Wednesday, May 17, 2023

पान ४ - स्वावलंबनाच्या नानाची टांग

रदेशात आपल्या आधी गेलेले आणि तिथुन सुट्टीत भेटायला आलेले लोकं एक सिक्रेट आपल्याला कधीच सांगत नाहीत किंवा त्याविषयी जास्त कधीच बोलत नाहीत... ते म्हणजे स्वत: करावी लागणारी घरगुती कामं. आपण आपलं त्यांचे फेसबुकवरचे गुळगुळीत-गुलगुलीत फोटो बघतो आणि हूरळून जातो. एकही NRI कधी भांडी घासताना किंवा पोछा मारतानाचा फोटो फेसबुकावर टाकत नाही. प्रत्यक्ष इथे आल्यावरच कळतं की किती आणि काय-काय कामं आपल्याला स्वत:लाच करावी लागतात ते. काही आखाती देश सोडले आणि अमेरिकेतले काही भाग सोडले तर हा नोकरवर्ग सर्वसामान्य पगारदार भारतीयाला न परवडण्यासारखाच असतो. काही काही वेळा तर एखादा इंजिनीयर काय कमावेल इतका पगार दर तासाला ह्या ब्ल्यू कॉलर जॉब्जमध्ये मिळतो.

आम्हाला आपली पुणेरी ऐशोआरामाची सवय... घरी चार-चार मदतनीस. घरकामाला एक, स्वयपाकाला दुसरे, लहान मुलांना सांभाळायला वेगळेच. सकाळी ऑफिसला जाताना सोसायटीतल्या पोर्याने कार स्वच्छ धुवून ठेवलेली. नुसते वायपर खाली घेतले की राजे कारमध्ये विराजमान होणार. सगळ्यांना मिळून संपूर्ण महिन्याला पगार वट्ट पाच ते सहा हजार रुपये. इथे म्हणजे एक तासाला तीस डॉलर्सपासून सुरुवात. काम करायला येणारी मंडळीच कारमधून येणार. ह्या गोष्टी परवडत नाही म्हणून बहुतांशी कामं ही घरी स्वत:च केली जातात. वॉशिंग मशिन, डिशवॉश किंवा व्हॅक्युम क्लिनर असतं पण शेवटी कामं स्वत:लाच करावी लागतात. आपल्याकडे दूधवाला सांस्कृतिक वारश्याचा अविभाज्य अंग केव्हाच बनला आहे पण हल्ली भाजीवाला (जो घरात चिरलेल्या भाजीचे पॅकेट टाकतो तो) दिसला तरी कुणाला फ़ार काही धक्का बसत नाही. इथे दूधसुद्धा रोज आपल्यालाच आणावं लागतं.

शिकायला बाहेर हॉस्टेलला राहिलेल्यांना घरगुती कामाचा जरा तरी अनुभव असतो. आम्ही तिथेही चैनी केलेल्या. ही पहिलीच वेळ स्वत:हून सगळं मॅनेज करण्याची. सुगरण आई आणि गृहकृत्यदक्ष बायको ह्यांच्यामुळं घरकामात मी किती ’ढ’ राहिलो आहे हे इथे आल्यावर कळलं. पहिल्यांदा वॉशिंग मशिन लावायचं तर बायकोला फोन करावा लागला. स्वयंपाकात तर टोस्ट-ऑम्लेट, भाताचा कूकर आणि चहा येवढ्याच मुलभूत गरजा ’स्वयं’ भागवता येत होत्या. एकटं आणि स्वावलंबी जगण्याच्या प्रथमा, द्वितीया, तृतिया वगैरे परिक्षा करत शिकावं लागलं. ह्या व्यतिरिक्त बागकाम, घरातलं काही बिघडलं तर दुरुस्ती, रंगकाम आणि सगळ्यात कहर म्हणजे घर बदली करताना टेंपो भाड्याने घेऊन स्वत:च चालवत सामानाची ने-आण...!! हमाली करायला दाबून पैसे मोजायची तयारी असेल तर ठीक नाहीतर तुमचे मित्र आहेतच घाम गाळायला. ते बिचारेही मुकाट्याने येतात कारण बदलीची ही वेळ प्रत्येकावर येत असते. संकटात माणसं एकमेकाला धरुन राहतात ते असं.

येवढच नाही तर इथे बाहेरचीसुद्धा बरीच कामं स्वत:ला करावी लागतात. कार घेऊन पहिल्यांदा पेट्रोल पंपावर गेलो आणि पेट्रोल भरणार्या पंपावरच्या पोर्याची वाट बघत नुसताच गाडीत बसून राहिलो. बराच वेळ कुणी आलंच नाही. मग लक्षात आलं की पेट्रोलसुद्धा आपण स्वत:च भरायचं.. आणि आत जाऊन बिल देऊन यायचं. मॉलमध्ये ट्रॉली घेऊन सामान खरेदी करायची आपल्याला आता सवय झाली आहे पण इथे बिलिंग काऊंटरसुद्धा सेल्फ बिलिंग असलेले असतात. आपणच मशिनसमोर टूंग-टूंग करायचं, पैसे मशिनमध्ये टाकायचे आणि राहिलेली चिल्लर देवळातल्या भिकार्याच्या ताटलीत आवाज करत पडते तशी आपल्या समोरच्या ट्रेमध्ये पडते.

ह्या स्वावलंबनाचा कडेलोट झाला जेव्हा माझ्या एका मित्राने केस घरीच कापायचं ’क्लिपर ग्रुमिंग किट’ मला गिफ़्ट दिलं तेव्हा. आता आरश्यात बघून स्वत:च्याच डोक्यावरची हेयर स्टाईल करायची वेळ येते का काय ह्या विचाराने माझ्या काळजात गलबललं. म्हणजे ह्या चकाचक देशात राहण्यासाठी आपल्या पुणेरी बाण्याला किती ताणायचं ह्याला काही लिमीट...!? ते काही नाही. दर दीड-दोन महिन्याला तीस डॉलर्स खर्च करुन ’चायनिज ललनेच्या’ मऊ-मऊ हातांनीच केशकर्तनविधी करुन घ्यायचा इतपत पुणेरी आब मी ठेऊ इच्छितो... बाकी काहीही असो इथे तडजोड नाही...!!

क्रमश:

No comments:

Post a Comment

माझ्या ब्लॉगची जन्मकथा

नारळ फुटी

बर्याच दिवसांपासुन काहीतरी लिखाण करावं असं मनापासुन वाटत होतं. कधी विषय सुचायचे पण शब्दांत उतरवायला वेळ नसायचा. कधी वेळ मिळालाच तर काय लिहाव...