Wednesday, May 17, 2023

पान ३ - दिग्विजयाचा चीजकेक

शाळेमध्ये भुगोलाचा अभ्यास करताना जगातल्या सात खंडांपैकी सर्वात लहान खंड म्हणून ऑस्ट्रेलियाचं नाव पहिल्यांदा ऐकण्यात येतं. आपण राहतो तो आशिया खंड सगळ्यात मोठा ह्या आनंदात आपण बाकी खंडांचा जास्त विचारही करत नाही. निळ्या जीन्सच्या मागच्या खिश्यावर ब्राऊन लेदरचा पॅच असावा तसं पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धात निळ्याशार ’हिंद महासागरा’च्या खालच्या बाजूला दिसणार्या ब्राऊन पॅचसारखा आणि संपुर्ण खंड व्यापणारा देश ’ऑस्ट्रेलिया’...!! आपले कुणीही नातेवाईक मित्र तिकडे नसले तरी अमेरिका, युरोप किंवा आशियाई देशांची आपल्याला पुसट का होईना माहिती असते. ऑस्ट्रेलिया हा अगदी ठरवून नकाशा बघावा लागेल इतका एका बाजूला असलेला पण जगातल्या राहण्यास सर्वोत्तम असलेल्या पहिल्या पाच देशांपैकी एक देश. इथली दुसरी ठळक गोष्ट म्हणजे ’कांगारू’. अगदी ’शेपटीवाल्या प्राण्यांची सभा’ ह्या बालगीतापासून ओळख असलेला ’कांगारू’ हा फ़क्त ऑस्ट्रेलियातच सापडतो. ह्या बेटावरच्या देशाचा इतिहास जेमतेम दोनशे वर्षांचा असला तरी आहे मजेशीर...!!

युरोपियन खलाश्यांच्या बोटी पंधरा-सोळाव्या शतकांत जगभर निघाल्या . जश्या त्या भारतात येऊन धडकल्या तश्याच त्या ऑस्ट्रेलियाच्या बेटावर सुद्धा पोहोचल्या. भारत आणि ऑस्ट्रेलिया, दोन्हीकडे हजारो वर्षांपासून राहणारे मूलनिवासी होते. पण दोघांच्या प्रगतीमध्ये आणि बुद्धीमत्तेमध्ये कमालीचा फ़रक होता. आधुनिकतेच्या पट्टीवरच मोजायचं झालं तर बोटीतुन आलेले युरोपियन्स दहावी झालेले असतील तर भारतात तेव्हा पीएचडीचे ग्रंथ कोळून पिऊन तल्लख बुद्धी आणि सतर्क असलेले ’छत्रपतीं सारखे’ राज्यकर्ते होते. गोर्या व्यापार्यांना तिथे येऊन स्वत:चं दुकान टाकणं तितकंसं सोपं नव्हतं. व्यापाराचं नाटक करत जवळ-जवळ अडीचशे वर्ष काढावी लागली, निरनिराळे कट रचावे लागले, नतद्र्ष्ट भावांची मदत घ्यावी लागली तेव्हा कुठे भारतावर ताबा मिळाला आणि दीडशे वर्ष राज्य करता आलं. पण बिचार्या ऑस्ट्रेलियन मूलनिवासींच्या बाबतीत हे थोडं दुर्दैवाचं ठरलं. हे दहावी झालेले ’बोटीवीर’ आले तेव्हा इथले ऍबॉरीजीनल (नेटीव्ह) अजून बालवाडीतच शिकत होते. स्वत:ची भाषा होती पण फ़क्त बोली स्वरुपातच होती. थंडी-वार्यापुरते प्राण्यांच्या कातड्याचे कपडे घालायची आणि झावळ्या-काटक्यांची खोपटी बांधायची जेमतेम बुद्धी आलेली. शेतीसाठी काळी सुपिक माती नाही, दूध-दुभत्यासाठी गाई-म्हशी नाहीत, नांगरायला किंवा गाडीला बैल-घोडा नाही...!! निसर्गाने पाळावा असा कुठला प्राणीच दिला नाही. आपल्याला लक्षात येत नाही पण हे प्राणी हे मनुष्याच्या प्रगतीचं एक मुख्य कारण आहेत.

अठराव्या शतकाच्या शेवटी शेवटी आलेल्या डच आणि मुख्यत: इंग्लिश लोकांनी इथे आल्यावर पुरता विरोध करायची क्षमताही त्यांच्याकडे नव्हती. अमेरिकेतल्या रेड इंडियन्सकडे लढवय्यी वृत्ती आणि धनुष्य-बाण-भाले होते तरी बंदूकवाल्या युरोपियन्सनी बहुतांशी जमातींना निर्वंश करुन टाकलं. तसंच काहीसं सुरवातीच्या काळात इथंही झालं. काही लाख मूलनिवासी ऍबॉरीजीनल लोकांची कत्तल झाली. बाकींना अंमली पदार्थ देऊन निरुपद्रवी करण्यात आलं. आता एकदा जागेचे मालकच निरुपद्रवी झाल्यावर महत्वाकांक्षी जगज्जेत्यांना रानच मोकळं झालं की हो. आधीचे आदिवासी आपाआपल्या बोली भाषेनुसार दीडशेहून अधिक प्रांतामध्ये विभागलेले होते. (इंडिजीनियस मॅप ऑफ ऑस्ट्रेलिया मिळतो.) पूर्वीचे असलेले एकशे छप्पन प्रांत (राज्यं) कोलनायझेशन नुसार एकत्र करून अख्खा खंड फ़क्त सात राज्यात विभागला गेला. अगदी पट्टीने आखावेत अश्या सरळ रेषांमध्ये हा ’फ़ुकटचा चीजकेक’ कापण्यात आला. ह्या भल्या दांडग्या बेटावर रस्ते, शहरं, भराव टाकून वळवलेली नदीपात्रं, चर्च, मिल्ट्रीसाठी बॅरेक्स, रेल्वेलाईन्स, जगातले कैदी आणून टाकण्यासाठी भलेमोठे तुरुंग इ. अगदी मनासारखा देश घडवायला सुरुवात झाली. जगभर निरनिराळ्या देशांवर, संस्कृतींवर, जनतेवर आणि भूखंडांवर केलेल्या प्रयोगांतुन आणि मिळालेल्या अनुभवांच्या शिदोरीतुन मिळालेला परिपुर्ण इंग्रजी विजय म्हणजे हा जवळ-जवळ ऐंशी लाख वर्ग किलोमीटरचा चीजकेक... ऑस्ट्रेलिया...!!

क्रमश:

No comments:

Post a Comment

माझ्या ब्लॉगची जन्मकथा

नारळ फुटी

बर्याच दिवसांपासुन काहीतरी लिखाण करावं असं मनापासुन वाटत होतं. कधी विषय सुचायचे पण शब्दांत उतरवायला वेळ नसायचा. कधी वेळ मिळालाच तर काय लिहाव...