Thursday, December 11, 2014

मी सुपरहिरो

जाम भारी गेलाय आजचा दिवस ऑफिसमध्ये... अगदी पिक्चरमधला हिरो कसा... मुसिबत में फसे बिझनेस को 'वाचवने' के लिये... दहा-बारा मिनीट गंभीर चेहरा करून कॉम्पुटर स्क्रिनवर काहीतरी करतो... दोन-तीन वेळा श्या:... damn it ... करतो... फार मोठ्या वेदनांमधून जातो आणि सस्पेन्स म्युझिक संपत आलं की एक मोठा 'येस्स' करून कंपनीला करोडों का फायदा करून देतो... अगदी तस्स फिलिंग आहे बघा...!!

पण त्या हिरोच्या वेळेस त्याच्या आजूबाजूला प्रॉब्लेम पासून अगदी अनभिज्ञ असलेले लोक असतात... खुद्द त्याचा बॉस ह्या तणावाच्या वेळात स्क्रीनकडे न पाहता हिरोच्या थोबाडाकडे पाहात असतो. जसं काही त्या खोलीतच नव्हे तर अख्ख्या कंपनीत ह्या एका ठोम्ब्यालाच कळतंय काय आग लागली आहे ते. बाकी सगळे... 'लेकीन सब ठीक तो हो जायेगा ना डॉक्टर साहाब' ह्या वाक्याला येणारी अज्जीजी घेऊन बसलेले असतात. मला एक कळत नाही की असा नक्की काय प्रॉब्लेम असतो की जो आठ-दहा वेळा नुसत्या 'Enter ' दाबण्याने सुटतो आणि बुडणार्या कंपनीला करोडो रुपये मिळवून देतो...!!! असो.

आमची सिच्युएशन अगदी साधी आहे. शेतकर्याच्या सदर्याइतकी... कामाचा ओघ कमी झाल्याने धडा-धड लोकं कमी करणं चालू आहे. आम्ही काही दहा-पंधरा लोकं आडोश्याला जीव धरून बसलोय. अश्यातच अचानक धरण फुटल्यासारखा नवीन कामाचा लोंढा आलाय मागच्या आठवड्यापासून. जो तो पुन्हा बिझी झाला. त्यात एक मोठ्ठा आणि प्रेस्टीजियस की काय असा प्रोजेक्ट आला. आमच्या साहेबाला कळेना काय करावे. आम्हाला सगळ्याना मिटिंग रुममध्ये बोलावून आमची कामाची सध्यस्थिती जाणुन घेतली. नवीन जॉब कोण करू शकेल... जॉब फार महत्वाचा आहे वगैरे वगैरे दुखभरी कहानी सांगितली.

ती आमच्या ग्रुपमधल्या काळ्या केसवाल्यानीच काय ती ऐकून घेतली. बाकी गोरे अगदी 'चमडा जाने अन कुत्ता जाने 'च्या अविर्भावात बसलेले. साहेब माझ्याकडे अगदी आशेने बघत होता. त्याच्या त्या आर्त चेहर्याला बघून आणि मागच्याच महिन्यात कंपनीने दिलेल्या नवीन laptop ला स्मरून मी ह्या कामाचा विडा उचलला... आणि त्या पिक्चरमधल्या हिरोसारखा मोठ्ठा 'येस्स ' केला... अगदी कंपनीचा तारणहार झाल्याच्या थाटात...!!

साहेबाचा चेहरा दुसर्याच क्षणाला 'आर्त' कडुन 'स्मार्ट' कडे गेल्याचं किंचित जाणवलं मला. गोर्यांबरोबर विकेंडला गोल्फचा प्लान ठरवतोय म्हणे... मला काय करायचयं...!? मी आपला शनिवार-रविवार ऑफिसला येणार आहे... माझं कर्तव्य आहे कंपनीला बुडताना वाचवायचं... करोडों का फायदा करून देण्याचं... गरीबों का मसिहा होण्याचं... 'सुपर हिरो' होण्याचं...!! काय...!?

प्रणव.

2 comments:

  1. अगदी अगदी...लगे रहो हीरो ..मस्त लिहिल आहेस

    ReplyDelete

माझ्या ब्लॉगची जन्मकथा

नारळ फुटी

बर्याच दिवसांपासुन काहीतरी लिखाण करावं असं मनापासुन वाटत होतं. कधी विषय सुचायचे पण शब्दांत उतरवायला वेळ नसायचा. कधी वेळ मिळालाच तर काय लिहाव...