Tuesday, May 23, 2017

एप्रिल फुल

         

             माहितीये तुम्हाला खोटं वाटेल. एप्रिल फुल वाटेल. आज तारीखच मूर्खांची आहे त्याला कोण काय करणार? सबळ पुरावा म्हणून फोटो टाकतोय. पुन्हा बोलायचं काम नाय. कोण बोललं तर गेलं उडत. आज कुणाची फिकीर नाही. कुणाला विचारायचं नाही की सांगायचं नाही. आपण चाललो हा सगळा फालतूपणा सोडून. महिन्याच्या सुरवातीला सॅलरी क्रेडिटवाला एक sms आणि महिनाभर औकातीप्रमाणे येणारे छोटे-छोटे sms आणि आटत जाणारा बॅलन्स... विट आला होता ह्या 'सुलभ हपत्यांमध्ये' जगण्याचा. बैलाचा घाणा नुसता. ह्या: संपला एकदाचा वनवास. आता एकदम फिकर नॉट. हे शेवटचं टाकतोय एक उपचार म्हणून..!!

          नायतर २६ किलो सोन्याचा दगड सापडल्यावर ढुंकून तरी बघेल का कोण? हेलिकॉप्टर तर केव्हाच घेतलंय. कॅसिनो मधला एक्झिक्युटिव्ह लाऊंज एक वर्षभरासाठी बुक करून टाकलाय. एक लिमो आणि दोघी बार टेंडर्स ब्राझिलियन एक आणि एक जॅपनिझ (ही एक बर्याच वर्षांपासूनची फँटसी होती आपली) काय हवं नको त्यासाठी.
          
          साली मध्यमवर्गीय चणचण डॉलर्स आल्यावर तरी संपेल असं वाटलं होतं पण आपली खाज गप्प बसू देईल तर ना. दोन गाड्या, दोन घरं.. मग चार हप्ते आलेच. पुन्हा नवाबी थाट करायला पाहिजेत. हॉटेलींग पाहिजे, ट्रिपा काढायच्यात, इकडं तिकडं हिंडायचं आहे. सगळं भागलं पाहिजे ना एका पगारात. का नाही दर महिन्याच्या अखेरीला जीभ सुकून टाळूला लागणार?
गेली एकदाची पिडा. आता एकदाच काय ते जगून घेणार. युरोपचा सीरिया व्हायच्या आत एकदा बघून घ्यायला पाहिजे, अमेरिकेचा व्हिसा पुढच्या वर्षी संपतोय त्याच्या आत एकदा तर जाऊन आलं पाहिजे, किलीमांजारो वरून टांझानियाचं पठार बघायचं राह्यलंय.. आणि सगळं फिरून लास वेगसच्या हव्या नको त्या सगळ्या चैनी करायच्या राह्यल्यात.
झालं आता तेच करायचं. लिस्ट वाली बकेट आता आईस बकेट चॅलेंज सारखी बद्दकन डोक्यावर ओतून घेणार आहे...!!

चला... निघालो आता. वाट बघू नका. आता काय तोंड बघत नाही मी तुम्हा डाऊन मार्केट लोकांचं... हा मी गेलो उडत..!! बाय रे तुमच्यामारी तुमच्या..!!

प्रणव.

No comments:

Post a Comment

माझ्या ब्लॉगची जन्मकथा

नारळ फुटी

बर्याच दिवसांपासुन काहीतरी लिखाण करावं असं मनापासुन वाटत होतं. कधी विषय सुचायचे पण शब्दांत उतरवायला वेळ नसायचा. कधी वेळ मिळालाच तर काय लिहाव...