बाहेर जायचं म्हणून तयार होऊन गेला सव्वा तास बाहेर बसलोय... ह्या दोघींची वाट बघत. काय करत आहेत देव जाणे. मित्राकडे आरती प्रसादाला जायचं आहे.
हिची वॉक इन रॉब मधून जोरात किंकाळी.. 'आईsss गं..!!' पाठोपाठ दोन तीन वेडेवाकडे आवाज. मी घाबरून दारावर नॉक केलं तर समोर येऊन कसनुसा चेहरा करत माझ्यापुढे कान केला आणि नुसतं 'हं...' येवढाच हुंकार दिला.
लालबुंद झालेल्या कानावरून मगाचच्या आवाजाचा तर्क लागला. मी ते कानावर पावणे दोन फूट लांब लटकणारं कानातलं एका झटक्यात अलगद काढलं... आणि तिच्या हातात देऊन विजयी मुद्रा करून कौतुकाची वाट बघायला लागलो.
आमच्या सूपरहिरोकृत्याचं कौतुक राहूद्या... उलट समोर महारागीटमुद्राच दिसायला लागल्यावर पामरास अचम्बा जाहला..!!
आता महत्प्रयासाने कानात घातलेल्या त्या अडीच किलोच्या कानातल्याचा फक्त चाप लावायचा आहे हे नुसत्या हुंकारावरून कसं कळणार ना...!?
प्रणव

No comments:
Post a Comment