Wednesday, May 17, 2023

पान ७ - ग्रेट गॅंबलर

स्ट्रेलियामध्ये एकूणच सुपरलोटो, जॅकपॉट, घोड्याच्या रेस आणि कॅसिनोचं खूप वेड आहे. टीव्हीवरच्या जाहिरातींमध्ये लॉटरीच्या जाहिराती अगदी सर्रास असतात. प्रत्येक मॉलमध्ये अगदी हमखास एक तरी लॉटरीचं दुकान असतंच. अगदी सरकारमान्य उद्योग आहे. अर्थात गंमतीसाठी प्रमाणात लॉटरी विकत घेण्यात कुणी काही अपराधी भावनाही ठेवत नाही. आपल्याकडं म्हणजे द्युतामध्ये घरादारासकट धक्क्याला लागलेल्या ’धर्मराजा’पासून ते ’अहो काय सांगायचं...!? आमच्या आजोबांची अडीचशे एकर शेती होती.. आकड्यापायी घावलीनीत की हो सगळी आणि ह्या चाळीच्या दोन भाड्याच्या घरात मरायची वेळ आमच्यावर आली’ इथपर्यंत एकूणच सट्टा हा प्रकार बदनाम आहे. काही सत्यकथा तर काही तेल-मसाला लावलेल्या गोष्टीही अगदी सहज ऐकायला मिळतात. त्यामुळेच ह्या दुकानांना पर्दानशिन राहून आपला मतलबी चेहरा समाजातल्या सोज्वळ माणसांपासून लपवावा लागतो. असो.

पण इथे हा प्रकार वयाच्या अठराव्या वर्षीपासून सगळ्या लोकांना अगदी सहज उपलब्ध असतो शिवाय तो समाजअमान्य अवैध वैग्रे काही नाही. शहराच्या मधोमध नदीकाठी चांगला भलामोठा कॅसिनो आहे. तो आठवड्याचे सातही दिवस अगदी चोवीस तास चालू असतो. महाकाय अश्या तीन मजल्यावर हजारो गॅंब्लिंगची स्लॉट मशिन्स, पोकर आणि ब्लॅकजॅकची टेबल्स पैसे लावून नशिब आजमावणार्यांनी व्यापलेली असतात. तरुण वर्ग शुक्रवार रात्रीपासून कॅसिनोमध्ये यायला लागतो. संपूर्ण विकांत तरुणाईने गजबजलेला असतो. थ्री-पिस घातलेले तरूण आणि बॉल गाऊन पासून अगदी टकाटक ड्रेसेस घातलेल्या ललनांनी सगळे मजले भरून जातात. एकीकडे तव्यावरची भाकरी फ़िरवून फ़िरवून म्युझिकच्या करामती दाखवणारा डीजे आणि समोर हातात ड्रिंकचा ग्लास घेऊन त्या संगीतावर थिरकणारी तरुणाई...!! गॅंब्लिंग टेबलवरचे पांढरा-शुभ्र शर्ट, स्लिव्हलेस जॅकेट आणि गळ्याला बो लावलेले कार्ड काऊंटर्स, त्यांची ती सराईतासारखी पत्ते पिसून टेबलावर टाकण्याची पद्धत, चेहर्यावर कसलेही हावभाव न दाखवता तुम्हाला दिलेली सर्व्हिस आणि समोरच्या बार स्टुलांवर बसलेले स्पॉट प्लेयर्स. सगळंच किमान एकदा तरी अनुभवायला हवं असं वातावरण.

कितीही आकर्षक दिसत असलं तरी ह्या कॅसिनोमध्ये जाण्याचं काहींना वाईट व्यसन लागतच. ’गॅंबल रिस्पॉन्सिबली’ हे जिथे तिथे लिहिलं असलं तरी ती रिस्पॉन्सिबलीटी प्रत्येकाला कळतेच असं नाही. पण त्याचीही सोय़ कॅसिनोनेच करुन ठेवली आहे. तुम्ही कॅसिनोच्या मेनेजमेंटला सांगून स्वत:लाच तिथे प्रवेशबंदी करू शकता. एकदा तुम्ही त्यांना एक वर्षासाठी स्वत:लाच तिथे बंदी घातली तर कितीही गयावया, आकांडतांडव केलात तरी दारावरचे बाऊन्सर्स    तुम्हाला आत जाऊ देत नाहीत.

ह्या सगळ्या गॅंब्लिंग कल्चरचा कहर म्हणजे सिनीयर सिटीझनसाठी राखून ठेवलेला मंगळवार. ह्या दिवशी वयस्कर मंडळींना कॅसिनोकडून फ़ुकट बस सेवा असते. ही बस शहरभरातुन म्हातार्यांना गोळा करुन आणते, खेळून झालं की संध्याकाळी परत घरी नेऊन सोडते. त्यांना कॅसिनोमध्ये स्वस्तात जेवण, बियर-वाईन, चहा कॉफी मिळते. इथे खेळायला आलेले काही तर इतके जख्ख म्हातारे असतात की त्यांचा हात स्लॉट मशिनपर्यंत वरही जात नाही. काही वेळा हात थरथरत असतो. पण ते अगदी मनापासून कॅसिनोमध्ये खेळणं एन्जॉय करत असतात. आता ह्या वयात लॉटरी जिंकून करणार काय? पण कुणाचा आनंद कशात असेल काय सांगावं? घरी एकलकोंडयात बसून राहण्यापेक्षा सट्ट्य़ाच्या मशिनमध्ये वीस-वीस सेंट्स टाकत दिवस घालवणारे हे गोरे म्हातारे आणि घरांत सुनांची बोलणी खायला लागू नये म्हणून तासंनतास देवळाच्या पायरीवर बसून राहणारे आपल्याकडचे हतबल आज्जी-आजोबा... वार्धक्याचे दिवस कंठणार्या ह्या दोघांत मला तर फ़ार फ़रक आहे असं वाटत नाही...!!

क्रमश:

1 comment:

  1. Loved how the shimmer and shine transitions from glam to tears

    ReplyDelete

माझ्या ब्लॉगची जन्मकथा

नारळ फुटी

बर्याच दिवसांपासुन काहीतरी लिखाण करावं असं मनापासुन वाटत होतं. कधी विषय सुचायचे पण शब्दांत उतरवायला वेळ नसायचा. कधी वेळ मिळालाच तर काय लिहाव...