पाश्चात्य संस्कॄतीमध्ये स्वावलंबी होणं हा एक घेण्यासारखा असला तरी त्यातुन येणारा व्यवहारीपणा आणि तुटकपणा हा कधी-कधी फ़ार डेंजर असतो. पोरगं पंधरा-सोळाव्या वर्षी शाळा संपल्यावर जे घर सोडून बाहेर पडतं ते बाहेरच. तिथूनच त्यांना एकटं, स्वतंत्र आणि स्वावलंबी राहण्याची सवय पडते. आयुष्याचे एकेक अनुभव घेत, एकट्याने टक्के टोणपे खात आयुष्याची दूपार ओलांडलेल्या गोर्या माणसाबरोबर गप्पा हा एक अजब अनुभव असतो. माझ्या घराशेजारी असाच एक वयस्कर गृहस्थ राहात होता. वयाची पासष्ठी ओलांडली असली तरी चांगला हट्टाकट्टा होता. दुसर्या गावाला राहण्यार्या दोन मोठ्या मुली आणि चार-पाच नातवंडं असा परिवारही होता. बायको सोडून गेली असावी, कधी दिसली नाही. पण ह्याचं अगदी ’एकला चालो रे’ लाईफ़ होतं. सकाळी साडेसहा वाजता घराबाहेर गार्डनींग करण्यापासून त्यांचा दिवस सुरु व्हायचा. भर दुपारी बर्म्युडा, टी-शर्ट, कॅप आणि पायात स्पोर्टस शुज घालून मस्तपैकी मॉल फ़िरुन भरपूर शॉपिंग करुन यायचा. वेळच्या वेळी जेवण, रोज संध्याकाळी बियर आणि बरोब्बर सात वाजता रात्रीचं जेवण. रात्री आठ वाजल्यानंतर तो घराबाहेर कधीच दिसणार नाही.
एकदा घरातून भरपूर जुनं सामान, कचरा आणि वस्तू बाहेर ठेवताना दिसला. नेहमीप्रमाणे हाय-हॅलो झाल्यावर त्याला विचारलं,
’आज काय घर आवरायला काढलंय का? कुणी येणार आहे का?’
तर मला म्हणला, ’माझ्या मुली आणि नातवंडं येणार आहेत. मागच्या ख्रिसमसला जमलं नाही म्हणून आत्ता येणार आहेत.’
मी म्हणलं,’अरे वा.. मग तु एकदम खुष असशील..!? (हो, इथे सत्तरीच्या माणसांनादेखिल नावाने आणि एकेरी बोलावण्याची पद्धत आहे.) आता नातवंडं भेटणार, मजा करणार मग तुम्ही सगळे एकत्र...!’
मला तो म्हणला, ’कसलं काय... ती पोरटी (मी ’पोरटी’ हा बराच सोज्वळ शब्द वापरला... प्रत्यक्षात तो ’लिटील बास्टर्ड्स’ म्हणाला.) आली की नुसता दंगा घालतात. सामानाचं नुकसान करतात. माझं सगळं रुटीन डिस्टर्ब करून टाकतात...!! वर खर्च करावा लागतो तो वेगळा...!!’ त्याची प्रतिक्रिया बघून मी अवाकच झालो. मुली आणि नातवंडं भेटणार ह्यापेक्षा ह्याचं सामानाचं नुकसान होणार, रुटीन डिस्टर्ब होणार ह्याची खंत त्याला जास्त होती. त्यात ह्या म्हातार्याला महागडी अँटिक घड्याळं आणि आर्टीफॅक्टस गोळा करायचा छंद होता. त्या वस्तू सांभाळताना त्याला त्याची स्वत:ची नातवंडं सुद्धा त्रासदायक होत होती. त्याच्याकडे बघून माझं मन टाईममशिनमध्ये बसून वीस-पंचवीस वर्ष मागे गेलं. माझ्या लहानपणात...!!
लहानपणी उन्हाळ्याची सुट्टी लागली की आम्ही मामाच्या गावाला जायचो. परिक्षा संपण्यापेक्षा आता आजोळी जायला मिळणार ह्याचं अप्रुप जास्त असे कारण रेल्वेनी जायला मिळायचं... गेल्यावर दारातच उभं करून भाकरीचा तुकडा ओवाळून टाकून डोळ्याला पाणी लावणारी आज्जी, आल्या-आल्या लगेचच ’चप्पल असू दे रे पायात, आंबे घेऊन येऊ लगेच, थांबलोय तुझ्यासाठी’ म्हणत खांद्यावर हात टाकून मंडईत घेऊन जाणारा मामा. ’तुमच्या सगळ्यांच्या लाडाने बिघडेल बरं का तो...!!’ हे दिवसातुन तीन वेळा येणारं आईचं वाक्य आणि ’असू देत गं. लहान आहे तो अजून’. असं म्हणत तिला गप्प करणारे आजोबा, चाळीमध्ये भेटणारे सिझनल मित्र-मंडळी, दंगा करण्यासाठी पाण्याचा हौद, पहाटे येणार्या वासूदेवापासून ते दुपारी येणार्या कल्हई वाल्यापर्यंत सगळ्या संस्कॄती रक्षकांचं दर्शन, संध्याकाळी मुरलीधराच्या देवळातली किर्तनं आणि रात्री आज्जीकडून पाठीवरून हात फ़िरवून घेत चांदण्या मोजत लागणारी डूलकी...!! जोडीला दिवसभर आंबा, कैर्या, हरभरा आणि बोरांचा खुराक. कशाला वाटेल सुट्टी संपावी म्हणून...!!?
’नातू म्हणजे काय... दुधावरची साय’ म्हणणारे आजोबा आणि ’हियर कम लिटील बास्टर्ड्स’ म्हणणारे ग्रँडपा... दोन संस्कृतीमधला कधीच न भरुन येणारा फ़रक...!!!
क्रमश:
No comments:
Post a Comment