Sunday, June 25, 2017

मी आणि माझं फिटबँड


सकाळी उठून सगळं आवरून झाल्यावर ऑफिसला जाताना फिटबँड हातात घालतो.

गाडीत कट्यारची गाणी लावून मधाळ कॉफी पित ड्रायविंग करताना स्टेरिंगवर तबला वाजवत जातो. तबल्याच्या स्टेप्स फिटबँड मध्ये पडतात.

ऑफिसात डीप टी बॅगचा चहा करताना हात खाली वर होतो. फिटबँडला वाटतं मालक पळतंय. टुणूक आवाज करून स्टेट्स लाईन नाचवतो. एका कपात तीनशे स्टेप्स दाखवतो. मी चहात तीन चमचे साखर घालून खडे चम्मच की चाय पितो.

दिवसात दोन तीन चहाच्या नावे पाच सहाशे स्टेप्स सहज करतो. मिट्ट चहाबरोबर क्रीम बिस्किटं अगदी भारीच लागतात ब्वा. चार पाच तरी बुडवतो.

घरी येताना पुन्हा तबल्यावर दोन अडीचशे स्टेप्स करतो.

मधल्या तासांत खाल्लेली चीज सँडविच, मफिन्स, स्नॅक बार आणि चीज केक फिटबँडला कळू देत नाही. विकांताला पार्टीत केलेलं अभक्ष भक्षण आणि अपेयपान फिटबँड कुठे बघणार..!?

रात्री झोपायच्या आधी फिटबँड काढून ठेवतो. त्या येड्याला वाटतं मालक झोपलं. मग रात्री साडे अकरा बारा वाजेपर्यंत फेसबुक, व्हाट्सअँप आणि बाकी ऍप वर टाईमपास करतो... फोन अगदी तोंडावर पडायला लागेपर्यंत...!!

आठवड्याच्या अखेरीला फिटबँड कडून विकली हेल्थ रिपोर्ट येतो. रोजच्या ऍव्हरेज दहा हजार स्टेप्स, डेली चार हजार कॅलरीज अगदी सहज बर्न आणि रोज नऊ तासांची डीप स्लिप...!! मालक लै भारी... असंच सुरु ठेवा... लै हेल्दी लाईफ स्टाईल आहे बघा तुमची...!!

मी जाम खुश होतो आणि पुन्हा फोन उचलून फेसबुकवर पोस्ट लिहायला घेतो..!!

निरोगी प्रणव.

No comments:

Post a Comment

माझ्या ब्लॉगची जन्मकथा

नारळ फुटी

बर्याच दिवसांपासुन काहीतरी लिखाण करावं असं मनापासुन वाटत होतं. कधी विषय सुचायचे पण शब्दांत उतरवायला वेळ नसायचा. कधी वेळ मिळालाच तर काय लिहाव...