’इफ़ यु वॉन्ट टू लिव अस देन लिव बिफ़ोर इट्स टू लेट’.. थरथरत्या आवाजात बोललेले म्हाताऱ्याचे आर्त शब्द तप्त शिश्यासारखे त्याच्या कानातुन खोलवर घाव करत काळजात उतरले. गेल्या चार वर्षात ब्रॅड आणि ऍलानाने त्याच्यावर अगदी पोटच्या मुलासारखं प्रेम केलं होतं. ग्रोनिन्जीन शहरापासून कित्येक मैल दूर असलेल्या मोक्कनबर्ग जवळ फ़ार्महाऊसवर राहणार्या त्या दोघांच्या फॅमिलीचा तो अविभाज्य घटक कधी बनला हे त्या तिघांच्याही लक्षात आलं नाही. येवढंच काय फ़ार्महाऊसवरच्या जर्सी गाई, ब्रॅडचा लाडका घोडा ’मॉन्टी' आणि जर्मन शेफ़र्ड जातीचा कुत्रा ’ब्राऊनी’ ह्यांनासुद्धा त्याचा लळा लागला होता. हे सगळं काही ठरवून झालं नव्हतं. मागच्या चार वर्षात होत गेलं. आणि आता अचानक ब्रॅडकडून हे निर्वाणीचं बोलणं ऐकुन त्याच्या पायाखालची जमीनच सरकली होती. नेहमीचा रस्ता सोडून त्याने होन्डीप नदीच्या दिशेला गाडी वळवली.
Tuesday, June 6, 2023
फिजेट स्पिनर भाग १ (प्रणव जतकर)
नेदरलँड्सला आल्यापासून जेव्हा केव्हा त्याला घराची आठवण यायची तेव्हा तो ह्या होन्डीप नदीच्या काठावर एका पुलाजवळ येऊन बसे. इथे बसून त्याला आपल्या गावाची आठवण यायची. अशीच आमच्या देवळा गावची ती मांजरा नदी.. इतकी भरभरून वाहात नसेल पण चुलीसमोरच्या अंगाने कॄश पण उबदार पदर असलेल्या आईसारखीच माया देणारी. ते नदीकाठचं विश्वरूपी देवीचं मंदीर... ती देवीची जत्रा... गावातला उत्सव.. आठवड्याचा बाजार...!! होन्डीपच्या वाहत्या पाण्याबरोबर झरझर आठवणी त्याच्या मनात उलगडत जायच्या...!!
जेमतेम चारशे घरांचं देवळा गाव. त्यातलं एक गरीब शेतकरी कुटूंब. त्यातला हा पोरगा संतोष. ओसरी धरुन तीन खोल्यांच्या घरात आई-बाप, दोन सख्ख्या लहान बहिणी, एक चुलता, खाटेवर दिवसरात्र खोकणारी म्हातारी. वाटण्या-भांडणातून मिळवलेली साडेपाच एकर कोरडवाहू शेती आणि दारात एक आटलेली हडकुळी देशी गाय. दारातल्या कोंबड्यांची संख्या ही शेतमाल विकला की वाढणारी आणि पाहुणे किंवा गटारी गेली की घटणारी....!! कापसाचं पेमेंट आलं की चार दिवस खाटेवरच्या म्हातारीला दूधात कुस्करलेली भाकरी मिळायची. बाकी दिवस इतर घरातल्यांसारखी तिखट कालवणात.
संतोष पहिल्यापासूनच चुणचुणीत पोरगा. शाळेतले मास्तर दरवर्षी रिझल्टनंतर घरी जाताना सायकल मुद्दाम संतोषच्या घराकडे वळवायचे. दारात बसून खुरप्यांच्या मुठी दुरुस्त करत बसलेल्या बापाला आवर्जून सांगायचे. "मुलगा हुषार आहे तुमचा. लातूरला धाडा पुढे शिकवायला. ह्यावर्षीही चांगले मार्क काढलेत पोरानं." दारात राखेनी भांड्यांचा ढिगारा घासणारी संतोषची आई मोठ्या लगबगीनं परातीत हात धुवून देवासमोरची साखर घेऊन यायची आणि मास्तरच्या हातात द्यायची. ते बघून खाटेवरची म्हातारी जोरात खेकसायची.. ’आता पोतं घाल साखरेचं त्या मास्तरच्या बोडक्यावर, उधळी मेली.’ पण मास्तरला तिचा राग येत नसे. उलट संतोषच्या बापाबरोबर हसण्यावारी तिच्याकडे तो दुर्लक्ष करत असे.
मास्तरच्या सांगण्यावरून शाळा संपल्यावर जमेल तेवढा खर्च करून संतोषला लातुरला ऍग्रीकल्चरल कॉलेजात डिप्लोमा करायला पाठवलं. पण बाकी पोरांसारखं नुसतं कापूस आणि ऊस करण्यात संतोषला इंटरेस्ट नव्हता. काहीतरी वेगळं करायचं ह्या नादात त्याने फ़ुलशेती म्हणजे फ़्लोरीकल्चर करायचं ठरवलं. आता मराठवाड्यासारख्या कमी पावसाच्या आपल्या गावात ह्याचा किती फ़ायदा? पण आपल्यापेक्षा चार बुकं जास्त शिकलेल्या पोरापुढं अडाणी बापाचं काही चाललं नाही. घरातला मोठा आणि एकुलता एक मुलगा म्हणून त्याच्याकडून असलेल्या भविष्यातल्या अपेक्षांना वर्तमानात कौतुकाचं खतपाणी मिळत होतं.
क्रमश:
Subscribe to:
Post Comments (Atom)
माझ्या ब्लॉगची जन्मकथा
नारळ फुटी
बर्याच दिवसांपासुन काहीतरी लिखाण करावं असं मनापासुन वाटत होतं. कधी विषय सुचायचे पण शब्दांत उतरवायला वेळ नसायचा. कधी वेळ मिळालाच तर काय लिहाव...
-
मी स्वत:ला खूप लकी समजतो... पणजी-पणजोबा... आज्जी-आजोबा ह्यांच्याबरोबर मला खूप सहवास मिळाला. पणजीच्या ह्या फोटोमुळं खूप आठवणी एकापाठोपाठ ...
-
मी बारामतीला इंजिनीयरींगला असताना तिथे ’जाणता राजा’ नाटक आलं होतं. मराठी नाट्यसॄष्टीमधलं सगळ्यात भव्यदिव्य नाट्य... महानाट्य...!! एकाच वे...
-
माझी एक चारोळी एकदा फिरून मलाच whatsapp वर फोरवर्ड म्हणून आली. खाली माझं initial सुद्धा होतं... PJ असं...!! पण लोकं पीजे म्हणुन फोरवर्ड क...
No comments:
Post a Comment