Thursday, December 11, 2014

ट्रबल शुटर्स

सिच्युएशन एक: तुमचे वडील मोठ्ठे बिझनेसमन... तुम्ही वडिलोपार्जित बिझनेस चालवणार हे ग्राह्य... त्यात वयाच्या वीस-एकविसाव्या वर्षी तुमचं लग्न... आणि अचानक तुमच्या जन्मदात्याकडुनच तुमची घरातून हकालपट्टी... नववधू सकट रस्त्यावर तुमची ससेहोलपट...!!

सिच्युएशन दोन: तुम्ही एका गावाला महत्वाच्या कामात अडकलेले. म्हातारी आई, आजारी बायको आणि दोन वर्षांचं पोर दुसर्या गावाला. त्यात तुमच्या प्रिय पत्नीचं 'निधन'... आणि तरीही तुम्हाला भेटायला सुद्धा जाता येऊ नये ही परिथिती... आणि त्यात तुमच्या जीवावर एक जिहादी अतिरेकी उठावा ज्यातून तुमची सुटका नाही...!! तुमचं वय अठ्ठावीस...!!!

सिच्युएशन तीन: एक दमडीचाही फायदा नसताना दुसर्याला मदत केली म्हणून तुम्हाला शिक्षा. पकडून तुरुंगात रवानगी. तिथे गेल्यावर कळावं की मोठा भाऊ ह्याच कारणासाठी शेजारच्या कोठडीत. घरी कुणी कर्ता पुरुष नसताना गावगुण्डाञ्चा छापा. घराच्या बायकांची रस्त्यावर हकालपट्टी... सगळ्या सामानावर जप्ती. आणि तब्बल 'तेरा' वर्षांसाठी तुमची एका निर्जन बेटावर बदली... तेही वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी...!!

घड्याळ लावून फक्त दहा सेकंद ह्यातल्या कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण स्वत: असल्याचा नुसता विचार करून बघावा.

नुसतं एखाद्या महिन्यात जास्त लाईट बिल आलं तर जीव खाली-वर होतो आपला... गाडीचं टायर पंक्चर झालं तर चेहरा आधी हवा गेल्यासारखा होतो... छोट्या-छोट्या प्रॉब्लेम्स पुढे सहज मान टाकतो आपण. आणि हे सगळं कधी तर फक्त स्वत:ची बायका-पोरं... स्वत:चं घर... नोकरी... येवढ्या डबक्यातल्या डबक्यात ऊड्या मारताना...!!

विचार करायला सोपं जावं म्हणून जरा साध्या भाषेत हे तीन प्रसंग वर्णन केले. ह्या तीन सिच्युएशन्स मध्ये पोलादासारखे कणखर उभे राहणारे... आणि अजूनच लखलखत सामोरे येणारे तीन युगपुरुष मला माझ्या नैराश्यात नेहमीच उर्जा देत आलेत...

प्रभू श्रीराम... छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर...!!!

प्रणव.

No comments:

Post a Comment

माझ्या ब्लॉगची जन्मकथा

नारळ फुटी

बर्याच दिवसांपासुन काहीतरी लिखाण करावं असं मनापासुन वाटत होतं. कधी विषय सुचायचे पण शब्दांत उतरवायला वेळ नसायचा. कधी वेळ मिळालाच तर काय लिहाव...