Friday, November 13, 2015

आर्ट स्टूडियो

र्ट आणि क्राफ्टच्या शोपमध्ये गेलं की मला लहान मुलांना खेळण्याच्या दुकानात गेल्यावर होतं तसं व्हायला लागतं. अधाश्यासारखं हे घेऊ... ते घेऊ वाटायला लागतं. एकसारखे ठेवलेले वेगवेगळ्या आकाराचे मऊ-मऊ ब्रिसल्सचे पेंटिंगचे ब्रश, असंख्य रंगाच्या ट्यूब्ज, क्रेयॉन्स, कलर पेन्सिल्स... स्केचपेन्स, कलर पॅलेट्स, वेगवेगळ्या आकारांचे कॅनव्हास आणि काय-काय...!!

एखाद्या बाईंनी साडीच्या दुकानात निरनिराळया साड्यांचे पदर हातात घेऊन पोत बघावा तसे वेगवेगळ्या कागदांचे फिल घ्यायला मला ख़ुप आवडतं. एक्रिलिक पेंटिंगसाठी कुठला पेपर... ऑइल पेंटिंगवाला कसला... पेन्सिल स्केचिंगसाठी किती जीएसएम...!! हे फार मला टेक्निकली कळत असं नाही पण निरिक्षण करत बसणं हे मजा देतं.

सईने मलई सिल्क किंवा इटालियन सिल्कची साडी चमकत्या नजरेने बघावी तसा मी खरबरित हॅण्डमेड पेपर हातात घेऊन त्यावर चारकोल स्केच करावं हे दिवास्वप्न बघत असतो. कितीवेळा आर्टिस्ट इजल हातात घेतो... किंमत बघतो... आपण खरच ख़ुप काही पेंटिंगचे दिवे लावणार आहोत का हा प्रश्न स्वतःलाच विचारतो आणि पुन्हा जागेवर ठेऊन देतो.

स्वतःच्या घराबद्दल प्रत्येकाचं काहीतरी स्वप्न असतं. कुणाला थिएटर रूम पाहिजे असते तर कुणाला बार काऊंटर... कुणाला बॅक यार्डमध्ये स्विमिंग पुल पाहिजे तर कुणाला अद्ययावत जीम...!! 

मला विचाराल तर घरात एक आठ स्केवर मीटर्स का होईना आर्ट स्टूडियो असावा हे माझं स्वप्न आहे. एक चार फूटी ओकवुड इजल आणि त्यापुढे कुशनवाला स्टूल... कॅनव्हास, ब्रश, पॅलेट्स आणि कलर्सचा नुसता खच असावा. दिवस आहे की रात्र हे लक्षातसुद्धा येऊ नये असा एक स्टूडियो फोकस आणि हरवून जाण्यासाठी सुलभ-सोपान म्हणून एक म्युझिक सिस्टीम...!!

बास... संजीवन समाधीची जागा रेडी ना भौ...!!

प्रणव

No comments:

Post a Comment

माझ्या ब्लॉगची जन्मकथा

नारळ फुटी

बर्याच दिवसांपासुन काहीतरी लिखाण करावं असं मनापासुन वाटत होतं. कधी विषय सुचायचे पण शब्दांत उतरवायला वेळ नसायचा. कधी वेळ मिळालाच तर काय लिहाव...