Wednesday, May 17, 2023

पान ५ - वार्धक्यआसनचक्री

वेस्टर्न लाईफस्टाईलमध्ये स्वावलंबी (सेल्फ़ डिपेंडंट) होणं हा एक घेण्यासारखा गुण असतो. वयाच्या पंधराव्या वर्षी ही लोकं जे घर सोडून बाहेर पडतात ते थेट ’ओल्ड एज केयर’मध्येच दी एंड...!! मधला सगळा प्रवास शक्य तेवढ्य़ा ठिकाणी कुणावरही अवलंबून नसण्याकडेच कल असलेलं आयुष्य असतं. अगदी वयस्कर लोकं की ज्यांना चालतासुद्धा येत नाहीये असेही ’बॅटरी ऑपरेटेड व्हिलचेयर’वरुन त्यांना पाहिजे तिथे फ़िरत असतात. ही व्हिलचेयर अतिशय अद्ययावत अश्या सोईंनी बनवलेली असते. आजिबात कष्ट पडणार नाहीत अशी एक हलकी जॉय स्टीक वापरुन मोटारने पुढे, मागे, बाजूला अशी करता येते. बसायला अगदी कारसीटसारखी कंफ़र्टेबल सीट तर असतेच, पुढे-मागे आणि सीटखाली अश्या सामान ठेवायला बास्केट्ससुद्धा असतात. एक छोटा लाईट, हॉर्न आणि लांबून येणार्या वाहनांना रस्ता ओलांडणारी चेयर दिसावी म्हणून एक फ़डकणारा फ्लॅग देखील असतो. काही-काही व्हिलचेयर्सना तर वरुन ऊन-पाऊस लागू नये म्हणून शेडसुद्धा असते. एकदा आम्हाला अगदी कारप्रमाणे विंडो, समोरची काच, त्यावर वायपर इतकी अद्ययावत व्हिलचेयर दिसली. आतमध्ये आजोबा सिग्नलला रस्ता क्रॉस करायला थांबले होते.

सगळीकडे रस्ते, फुटपाथ, वॉकवे आणि दोन लेव्हल जोडणारे रॅम्प असल्याने ही चेयर चालवायला कु्ठेही अडचण येत नाही. कुठल्याही दुकानात, मॉलमध्ये, दवाखान्यांमध्ये, हॉटेलमध्ये... सगळीकडे... शब्दश: सगळीकडे रॅम्पची सुविधा हे इथल्या बिल्डींग नियमानुसार असणं सक्तीचं आहे. रस्ता क्रॉस करण्यासाठी चालणारे आणि अश्या चेयरवर असणार्यांसाठी प्रायॉरिटी लेन्स असतात. म्हणजे कुणी रस्ता क्रॉस करण्यासाठी उभे असलेले दिसल्यास वाहन थांबवणं आणि त्यांना प्रायॉरिटी देणं हा नियम आहे. मॉलमधल्या टॉयलेट्समध्ये ह्या चेयरसकट जाणासाठी डिसेबल टॉयलेट्स वेगळी असतात. येवढंच काय ही चेयर घेऊन बसमध्ये जाता येतं. बसचा ड्रायव्हर सस्पेन्शन प्रेशर वापरुन बस एकीकडे झुकवतो, बसच्या दारातुन एक रॅम्प बाहेर येतो आणि ही चेयर त्यावरुन बसमध्ये चढवता येते. रेल्वेचा प्लॅटफॉर्म आणि रेल्वेचं फ्लोअर एकाच पातळीत असल्याने ही चेयर सहज रेल्वेमध्ये घेऊन जाता येते. बस किंवा रेल्वेमध्ये एक मोकळा चौकोन ह्या चेयरसाठी राखीव असतो.

मी संध्याकाळी ऑफ़िसातुन आल्यावर वॉक घ्यायला बाहेर जात असे. तिथुन येताना रात्रीच्या जेवणाची सोय किंवा दूध घेऊन येणं हा माझा नित्यक्रम. मी घरातुन निघताना समोरच्या आजोबांना त्यांच्या ह्या ’वार्धक्यआसनचक्री’वर बसून घराबाहेर पडताना बघितलं. चालत थोड्या अंतरावर गेलो तर ते आजोबा रस्ता क्रॉस करत होते. तिथुन पुढे गेलो आणि सहज मागे बघितलं तर मॉलमध्ये ह्यांचा रथ शिरताना दिसला. अर्धा पाऊण तास फ़िरुन परत आलो तेव्हा हे त्यांच्या बास्केट भरभरुन दूध, फ़ळं, भाज्या आणि बाकी सामान घेऊन पार्किंग क्रॉस करताना दिसले. आणि मी चालत घरी पोचून कुलूप उघडेपर्यंत बाल्कनीत आपल्या कुत्र्याला नविन आणलेलं डॉग फुड भरवताना दिसले. तास-सव्वा तासात म्हातारबुवा सगळा गाव पालथा घालून, स्वत:ची आणि कुत्र्याची सोय करुन अगदी सेफ अँड साऊंड घरी परत आले होते.

एक क्षण विचार आला... आपल्या देशात असे किती वयस्कर लोक आहेत ज्यांना अगदी थोड्या-थोड्क्या कारणांसाठी दुसर्यांवर अवलंबून राहावं लागतं. कधी आपल्या आईला ट्रॅफिकमधून गाडी चालवता येत नाहीये ह्या कारणासाठी तर कधी ह्या ट्रॅफिकचा ताण सहन होत नाही म्हणून वडिलधार्यांना कुणालातरी बरोबर घेऊन जाण्यासाठी विनंत्या-आर्जव करावे लागतात. ते लोकं व्हिलचेयरवर जाण्याच्या आधीच कितीतरी वेळा हतबल होतात. ह्या गोष्टीला आपल्याकडे वय वाढत जाणार्या लोकांचं मानसिक बळ कमी पडतं तेवढंच ह्या स्वावलंबनासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा कमी पडतं. रस्तेच धड नाहीत तिथं त्यावर फुटपाथला जोडणारे रॅम्प कधी होणार. फुटपाथच फेरीवाल्यांनी अडवलेत तर त्यावरुन ही ’वार्धक्यआसनचक्री’ फिरवणार तरी कशी...!?

जी गत ह्या व्हिलचेयर्सची तिच लहान बाळांच्या प्रॅम्सची. पण हल्ली आपल्याकडे बाळांना वापरल्या जाणार्या बाबागाड्या (प्रॅम्स) स्टाईल आणि बाळांचं कौतुक म्हणून धडपडत का होईना वापरल्या जातात. प्रश्न आहे तो काळाने गोंडसपणा काढून घेतलेल्या ह्या मोठ्या बाळांचा... त्यांनाही तेवढीच गरज आहे ह्या सगळ्या कंफर्टची. आयुष्यातला प्रत्येक क्षण आपण कष्टात काढतो तो पुढचा येणारा क्षण सुखाचा मिळावा ह्या आशेवर. तिथेही हीच हतबलता असेल तर मात्र विचार करण्याची गरज आहे... आणि गरज आहे युद्धपातळीवर ही परिस्थिती बदलून टाकण्याची...!!

क्रमश:

No comments:

Post a Comment

माझ्या ब्लॉगची जन्मकथा

नारळ फुटी

बर्याच दिवसांपासुन काहीतरी लिखाण करावं असं मनापासुन वाटत होतं. कधी विषय सुचायचे पण शब्दांत उतरवायला वेळ नसायचा. कधी वेळ मिळालाच तर काय लिहाव...