Tuesday, December 8, 2015

जसरंगी

कुठलंही रिलेशन फक्त दोन गोष्टीवर अवलंबुन असतं... एक प्रेम आणि दुसरं व्यवहार. एकाच स्केलची ही दोन टोकं. कुठल्याही नात्याचे मुल्यमापन केल्यास त्याचा अक्ष ह्या दोन्हीमध्ये कुठेतरी स्थिरावेल. आई-मुल... नवरा-बायको... सासू-सुन... मित्र-मित्र अथवा मैत्रीण... मालक-नोकर... आणि जगातील असंख्य नाती ह्याच स्केलवर मोजता येतात. तुमच्या आजुबाजूला असणार्या कुठल्याही व्यक्तीला तुम्ही ह्या स्केलवर तोलून पाहू शकता. जिथे हे दोन्ही नाही तिथे काहीच हालचाल नाही... नातं नाही... सबंध नाही...! प्रेम शुन्य असेल त्या नात्याला व्यवहार म्हणतात... आणि व्यवहारशुन्य नातं हे फक्त शुद्ध प्रेमावर अवलंबुन असतं... जगाच्या व्यवहारांची तमा न बाळगता फक्त प्रेम केलं जातं ते शुद्ध प्रेम... बाह्य व्यवहारी जगाला ते वेडेसर वाटलं तर त्यात नवल काही नाही...!

हेच सांगणारी ही बंदीश आहे...

"माईरी शाम.. शाम... शाम... रटत, श्यामा शाम भई...!
अपने सखीन सो पुछत, शामा कहा गई...!?"

श्रीकॄष्णाच्या म्हणजेच शामच्या नावाचा जप करत-करत ’श्यामा’ (नावाची त्याची चाहती) स्वत:लाच ’शाम’ समजू लागली... येवढच नव्हे तर तिच्या सख्यांनाच विचारु लागली की ’श्यामा’ कुठे गेली...!? ज्याच्यावर प्रेम आहे त्याचा इतका ध्यास घ्यायचा... इतका सतत विचार करायचा की स्वत्व विसरुन त्याच्याशी एकरुप होऊन जायचं...! जगाच्या लेखी वेडेपणाच... पण प्रेमाचं पुर्णस्वरुप...!

हा झाला मुळ रेशीम धागा... त्यात पाणीदार, चमकणारे मोती ओवलेत पं. संजीव अभ्यंकर आणि अश्विनी भिडे-देशपांडे ह्यांच्या गायनाने. ह्या दोघांचे गुरु पं. जसराज ह्यांच्या आयुष्यभराच्या गानतपश्चर्येचं फळ म्हणजे ’जसरंगी’ हा गायन अविष्कार...! दोन गायकांच्या दोन वेगळ्या गाण्याच्या पट्ट्य़ा... त्या-त्या पट्ट्य़ांना संलग्न वेगळा स्वतंत्र तबला आणि स्वरांचे पेटी-तंबोरा...! दोन गायक शेजारी शेजारी बसून एकाच नोटेशनचे पण दोन भिन्न राग गाणार...! एक गाणं चालू असेल तर आपल्याला दुसर्या गाण्याचे बोल पटकन आठवत नाहीत. इथे शेजारी बसून दुसरा राग गायचा आहे. हे ऐकायला जेवढं छान वाटतय तेवढं गायला महाकठीण आहे.

एकदा तरी ऐकून अनुभव घेतलाच पाहिजे...!

https://www.youtube.com/watch?v=ZtcffM9s1Ec&feature=share

No comments:

Post a Comment

माझ्या ब्लॉगची जन्मकथा

नारळ फुटी

बर्याच दिवसांपासुन काहीतरी लिखाण करावं असं मनापासुन वाटत होतं. कधी विषय सुचायचे पण शब्दांत उतरवायला वेळ नसायचा. कधी वेळ मिळालाच तर काय लिहाव...