Tuesday, May 23, 2017

शेफ़ प्रणव

          माहित नाय तुम्हाला काय तीर मारलाय मी ते.. ह्या वर्षीची सगळ्यात मोठी अचिव्हमेंट... आज मी चक्क कटाची आमटी केली. आईने शिकवली. (आता मी केली म्हणजे काय... हात माझे आणि करणारी आई..)
कुकरी शोमध्ये प्रशांत दामले कसा त्या एपिसोडला आलेल्या पाहुण्यांच्या सांगण्यावरून नुसतं 'मम' म्हणल्यासारखे तिखट-मीठ, मसाला आणि इतर पदार्थ त्रयस्थपणे कढईत टाकत असतो तसंच काहीतरी.
बाऊलमध्ये चिंचेचा कोळ हातात धरून पाणी कढईत घाल म्हणलं तर मी चिंचेचा बचकाच कढईत टाकला. पुन्हा दुसरी फोडणी करावी लागली. बाकी इतर गोंधळ वेगळेच. माझी धांदल बघून सई, ऋचा आणि बाबांनी खसखस पिकवल्यावर मी चिडलोच. शर्टाच्या बाह्या सरसावून एका हातात डाव आणि एका हाताने चिमट्यात कढई धरून मुरारबाजीच्या त्वेषाने गॅस समोर उभा राहिलो.

मग मात्र फोडणी, पुरणाचा कट, वरण, तिखट, मीठ, मसाला, कडूलिंब, गुळाचा खडा आणि वरून मस्तपैकी कोथिंबीर भुरभुरून आमटी खळखळा उकळत ठेवली.

अगदी आत्मविश्वासाने आमटीला कट लावून मागे वळलो तर ऋचासकट सगळे माझ्या आमटीच्या कढईकडे इतक्या संशयाने बघत होते की जसं काही ह्या सगळ्यांच्या विरोधात काही 'कट'च शिजवतोय...!!
'अंदाज अपना अपना' मधल्या 'शरबत-ए-जन्नत' सारख्या वाट्या फिरवल्या सगळ्यांनी... मग खाल्ली आमटी भुरक्या मारत..!!


'आमटी-ए-कट' 😜😛

No comments:

Post a Comment

माझ्या ब्लॉगची जन्मकथा

नारळ फुटी

बर्याच दिवसांपासुन काहीतरी लिखाण करावं असं मनापासुन वाटत होतं. कधी विषय सुचायचे पण शब्दांत उतरवायला वेळ नसायचा. कधी वेळ मिळालाच तर काय लिहाव...