Monday, May 22, 2017

अविस्मरणीय Landing..!

          मातृभूमीकडे सुरु झालेला आजचा प्रवास एकदमच स्पेशल सुरु झालाय... अजून बरंच आहे पण गेल्या चोवीस तासांत आलेले प्रेमाचे अनुभव बघता सुरुवात तर एकदम स्पेशल झाली आहे नक्की...!!

          सिंगापूर एयरलाईन म्हणजे खाण्या'पिण्याची' एकदम चंगळ असते. स्प्रिंग वॉटर पासून बटर, क्रोसेंट, फ्रुट डिश, चीज क्यूब, क्रॅकॆर्स ते अगदी सॉल्ट-पेपर-शुगर पाऊचेस, निरनिराळे चमचे, फोर्कस आणि नाईफ... अगदी टुथपिक सुद्धा. मेन कोर्समध्ये तुम्ही सांगाल ते.
एशियन मेन्यू मध्ये बेचव ऑम्लेट, सप्पक चिकन करी आणि उकडलेले मश्रुम खाऊन कंटाळा आला होता. वेगळं काहीतरी म्हणून इंडियन ऑर्डर केलं. हो... बाहेर गेल्यावर शक्यतो मी इंडियन खात नाही. कारणं दोन.. एक तर घरी खायला मिळतं आणि बाहेर घरच्यासारखं मिळत नाही.
इंडियन मेनू मागवला तर बाकी साग्रसंगीत पदार्थाबरोबर हैदराबादी चिकन करी राईस, दही घालून कोशिंबीर, भरपूर ड्रायफ्रूट घालून शेवयाची खीर आणि कडेलोट झाला ते छोट्या पॅकेटमध्ये 'कोरिएंडर कोकोनट सॅलड ड्रेसिंग'... कोथींबीर-नारळ-लसूण घालून केलेली चटणी हो... तुला सांगतो पुरुषोत्तम... मन इतकं भरून आलं ना की घास घश्यातून खाली उतरेना..!!


          मुंबई विमानतळावर उतरलो तर आमचे उदय भगवान सकाळी साडे सहा वाजता मला रिसिव्ह करायला आले. रिक्षात घालून आपल्या पार्ल्यातल्या घरी घेऊन गेले. खरं फेबुवरची ओळख आणि ही प्रत्यक्ष पहिलीच भेट. इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्यावर अनघा काकूनी गरमा गरम थालीपीठ, लोण्याचा गोळा, दही, लोणचं असा खमंग ब्रेकफास्ट समोर आणला.  आग्रह करकरून सकाळी साडेसात वाजता गरम-गरम थालीपीठ... अहाहा... 'उदयकाका के लिये ऑस्ट्रेलिया में आठ दिन का रहना और खाना फ्री' बुक झाला असली जालीम टेस्ट...!!

         तिघांशी मस्त गप्पा मारून मी पुण्याच्या कॅबमध्ये बसलो... उरलेल्या झोपेची थकबाकी गोळा करत... पुण्याच्या दिशेने घाट चढत जाणार्या एक्स्प्रेस वेवर... लोणावळ्याच्या थंडगार झुळुका अंगावर घेत... 'अन्नदाता सुखी भव'चे भाव चेहर्यावर ठेऊन...!!!
आमेन.

प्रणव.

No comments:

Post a Comment

माझ्या ब्लॉगची जन्मकथा

नारळ फुटी

बर्याच दिवसांपासुन काहीतरी लिखाण करावं असं मनापासुन वाटत होतं. कधी विषय सुचायचे पण शब्दांत उतरवायला वेळ नसायचा. कधी वेळ मिळालाच तर काय लिहाव...