Friday, November 13, 2015

चिमणे...!!

ठ वर्ष झाली छकुले... बघता बघता... आठ वर्ष...!! अजून आठवतो मला तो आषाढी एकादशीचा दिवस... सकाळी मी नेहमीसारखा ऑफिसला चाललो होतो... तेवढ्यात तुझ्या आजोबांचा फोन आला... लगेच निघा...!!
तिथून पुढे पुणे-बारामती आणि सोलापूर यात्रा करत सकाळी निघालेलो आम्ही संध्याकाळी साडेसहा वाजता पोचेपर्यंत तुझं ह्या जगात आगमन झालं होतं.

गुलाबी दुपट्यात गुंडाळून वोर्मर मध्ये ठेवलेली बाहुली धुसर नजरेनी माझ्याकडे बघत होती ते अजून आठवते मला... गोर्या-गोर्या रंगाची... मखमली त्वचेची... तळहातावर मावेल येवढा छोटासा चेहरा आणि करंजीसारखे छोटे-छोटे तळपाय...!!

तेव्हापासून किती आठवणी...!? तू पहिल्यांदा आमच्या दोघांच्या मध्ये झोपायला लागल्यापासून ते अगदी आत्ता अगदी आईच्या कामात AutoCAD वर कमांड्स शिकण्यापर्यन्त... आणि ढूंगुला पोम्प-पोंप आणि पोटाला फुर्रर केलं की खदखदुन हसणार्या चंपाकलीपासुन 'बाबा... मला चेंज करायचं आहे बाहेर जा ना प्लीज' म्हणणार्या मोठ्या झालेल्या ऋचा ताईपर्यन्त काय अन काय...!!

आता हातात मावत देखील नाहीस... पण कुशीत शिरायची तुझी धडपड आणि माझी तुला लहान असताना हातावर धरायचो तसं धरायची तडफड... आपल्या दोघांना जाणवत असतात ते हातातून निसटुन गेलेले क्षण...!! छान वाटतं तेवढंच वाईटही वाटतं...!!

अगं का येवढं लवकर मोठी होतीयेस...!? थोडं थांब... एकंच तर बाळ आहे आमचं... हे क्षण असे ओञ्झळीतल्या वाळूच्या कणासारखे बोटांच्यामधुन निसटुन जातायत हे किती क्लेश देतंय माहितीय तुला?
तू मोठी होतीयेस आणि आम्ही काहीतरी गमावतोय ह्या भावनेला हलकीशी फुंकर मिळते ती तुझी दिवसेंदिवस वाढत जाणारी समज बघून... तुझी अभ्यासात होणारी प्रगती बघून... स्पोर्ट्समध्ये मिळणार्या ट्रोफिज बघून... आईबरोबर अगदी लता-आशापर्यंत गायकांची गुणगुणणारी गाणी बघून... मी ऑफिसमधून आल्यावर मला चहा करून देताना बघून... आमच्या इंग्लिशमधल्या चुका काढताना बघून... I -pad वर धडाधड app लोड-अनलोड करताना बघून... पार्कमध्ये जोरात सायकल चालवताना बघून... स्केट्स करताना बघून... प्रत्येक नवीन गोष्ट करताना बघून...!!

चिमणे... खूप मोठी हो पण हे आत्ताचे क्षण आम्हाला जरा पकडू दे... अजून काही दिवस तरी तुला कुशीत घेऊन झोपू दे... कडेवर उचलून घेऊ दे... तुला हातानी भात भरवू दे... सगळे वेडे हट्ट पुरवू दे...!! हे दिवस तुझ्या सिक्रेट ड्रोवर सारखे आमच्या मनाच्या सिक्रेट ड्रोवर मध्ये खोलवर जपून ठेऊ दे...!!

प्रणव.

No comments:

Post a Comment

माझ्या ब्लॉगची जन्मकथा

नारळ फुटी

बर्याच दिवसांपासुन काहीतरी लिखाण करावं असं मनापासुन वाटत होतं. कधी विषय सुचायचे पण शब्दांत उतरवायला वेळ नसायचा. कधी वेळ मिळालाच तर काय लिहाव...