Tuesday, June 2, 2015

निनाद सर

आमच्या 'सह्यभरारी' ट्रेकींग संस्थेतर्फे सागरी किल्ल्याची टूर आयोजित करुन आम्ही निनाद सरांना बरोबर नेत असू. आमच्या ट्रेक / टूरच्या ब्रोशरवर निनाद सरांचं नुसतं नाव टाकलं तरी लोकांच्या नुसत्या उड्या पडत. प्रत्येक किल्ल्याचा फक्त इतिहासच नाही तर बांधकामाच्या वैशिष्ठ्यांपासून नैसर्गिक रचनांपर्यंत सगळी माहिती अगदी उत्साहात ते देत असत. एका माणसाकडे किती माहितीचं भांडार असू शकतं ह्या गोष्टीचं आश्चर्यकारक उदाहरण म्हणजे निनाद सर होते.

टूरचं नियोजन करण्याच्या निमित्ताने आम्ही त्यांच्या डेक्कनवरच्या घरी तासंतास बसायचो. सोफ्यासमोरच्या टेबलावर कागदपत्रांच्या ढिगार्यात पुरातन काळातल्या एखाद्या मोडीलिपीतल्या पत्राची प्रत सहज हाताला लागे. आपण उत्साहात वाचतोय असं बघितलं की ’घेऊन जा तुला पाहिजे असेल तर, अजुन एक कॉपी आहे माझ्याकडे’ हे त्यांच्याकडून अगदी सहज येत असे. परवाच उद्धव येऊन गेला. सलील-संदीप मागच्या आठवड्यात भेटले होते... ही वाक्य ते अगदी सहज बोलत असत. एकदा त्यांच्याकडे एकजण भेटायला आले होते. आमच्याकडे बघून म्हणाले ’ह्यांना ओळखलं का...!? एव्हरेस्टवीर सुरेंद्र चव्हाण...!! एव्हरेस्टवर पडलेले पहिले मराठी पाऊल...!!’ आम्ही अवाक.

त्यांच्याबरोबर किल्ल्यांच्या भटकंतीला जाणे म्हणजे तर पर्वणीच असायची. अंपायरसारखी पांढरीशुभ्र गोल टोपी, अंगात शर्ट, हाफ स्वेटर, पायात स्पोर्टस शुज... आणि चालत सगळ्यात पुढे...!! सागरी किल्ल्यांबद्दल तर अतिशय सविस्तर माहिती त्यांच्याकडे होती. अलिबागच्या किल्ल्यापासून सुरु झालेली आमची टूर खांदेरी-उंदेरी, रेवदंडा, कोर्लाई, पद्मदुर्ग आणि मुरुड जंजिर्यावर संपत असे. पद्मदुर्गाच्या भग्न अवशेषांमध्येसुद्धा प्रसन्नता आणि देवळाचं देवत्व आम्हाला जाणवलं ते त्यांच्या अंगावर रोमांच आणणार्या शिवराय-शंभूराजांच्या इतिहास कथनामुळे...!!

मधल्या काळात नोकरी-लग्न-करियरच्या भरकटलेल्या काळात आमची ट्रेकींग संस्था बंद पडली. आम्ही कामानिमीत्त जिकडे-तिकडे झालो आणि ह्या सगळ्याशी संपर्क तुटला. काही वर्षांनी Rotaract क्लबतर्फे आयोजित केलेल्या ’हेरीटेज ट्रेजर हंट’ इवेंटच्या उद्घाटनला निनाद सरांना बोलावलं होतं. आम्ही शनिवारवाड्याच्या पायऱ्यांवर उभे होतो. कारमधुन उतरून निनाद सर थेट आमच्याकडे चालत आले. आणि अगदी जुन्या मित्राप्रमाणे तेवढ्याच सहजपणे बोलायला लागले. इतक्या वर्षांचा मध्ये संपर्क तुटलेला आहे ह्याचा कुठे मागमुसही नव्हता. त्यांच्या गजकथा पुस्तकाचा उल्लेख करुन गप्पा मारल्या की त्यांचा चेहरा खुलून येत असे. अजुन उत्साहात येऊन वेगवेगळे संदर्भ देऊन ते बोलत असत.

त्यांच्या निधनाची भयानक बातमी मिळाली आणि कितीतरी गोष्टी आठवुन गेल्या काही मिनीटांतच... त्यांच्याबरोबरच्या गप्पा, इतिहासाचे संदर्भ, इतिहासातलं एखादं आश्चर्य सांगून त्यांनी केलेला मिश्कील चेहरा... आणि अगदी घरातल्या माणसानं सहज बोलावं तितकं साधं बोलणं. अजुन कितीतरी गोष्टी राहून गेल्या त्यांच्याकडून माहित करुन घ्यायच्या... रायगडावर त्यांच्याबरोबर जायचं शेवटी राहिलंच... कवी भूषणाचे छंद त्यांच्याकडून पुन्हा एकदा ऐकायचे होते... एक व्यक्ती नाही... एक अख्खं विद्यापिठ हरपलं आहे. कसा भरुन निघणार हा तोटा...!? कदाचित कधीच नाही.

प्रणव.

No comments:

Post a Comment

माझ्या ब्लॉगची जन्मकथा

नारळ फुटी

बर्याच दिवसांपासुन काहीतरी लिखाण करावं असं मनापासुन वाटत होतं. कधी विषय सुचायचे पण शब्दांत उतरवायला वेळ नसायचा. कधी वेळ मिळालाच तर काय लिहाव...