Saturday, September 27, 2014

गप-गुमान...!!!

इथे आल्यापासून प्रत्येक ऋतुमध्ये काही चमत्कारिक परिस्थितीचा मी अनुभव घेतोय. एक तर माझ्या मातृभुमीपेक्षा इथले ऋतुचक्र उलट आहे. तिथे नोव्हेंबर-डिसेंबर-जानेवारी गुलाबी थंडीचे तर इथे सुर्यनारायणाचा तांडव सुरु असतो. पस्तीस-चाळीस पर्यंत तापमान सहज जातं... एप्रिलपासुन तिकडे सगळे उकाड्याने हैराण तर इथे थंडीचा कडाका वाढायला लागतो.

पहिल्या वर्षात आलो तर एका मोठ्या घरात शेअर हाऊसमध्ये होतो. सेंट्रलाईज्ड एसी... आणि माझे सगळे हाऊसमेट म्हणजे एकापेक्षा एक नवाब. उकाडा वाढायला पुरती सुरुवात होतेय तोवर टर्बोवर एसी सुरु...! भर उन्हाळ्यात अख्खं घर थंडगार करुन दिवस रात्र बियर ढोसत बसणार...! तो संपुर्ण उन्हाळा मी रात्री रजई घेऊन झोपत होतो. त्यानंतर थंडी पडायला सुरुवात झाली. अगदी कारच्या काचेवर दव गोठून बर्फ होण्यापर्यंत कडाका वाढला. आपल्याकडचा एसी हा फक्त थंड हवेसाठी वापरला जातो. इथे वार्मर म्हणूनही वापर होतो. आमच्या नवाबांना थंडी वाजू लागली तसं माझ्या रुममधल्या एसी डक्टमधुन गरम हवेचे झोत यायला लागले. इथेही अतिरेकी वापराने रुममध्ये श्वास गुदमरण्यापर्यंत ह्याचा त्रास होऊ लागला. हे येवढं कमी पडलं की काय म्हणून वाढतं वीजबील आणि शेयर हाऊस मध्ये येणार माझा बिलाचा शेयर हा वाढीव त्रास...!

ह्या सगळ्या तापत्रयांतुन बाहेर पडलो. बायको मुलगी आल्यावर दुसर्या घरांत शिफ्ट झालो. पण अनुभव इथेच संपलेले नाहीत. आमचं कुटुंबही चमत्कारीकच... रत्नागिरीचे लोक पुण्याला आल्यावर पहिले काही दिवस थंडी-थंडी करतात तसं सुरुवातीचे काही दिवस चालू होतं. थंडी आहे मान्य आहे... पण म्हणून रुममध्ये सतत रुम हीटर चालूच. अंगात थर्मल वेअर आणि स्वेटर असतोच... बरं चांगल्या गुबगुबीत, उबदार रजया आणून ठेवल्यात... रुममध्ये पायाखाली फरशी नाही कार्पेट आहे... पण हिटर काही बंद होत नाही. गेले काही रात्री घामेघुम होऊन जाग येतेय मला. मध्यरात्री उठून अंगातला स्वेटर काढून टाकतोय...! घरात उकाडा आणि ओफिसला जायला घराबाहेर पडलं की पुन्हा कडाक्याची थंडी... पुन्हा कारमध्ये वार्मर लावला जातो मग...!!

म्हणजे ’ठेविले अनंते तैसेची रहावे...’ राहिलं बाजूला... तर... ’जे जे असेल त्याच्या उलटे करावे...!’ हेच जगण्याचं पालूपद झालयं...!!!

प्रणव.

No comments:

Post a Comment

माझ्या ब्लॉगची जन्मकथा

नारळ फुटी

बर्याच दिवसांपासुन काहीतरी लिखाण करावं असं मनापासुन वाटत होतं. कधी विषय सुचायचे पण शब्दांत उतरवायला वेळ नसायचा. कधी वेळ मिळालाच तर काय लिहाव...