वेस्टर्न ऑस्ट्रेलियामध्ये; ’पर्थ’ आकाराने छॊटं नाही पण कमी लोकसंख्येचं एक आधुनिक खेडेगाव आहे. एका प्रदेशतज्ञांच्या मते (म्हणजे मीच हो.) ऑस्ट्रेलियात; सिडनी हे ’मुंबई’ आहे, मेलबर्न हे ’पुणं’ आहे आणि पर्थ हे ’रत्नागिरी’ आहे. उत्तर-दक्षिण टोकं शंभर सव्वाशे किलोमीटर भरतील आणि पश्चिम समुद्र किनारपट्टीपासून पूर्वेकडचं शेवटचं फ़ार्महाऊस अंदाजे पन्नास किलोमीटरवर असेल. येवढ्या ऐसपैस पसरलेल्या क्षेत्रफ़ळात एकूण लोकसंख्या फ़क्त वीस लाख आहे. भारताच्या अडीचपट मोठ्या असलेल्या, एक सबंध खंड व्यापलेल्या ह्या ऑस्ट्रेलिया नामक बेटाची एकूण लोकसंख्या अडीच कोटीपेक्षा कमी आहे. मी सहज गंमत म्हणून लोकसंख्येची घनता बघत होतो, ती भारताशी तुलना केल्यास हसावं की रडावं हेच कळेना. एका गंमतीशीर उदाहरणात सांगायचं झालं तर ऑस्ट्रेलियात एका (स्क्वेअर किलोमीटरच्या) घरात २.८* (तीनपेक्षा कमी) लोकं राहात आहेत... आणि भारतात तेवढ्याच घरात ४४०* लोकं राहात आहेत. एकाच मिनिटांत आपल्या प्रॉब्लेम्सचा, लोकसंख्येचा, गर्दीचा, राजकारण्यांचा राग कमी झाला की नाही...!? अहो घरात जर येवढी लोकं एकत्र राहायला लागली तर थोड्याफ़ार कुरबुरी होणारच. भांड्याला भांडं लागणारच. त्यामानाने आपण खरोखरच खुप सलोख्याने आणि मिळून मिसळून राहतो अहो. जरा ह्या दॄष्टीकोनातुन विचार करुन बघा नं...!!
त्यात अजून एक मोठी मेख आहे. इथे कमावलेल्या प्रत्येक डॉलरमधला कमीतकमी वीस टक्के कर (टॅक्स) हा सरकारकडे भरावाच लागतो. तुमच्या वाढत्या मिळकतीप्रमाणे हा अगदी पन्नास टक्क्य़ांपर्यंत जातो. आपल्यासारखं कर बुडवणं, वीमा पॉलिसी, भाड्याच्या नकली पावत्या, मेडिकल बिलं आणि काय-काय झोलझपाटा केलेली कागदपत्रं लावून तो टॅक्स वाचवता येत नाही. सरकार कडे जमा झालेल्या टॅक्समधून अफ़रा-तफ़र बर्याच कमी प्रमाणात होते. नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त व्यवहार हे कार्ड आणि ऑनलाईन होत असल्याने भ्रष्टाचाराला आपोआपच आळा बसतो. चलनामध्ये सगळ्यांत मोठी नोट शंभर डॉलर्सची आहे. त्यामुळे ’हजारच्या नोटांचं एक बंडल दडवलं की एक पेटी गायब’ असं होत नाही. म्हणजे येवढे पारदर्शी व्यवहार करुन, सरासरी तीस-पस्तीस टक्के टॅक्स कापून, फ़क्त अडीच कोटी जनता एका महाकाय बेटावर पोसायची असेल तर का चकाचक दिसणार नाही हो हे देश...!?
पण फ़क्त येवढीच कारणं नाहीत हे देश सुंदर आणि चकचकीत दिसायची. समाजात राहणारा प्रत्येक घटक आपापली जबाबदारी उचलत असतो. वाहतुकीचे नियम पाळण्यापासून ते रस्त्यांवर कचरा न करण्यापर्यंत आणि जिथे-तिथे फ़क्त स्वत:चा स्वार्थ न बघण्यापासून ते थोडासा पॉझिटिव्ह मूड ठेवण्यापर्य़ंत अगदी बेसीक गोष्टीं आत्मसात करण्याची गरज आहे. ट्रॅफिकमध्ये नुसतं एकमेकांवर डाफ़रणं बंद केलं तरी किती ताण कमी होतो हे अंमलात आणुन बघा. रस्त्यावर ’पेहेले आप’ हा इथला एक असाच सोपा नियम. तुम्ही एकाला जाऊ दिलंत तर त्याच्या मागचा मध्येच घुसून गैरफ़ायदा घेत नाही. एकमेकाला अल्टरनेट जाण्याची संधी देऊन हा प्रश्न अगदी सहज सुटू शकतो. मुळात जिथे जायचंय तिथे वेळेच्या थोडं आधी निघालं तर आपोआपच धांदल कमी होते. घुसायची विनाकारण घाई होत नाही.
एखाद्याच्या घरी गेलं की त्याच्याकडच्या वस्तु, फ़र्निचर मांडणी आणि इंटेरियर बघून आपण नकळत त्याची आपल्या स्वत:च्या घराशी तुलना सुरु करतो. हे सगळं असंच आपल्या घरीसुद्धा असावं असं वाटतं तशीच आहे ही भावनासुद्धा. येवढ्या गौरवशाली इतिहासाचे गोडवे तेव्हाच शोभतात जेव्हा तुम्ही वर्तमानातही तेवढेच ऐश्वर्य आणि संपंन्नता टिकवून असता. मातृभुमीपासून काही काळ दूर राहिल्यावर लोकांचं देशप्रेम का उफ़ाळून येत असावं याचं उत्तर मला ही सगळी परिस्थिती जवळून पाहिल्यावर लक्षात आलं...!!
क्रमश:
No comments:
Post a Comment