Wednesday, July 23, 2014

पावभाजी

ब्रेकफास्टला पावभाजी खाण्याची ही काही माझी पहिली वेळ नाही. आदल्या दिवशी घरात काही कार्यक्रम झाला आणि आलेल्या पाहूण्यांसाठी पावभाजीचा मेनु असेल तर पुढचे दोन दिवस सकाळ-दुपार-संध्याकाळ राहिलेली पावभाजी संपवण्याचा अनुभव मला अगदी लहानपणापासूनचा आहे. फक्त माझी आई किंवा बायकोच नाही... तर इतरही काही माता-भगिनींच्या बाबतीत मी हे होताना पाहिलं आहे. एकदा केलेली पावभाजी केलेल्या दिवशी संपली अथवा कमी पडली हे माझ्या तरी ऐकीवात नाही. ह्या भाजीबरोबर खायला आणलेले पाव संपतात... मग चौकोनी ब्रेडच्या स्लाईसवर ह्या भाजीला साथ देण्याची जबाबदारी येते..! तेही दम तोडतात... तरीही टेबलावर ठेवलेल्या अक्षयपात्रातुन भाजी आपल्या तोंडाकडे बघत आव्हान देतच असते...! मग सारखा-सारखा ब्रेड नको म्हणून अगदी पोळीबरोबरसुद्धा ही संपवण्याचा प्रयत्न होतो...! कधी कधी रात्रीच्या दहीभाताला चव म्हणून ही पुरते...! ह्या सगळ्या प्रयासानंतर कित्येकदा रात्री मी ह्या भाजीवर ’सुलतानढवा’ देखिल करुन बघितला आहे. ’सुलतानढवा’ म्हणजे पुर्वी युद्धामध्ये सगळे प्रयत्न करुन झाले की शेवटचा एक जोरदार हल्ला करायचा... अगदी निकराचा... आणि निकालाचा...! एक तर तु नाहीतर मी...!! पण ह्याचे पर्यवसन मी रात्री-अपरात्री उठून जेल्युसील आणि थंड दुध पिण्यातच झाले आहे...!
कितीही लोक येऊन जावोत... ते कितीही मिटक्या मारत खावोत... गृहीतदेखिल न धरलेले पाहूणे येवोत... भाजीची कढई आपली जैसे थे...! ह्या पावभाजीच्या पात्राला द्रौपदीच्या अक्षय पात्रासारखं काहीतरी वरदान असावं...! कधीच न संपण्याचं...! मला वाटतं दुर्वास ऋषी आपले सहस्त्रावधी शिष्यगण अचानक पांडवांच्या कुटीरावर घेऊन आले होते त्या दिवशी द्रौपदीने नेमकी पावभाजी केली असावी. एकाचवेळी अगदी मुबलक प्रमाणात चविष्ट समाधान देणारा हा पदार्थ कितीहीवेळा खाल्ला तरी पुढच्यावेळी अगदी तेवढाच इंटरेस्टींग वाटतो हे मात्र खरं...! ’आज जरा काहीतरी वेगळं करुया’ ह्या उत्साही प्रपोजलला... ’आज पावभाजी करुयात का’ हे अतिउत्साही उत्तर अगदी सहज येतं...!!!
असो... येवढ्यावेळात तिकडे कालची पावभाजी गरम झाल्याचा घमघमाट घरभर पसरला आहे. ब्रेकफास्ट... लंच की डिनर हा प्रश्नच ह्या त्रिकालव्यापी खाद्यव्यंजनानी कालातीत करुन टाकला आहे. कुठल्यातरी क्षुधाशांतीची वेळ झाली येवढंच भान सध्या उरलं आहे...!!!
प्रणव.

No comments:

Post a Comment

माझ्या ब्लॉगची जन्मकथा

नारळ फुटी

बर्याच दिवसांपासुन काहीतरी लिखाण करावं असं मनापासुन वाटत होतं. कधी विषय सुचायचे पण शब्दांत उतरवायला वेळ नसायचा. कधी वेळ मिळालाच तर काय लिहाव...