसबुकसारखेच. शिवाय तुमची पोस्ट किती लोकांनी बघितली हे कळतं. (Reached ten people आणि दोनच लाईक्स हे जरा क्लेशदायक असतं यार पण. पुन्हा असो.) शिवाय लोकांना तुमचं पेज लाईक करायला तुम्ही आमंत्रण देऊ शकता. (पन्नास लोकांना बोलावलं तर चार लोकं करतात हो लाईक. काय सांगायचं आता...!?) भरपुर लाईक्स आणि धडाधड कॉमेंन्टा मिळवणारी पेजेस माझ्या बघण्यात आहेत बरं. सगळेच आपल्यासारखे नसतात हो...!!

शेवटी हे झाले पर्याय. प्रत्येकात काही फायदे तर काही तोटे. तुम्ही लिहीता काय आणि वाचकांचे तुमच्यावर प्रेम किती ह्यावर तुमचे ई-लेखक म्हणून प्रोफाईल फुलते आणि अधिकाधीक बहरते.

’लाईक’ आणि कॉमेंटचा खेळ असे सारा.
ब्लॉग आणि फेसबुकी पोस्टांचा पसारा...!!

प्रणव.

Saturday, January 24, 2015

मी म्हणजे... काय...!!?

चला आता सलग तीन दिवस सुट्टी... लॉंग विकेण्ड... खरं तर सकाळी लवकर उठणारच नव्हतो पण परवाच नवा Track suit घेतला तो घालून फिरायला जायची हौस होती. फिरून आल्यावर पुन्हा बेडध्ये शिरलो. चांगला दहा वाजता उठलो. एरवी झोपायला मिळत नाही ना. अकरा वाजता बेक्ड बीन्स विथ चीज टोस्ट... फ्रुट प्लाटर आणि मोक्कोनाची वाफाळणारी कपेचीनो असा साधाच ब्रेकफास्ट केला.

हल्ली बोअर झालंय हो तेच-तेच रुटीन. आणि प्रॉब्लेम्स काही संपत नाहीत. एवढी फोर सिलेंडर कार आहे पण स्पीड लिमीट शंभरच... इन्वेस्टमेण्टचा म्हणुन दुसरा flat घेतला तर बिल्डर पझेशन लांबवतोय... नवीन घरात फर्निचर आहे पण बेडरुममधला एसी जरा जास्त आवाज करतोय... उशीरा झोप लागते त्यामुळे... येवढे पैसे देऊन घेतलेला मोबाईल आहे पण battery रोज चार्ज करावी लागते... श्या: काही अर्थच राहिला नाहीये कशाला...!!

इंग्लिश पिक्चर बघून कंटाळा आलाय पण इथे मराठी थियटरवर येतंच नाहीत. Online बघावे लागतात. बाहेर ऊन जरा जास्त होतं म्हणुन घरातच लावला पिक्चर... आता थियटरची मजा ह्या बेचाळीस इंची टीव्हीवर कुठे...? पण आलीया भोगासी...!!

बरंच ऐकलं होतं म्हणुन 'डॉ . प्रकाश बाबा आमटे' पिक्चर लावला. 'द्वैत ओघळलं आणि सर्वत्र दिसू लागले रघुकुलनंदन' ही समर्थांची अवस्था काय आहे ह्याची प्रचिती आज आली. त्यांच्याशी तुलना वगैरे बाजूलाच राहू देत... स्वत:ला माणुस तरी म्हणावे का अशी मन:स्थिती झाली आहे. घरट्यासाठी काड्या जमा करणार्या यकश्चित पाखरात आणि माझ्यात काय फरक आहे...!?
दिडशे डॉलर्स देऊन घेतलेल्या करकरीत Track suit मध्ये असून कफल्लक नग्न फकीराची भावना आहे. जेव्हा-जेव्हा यश, पैसा, रूप, शिक्षण, कष्ट, असुविधा आणि त्याग (sacrifice) ह्या कुठल्याही बाबतीत डोक्यात भूत शिरल्यास सोप्पा उतारा एकच... हा पिक्चर... 'डॉ. प्रकाश बाबा आमटे'...!!!

प्रणव.

अंधश्रद्धाळू...!! कोण...!?

आमच्याकडे धुणं-भांडी करणार्या आज्जींची परवा एका पोस्टमुळे आठवण झाली. आज सांगु... उद्या सांगु करत आठवण शेयर करायची राहुनच गेली होती. आज ’पीके’ बघितल्यावर मात्र लगेचच लिहून काढावी असं वाटलं...!!

वयाची जवळ-जवळ पासष्ठी ओलांडलेल्या... तोंडाचं बोळकं असलेल्या... डोक्यावरचे विरळ होत जाणारे पण पिकून संपुर्ण पांढरे झालेल्या केसाचा सुपारीयेवढा आंबाडा बांधणार्या... डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा अन त्यात एका डोळ्याला मोतीबिंदू... स्वत: शाळेचं तोंडदेखिल न पाहिलेल्या तर नातवाचं शिक्षण अगदी चांगलं चौदावी-पंधरावीपर्यंत झालयं असं अभिमानानं सांगणार्या आमच्या आज्जी...! त्यावेळेला प्रत्येक कामाचे पन्नास रुपये ह्या हिशेबाने संपुर्ण महिन्याचे जेम-तेम दीडशे रुपये त्या आमच्याकडून घ्यायच्या. अशी फार तर आठ-दहा घरं करण्यात त्यांचा दिवस आणि कंबर मोडत असे. त्यांचं काम काही फार स्वच्छ नव्हतं. अंधुक नजरेतुन बर्याच वेळा भांड्यांना खरकटं तसंच राही. माझी आई पुन्हा एकदा भांडी विसळून घेई. पण तरी आज्जींना अजुन ’पिंक स्लीप’ मिळाली नव्हती कारण एखाद-दुसरे वेळी तब्बेतीचं कारण सोडलं तर त्यांचं आजिबात खाडं नसे.

पण ह्या आज्जींची एक गंमत होती. पंढरपुरच्या वारीचे दिवस आले की त्यांना विठुरायाच्या भेटीची ओढ लागे. महिना-दीड महिना त्या गायब होत असत. हा जून-जुलैचा महिना नेमका पावसाचा आणि मुलांच्या शाळा सुरु होण्याचा. त्यात आज्जींची long service leave म्हणलं की त्यांच्या सगळ्या मालकीणींची चिड-चिड होई. त्या सुट्टीवर जाऊ नयेत म्हणुन बायका त्यांना धमकी देत असत...”बघा हां आज्जी.. तुम्ही येवढ्या मोठ्या सुट्टीवर गेलात तर आम्ही दुसरी बाई ठेऊ... तुमचं काम जाईल बघा मग... परत आलात तर ऐकुन घेणार नाही...!!" त्यावर आज्जी अगदी मिश्किल चेहरा करुन म्ह्णत... ’जाऊ द्या बाई... विठोबा देईल ते घ्यायाचं... ठेवलं तुमी कामावर तर ठेवलं... न्हाई तर न्हाई...!!’ पण त्यांना पंढरपुरच्या वारीला जाण्यापासुन थांबवणं कुणालाच शक्य होत नसे. वारीला आज्जी जाणार म्हणजे जाणारच. माझ्या आईनी त्यांना कधीच आडवलं नाही. उलट ती त्यांना वारीला जाताना शिधा बांधुन देत असे.

अश्याच एका वारीनंतर काही अंधश्रद्धा निर्मुलन करणार्या संस्थेनी किती लाख लोकांचे किती कोटी man hours एका गावाकडून दुसर्या गावाकडे चालत जाण्यात वाया जातात वगैरे जावई शोध लावला. त्यात ह्या सगळ्या वारकर्यांच्या अंध(?)श्रद्धेचा पायाच मोडून काढावा अश्या उद्देश्याने थेट माऊलींच्या समाधीगुहेतच कॆमेरा सोडून आत काय आहे हे पाहण्याचा घाटही घातला होता.
ह्या सगळ्या गोष्टींवर आज्जींचं मत काय आहे हे मला जाणून घ्यावं वाटलं. मी म्हणलं, "आज्जी... माऊलींच्या समाधीगुहेत केमेरा सोडून पाहायचं म्हणतायत... तुम्हाला काय वाटतं...!? असतील का अजुन ध्यान लावून बसलेले महाराज तिथे...!? काय असेल खाली...!?" त्यावर केरसुणीनी केर पुढे ढकलत आज्जी म्हणाला... ’खुळ्याचा बाजार हाय... त्यात काय असायचंय तवा... हाडकं दिकुन सापडायची न्हाईत आता इतक्या वर्सांनन्तर...!!’

मी हे ऐकुन अक्षरशा: चाट पडलो. दरवर्षी वारीमध्ये कित्येक man hours वाया घावलणार्या... हातावरचं पोट असूनही महिना बाराशे-पंधराशेचा straight loss सहन करणार्या... परत आल्यावर रोजगार मिळेल की नाही ह्याची कणभरही फिकीर न करणार्या... नखशिखांत आडाणी... पंढरपुर, अक्कलकोट आणि गाणगापुर सोडलं तर आयुष्यात कधी फार न फिरलेल्या... वयाच्या पासष्ठ वर्षांत साधा समुद्रही कधी न पाहिलेल्या आज्जी... त्यांना पुर्ण कल्पना होती की समाधीमध्ये काय असेल ह्याची. तरी त्यांच्या माऊलींवरच्या श्रद्धेतला एक कणही कुठे इकडे-तिकडे झालेला दिसत नव्हता.
भलत्या-सलत्या बाबांच्या नादाला लागणारे, नको त्या महाराजांच्या पाया पडणारे आणि भोळ्या लोकांना देवाच्या नावाने लुबाडणारे जेवढे वर्ज्य़... तेवढेच देवळात जाणार्या सरकसट सगळ्यांना अंधश्रद्ध समजणारे, जप-ध्यान करणार्यांना मुर्ख समजणारे आणि समस्त हिंदू हे भोंदू आहेत हे समजणारे तर महा-वर्ज्य...!! दोघंही दोन टोकांचे अतिरेकी...!!

पंढरपुरच्या वारीत दिसणारे वेडेबागडे... बेभान होऊन नाचणारे... विठ्ठलाच्या नामगजरात हरवून जाणारे... आडाणी लोक... सगळेच्या सगळे ’अंधश्रद्ध’ आहेत असा आपला समज असेल तर आपल्याइतके आडाणी आणि आंधळे आपणच...!!

प्रणव.

माझ्या ब्लॉगची जन्मकथा

नारळ फुटी

बर्याच दिवसांपासुन काहीतरी लिखाण करावं असं मनापासुन वाटत होतं. कधी विषय सुचायचे पण शब्दांत उतरवायला वेळ नसायचा. कधी वेळ मिळालाच तर काय लिहाव...