Tuesday, June 6, 2023

फिजेट स्पिनर - भाग २ (प्रणव जतकर)

तीन वर्ष डिप्लोमा पूर्ण करून संतोष पुन्हा आपल्या गावी देवळाला परत आला. आपल्या घराण्यात कॉलेजापर्यंत जाऊन आलेला आणि संपूर्ण गावात फ़्लोरीकल्चर शिकलेला एकमेव तरणाबांड वीस वर्षाचा मुलगा बरोबर घेऊन फ़िरताना संतोषच्या बापाची छाती अभिमानाने फ़ुलून यायची. पण फ़ुगवलेल्या छातीखाली रिकामं पोट असल्यावर किती दिवस कौतुक टिकणार? येवढा कॉलेजात शिकून आल्यावर शेतीत काहीतरी चमत्कार करून घरात पैश्याच्या राशीच्या राशी आण्याव्यात हे त्याच्या अडाणी आईबापाला वाटलं तर त्यात गैर काहीच नव्हतं. पण असल्या कडक उन्हात फ़ुलशेती करायची तर ग्रीन हाऊस पाहिजे, ड्रिप पाहिजे, छोटं पंप हाऊस पाहिजे तरच काहीतरी करणं शक्य आहे हे संतोषने सांगितल्यावर त्याच्या बापाला घामच फ़ुटला. आता पैसा मिळवायचा तर आधी गुंतवणूक केली पाहिजे हे त्याला कळत होतं. पोरगं इतकं शिकलंय म्हणजे काहीतरी नक्की करुन दाखवेल ह्या आशेवर संतोष म्हणेल ते-ते सर्व त्याच्या बापाने केलं.

गावात पहिलं ग्रीन हाऊस उभं राहिल्यावर सगळी गावातली मोठ्या कौतुकानं बघायची. लातूरवरून टेक्निशियन्स यायचे तेव्हा गावातली पोरं गाडीमागे पळायची. त्यांच्याभोवती कोंडाळं करुन संतोष आणि ते काय बोलतायत ते बघत बसायची. कळायचं तर त्याच्या बापाला पण काहीच नाही; पण संतोष शेतीत काहीतरी भारी करतोय हा गवगवा सगळ्या गावात काही दिवस चालला. संतोषने सुद्धा आपल्या कष्टात काही कसूर ठेवली नाही. पुण्या-मुंबईला हेलपाटे घालून जर्बेराच काय डेझी, बटर कप, फ्लॉवर कप आणि निरनिराळ्या ट्युलिप्सचे कांदे, बिया आणि रोपं मिळवली. काही महिने आणि बापाचे काही लाख मातीत पेरल्यावर उगवलेल्या विदेशीचे फ़ुलांचे क्रेट घेऊन संतोष तालूक्याला गेला. इकडे गावाला त्याच्या दहावीच्या निकालाच्या दिवशीसुद्धा चिंतेत नसेल इतका त्याचा बाप चिंतेत होता. तालूक्याच्या हरामखोर ठेकेदारांची लॉबी कशी आहे त्याला माहित होतं. तोही संतोषबरोबर तालुक्याला जाणार होता. पण ऐन निघायच्या वेळेला खाटेवरच्या म्हातारीने गळा काढला. संतोषच्या ग्रीन हाऊससाठी तिच्या बोरमाळेचा फ़न्ना उडाला ह्याचा राग म्हातारीला होता. तसं तर लेकींच्या लग्नासाठी साठवलेले पैसे आणि संतोषच्या आईच्या पाटल्यासुद्धा मोडल्याच होत्या की. पण मुलगा आपल्या घरासाठीच करतोय़ हे त्या आईबापाला ठाऊक होतं.

दोन दिवसांनी संतोष खाली मान घालून दारात उभा राहिला. त्याच्या आईच्या काळजात धस्स झालं. बाजारानंतर तिच्या नवर्याचं हे असं दारात उभं राहाणं तिला काही नविन नव्हतं. आता शिकलेल्या पोराकडून अपेक्षा होत्या. तोही असाच उभा राहिल्यावर त्यांनी बघायचं कुणाकडं? ज्या भावात एक किलो झेंडू येतो त्या बाजारात तेवढ्या पैश्यात एक नग विदेशी फ़ुल विकत घेणार कोण? संतोषचा अंदाज साफ़ फ़सला. दुसरा दिवस संपत आल्यावर फ़ुलं कोमेजून फ़ेकून द्यावी लागतील ह्या भीतीने मिळेल त्या भावाला विकून टाकून तो परतला होता. हा प्रकार बघून त्याच्या बापाने हाय खाल्ली. बघता-बघता ही बातमी गावभर झाली. आधी कौतुकं करणारे आता नावं ठेऊ लागले. वीस वर्षाच्या पोराला काय अक्कल असते का? आता बापाचा येवढा पैसा वाया घालवला... बहिणींची लग्नं कशी करणार आहे आता? चार बुकं शिकली म्हणजे सगळी अक्कल आली का?

घरातले आणि बाहेरचे सगळे कडू डोस पचवत संतोष राहिलेला मळा काढून पुन्हा क्रेट भरत होता. आलेला हंगाम तर पूर्ण विकणं भाग होतं. पुन्हा बर्फ़ाच्या लाद्या, फ़ुलांच्या इस्की आणि खर्च करुन राहिलेली फ़ुलं घेऊन तालुक्याला जावंच लागणार होतं. दोन दिवस झाले बापाने बोलणंच सोडून दिलं होतं. आई तर रडण्याच्या मधल्या वेळात त्याच्यावर त्रागा करत होती. सगळ्या घरावर अगदी सुतकी कळा आली होती. येऊन-जाऊन म्हातारीच्या खोकण्यातच काही बदल नव्हता...!!

क्रमश:

No comments:

Post a Comment

माझ्या ब्लॉगची जन्मकथा

नारळ फुटी

बर्याच दिवसांपासुन काहीतरी लिखाण करावं असं मनापासुन वाटत होतं. कधी विषय सुचायचे पण शब्दांत उतरवायला वेळ नसायचा. कधी वेळ मिळालाच तर काय लिहाव...