इंजिनीयरिंग संपल्यानंतरच्या आठ वर्षातला तिसरा जॉब. पहिल्या दोन नोकर्या दोन वर्षात बदललेल्या. आता सहा वर्ष एकाच नोकरीत असणं हा आमच्या पिढीला उगीचच कमीपणा वाटतो. पुर्वी कसं नोकरी पकडली की तिथूनच रिटायर... घर घेतलं की त्याच घराच्या भिंतीवर फ़ोटोत जाईपर्यंत तिथंच... इतकंच काय, हातात घालायचं घड्य़ाळ एकदा लग्नात सासर्याकडून मिळायचं आणि दुसर्यांदा रिटायर झालं की ज्येष्ट नागरिक संघाच्या मित्रांकडून. अधे-मधे ह्या गोष्टींवर एनर्जी खर्च करायचा मामला नाही. एकच डिसिजन; लाईफ़ टाईम. मला वाटतं पुढची पिढी ह्यालाच पालूपद जोडून आमच्याबद्दल म्हणेल... "पुर्वीच्या पिढीचं बरं होतं... एकच लाईफ़ पार्टनर; आयुष्यभर खेळ खल्लास...!!" असो. (ही असली दु:खं आमच्याबरोबरच जायची...!!)
हां तर सहा वर्ष एकाच कंपनीत काढल्यामुळे एक प्रकारची अस्वस्थता आली होती. वैराण अंदमानच्या बेटावर हैराण जन्मठेपेत अडकून पडलो आहोत... जेलर बेरी सदॄश दिसणारा हा आपला मॅनेजर घाण्याभोवती आठ-दहा तास फ़िरवून फ़क्त तेल काढून घेऊन इंग्लंड्च्या राणीचा खजिना भरण्यात मग्न आहे असलं जबरा फ़िलींग आलं होतं. काही महिन्यातच हे द्वैत ओघळलं जेव्हा आमचा ’जेलर बेरी’च नोकरी सोडून दुप्पट पगारावर पुण्याहून बंगलोरला शिफ़्ट झाला. मग तर अजूनच एकटेपणा वाढला. राग काढायचा हक्काचा माणूसच सोडून गेला... ते पण दुप्पट पगारावर...!! च्यायला आपणच असे कसे कमनशिबी ह्या सेल्युलर जेलमध्ये कुजत पडलोय...!?
ते काही नाही... हार मानणं आपल्या रक्तातच नाही. एरवी आपण बरं आणि आपलं ’लोन’ बरं असल्या निरुपद्रवी अवस्थेत असलेला मराठी माणूस दुसर्याला मिळालेल्या पैश्याकडे बघून जेवढा चवताळून उठत असेल तेवढा कदाचित हातात तलवारीसारखी काठी देऊन ’हर हर महादेव’ म्हणल्यावरसुद्धा होत असेल की नाही शंका आहे. नोकरी.कॉम, LinkedIn, मॉनस्टर.कॉम आणि अन्य सापडतील तितक्या जॉब पोर्टल्सवर आपल्या प्रोफ़ाईलच्या जवळपास जाणारे सगळे जॉब्ज टेपायला सुरुवात केली. त्यात नविन नोकरीच्या कक्षा मी ठरवून घेतल्या होत्या. एकतर पुण्यनगरीमध्येच किंवा थेट भारताच्या बाहेर...!! जायचं तर स्प्लेंडरवर जाणार नायतर डाय्यरेक्ट विमानच...!! मध्ये-अधे भानगडच नाय पाहिजे. पुण्यात स्वत:चं घर व्हावं येवढीच मध्यमवर्गीय़ मह्त्वाकांक्षा घेऊन कमावायला सुरुवात केलेली. घर झालं, घरात किचन ट्रॉलीपासुन सगळं इंटेरियर झालं, एलसीडी झाला आणि ’केक पे चेरी’ म्हणतात तशी सुफळ संपुर्णता म्हणून बेडरुममध्ये एसीसुद्धा लावून झाला. मध्यमवर्गीयांच्या घरात ह्याच्यापुढे अजून काय करणार...!? हा उबदार कोष सोडून जायचं तर डॉलर्ससाठीच...!!
शंभरावर नोकर्यांच्या दारावर धडका देऊन झाल्या... त्यात पंधरा-सोळा जणांनी दार उघडून ’आगे जाव’ सुद्धा सांगितलं. थकलेल्या प्रोफ़ाईलने आणि व्यंगलेल्या माऊसने दारं ठॊठावणं सुरुच होतं. अचानक एक दार खाडकन उघडलं... नशिबाचं...!! साध्या सिंपल नोकरी.कॉमवरुन अर्ज डकवलेल्या एका ऑस्ट्रेलियन कंपनीचं बोलावणं आलं. शर्टाची इस्त्री आणि डोक्यावरचा भांग न विस्कटता रीतसर राजीनामा देऊन आधीच्या अन्नदात्याची रजा घेतली. निरनिराळे इंटरव्युव, विसा ऍप्लिकेशन्स, कागदपत्रांची जमवाजमव, इंग्लिशपासून बर्याच परिक्षा इत्यादी सुरु असलेल्या पाच-सहा महिन्यांच्या कंटाळवाण्या इमिग्रेशनच्या बाळंतपणानंतर व्हिसा लेबल माझ्या पासपोर्टवर झळाळू लागलं. घरी आनंद... विमानी आनंद... आनंदी-आनंद Money-डॉलरी...!! भलामोठा ग्रीन सिग्नल डोक्यावर लागला. येथासांग शॉपिंग झाली, सगळी तयारी झाली आणि मी माझ्या पहिल्या-वहिल्या परदेशगमनाची एखाद्या नवप्रेमीसारखी अधिरतेने वाट बघू लागलो.
नोकरीधंद्यासाठी ’साता’ नाही पण ’एका’समुद्रापार जाणारा आमच्या घराण्यातला मी पहिलाच ’महापुरुष’ त्यामुळे सगळ्यांनाच उत्सुकता होती. एयरपोर्टवर सोडायला घरची झाडून सगळी मंडळी हजर. एखाद्या सासरी जाणार्या मुलीची पाठवणी करावी तशी माझ्या बायकोनेच माझी पाठवणी केली. शॉपिंग आणि पॅकिंग दोन्ही तिनेच केलं. आधी ऑस्ट्रेलियाला जॉब मिळालाय म्हणलं की मला भेटणारा प्रत्येक जण सिडनीच्या नातेवाईकाचा संदर्भ द्यायचा. मी सगळ्यांना कळवळून सांगत होतो... सिडनीहून तीन हजार किलोमीटर लांब... अगदी दुसरं टॊक आहे...!! हे म्हणजे पुण्या-मुंबईत राहून एकीकडे इराणला किंवा दुसरीकडे बिजिंगला भेटायला गेल्यासारखं आहे. त्यावर काही लोकं लगेच... अरे हो पण एकच देश आहे नं... सिडनीला जाशीलच की कधी... तेव्हा भेट...!! अहो पण सिडनी नाही, वेस्टर्न ऑस्ट्रेलियाला मिळालाय जॉब... पर्थ... पर्थ...!! ऐकलंय का कधी नाव...!!?
क्रमश:
No comments:
Post a Comment