Saturday, March 7, 2015

डोंगराएवढ्या भाताची गोष्ट

ज रात्रीच्या जेवणाला ताटात वाढलेला गरमा-गरम वाफाळणारा भात बघून थेट वीस वर्षांपूर्वी आठवण झाली. श्रीशैलमच्या प्रसादालयातली. दक्षिण भारतातली श्रीशैलम, तिरुपती आणि इतर काही देवालयं सोवळ्या-ओवळ्यामध्ये फार कडक. देवदर्शन घेऊन झालं की प्रसाद भोजन घ्यायला वेगळ्या भोजन कक्षात जावं लागे. तिथे लेदर बेल्ट, पाकिट किंवा घड्याळ चालत नसे. शक्य असल्यास त्यांच्यासारखी खादीची लुंगी उत्तम. कपाळाला गंध पाहिजेच.

रांगेनी पंगतीत बसायचं. समोर केळीची पानं आणुन ठेवली जातात. ती कशासाठी आहेत हा विचार करेपर्यंत दोन जणं एक अवाढव्य कढाई घेऊन त्यावर भाताचा मोठ्ठा डोंगर घेऊन येतात. त्यातला एक जण भात वाढीने भात उचलत नाही तर केळाच्या पानाकडे ढिगारा ढकलतो आणि डोंगराची एक छोटी प्रतिकृती तुमच्या पुढ्यात तयार करतो. भलेभले हा डोंगर बघून गांगरूनच जातात. मागाहून एक वाढपी स्टीलचा जग घेऊन येतो. तुम्ही पाण्याचा ग्लास शोधू लागता आणि तो भातावर तुपाची धार धरतो.

पंगतीसमोर आता बादल्या कड्या कुरकुरत यायला लागतात. त्यातून लांबलचक दांड्याच्या डावाने भातावर रस्सम वाढायला सुरवात होते. इथवर तुमचं पितळ झाकलेलं असतं. ते उघडं पडतं पितळ्याच्या बादलीने. नवखा भक्त बादलीकडे आणि त्या कढत्त रस्समकडे बघून दबकतो. नक्की आपण काय करायचं आहे ह्या विचाराने गोंधळतो. रस्सम वाढत का नाही ह्या विचारात पडतो. बरं विचारणार तरी काय? भाषा येत नसते ही अजून एक मोठी अडचण. वाढपी वैतागून तसाच दोन डाव थोडा भातावर थोडा पानावर ओतून निघून जातो.

तेच एखादा पैदाइशी स्वामीनाथन कच न खाता त्या भाताच्या ढिगार्यात हात घालून मधोमध आळं बनवतो. वाढप्याच्या चेहर्यावर आता एक उत्साह येतो. डोंगराच्या पोटात तो तप्तरस आकंठ भरून तो स्वामी कडे बघतो. स्वामीला लगेच संकेत कळतो. तळहाताची खोलगट वाटी करून तो लगेच ती पुढे करतो. वाढपी मग ती एका हाताची ओञ्झळ गरम-गरम रस्सम ने भरतो आणि स्वामी ती आचमन केल्यासारखी एका फुरक्यात पिऊन टाकतो. असे केशवायनम: माधवायनम: नारायणायनम: गोविंदायनम: झाले की वाढपी पुढे जातो.

आपण रस्सम चे पानाबाहेर वाहणारे पाट भाताचे बांध टाकून अडवायच्या खेळात मग्न असताना हे कसलेले आण्णा लोक भाताचे गोळेच्या गोळे घपाघप घश्यात उतरवत असतात. चवीसाठी केवळ एक चटणीची भुकटी घेऊन असले भाताचे डोंगर च्या डोंगर फस्त करतात.

मी आयुष्यात त्या आधी आणि नंतर हजारो वेळा वाफाळणारा आमटी भात खाल्ला असेल. पण त्या रस्सम भाताची 'सर' नाही आणि त्या अनुभवाचा 'विसर' नाही. ह्या आठवणींची शितं आयुष्याच्या पानावर घट्ट चिकटुन बसलेली ती त्याबरोबरच उठायची.

प्रणव.

1 comment:

  1. वा छान लिहिलं आहे अजून अस काही लिखाण तिरुपती किंवा कुठल्याही ट्रिप बाबत असेल तर bhushankatre@gmail.com vr पाठवा

    ReplyDelete

माझ्या ब्लॉगची जन्मकथा

नारळ फुटी

बर्याच दिवसांपासुन काहीतरी लिखाण करावं असं मनापासुन वाटत होतं. कधी विषय सुचायचे पण शब्दांत उतरवायला वेळ नसायचा. कधी वेळ मिळालाच तर काय लिहाव...