जन्माला येता क्षणी
ओळखीचे दिसे ना कुणी
सखे-सोबती कुणी दिसेना
पाहूनी रडू मला आवरेना
मला इथे फार भीती वाटतेय हो
आता तरी मला जाऊ द्या हो...!
ही माता अन हे पिता
जमले नातेवाईक पाहता-पाहता
सगळे माझे लाड करत होते
लहानाचे म्हणे मला मोठे करत होते
मला काय चाललय काही कळत नाहीये हो
आता तरी मला जाऊ द्या हो...!
त्यांनीच ठरवलं मी मोठा झालोय
जाणता होऊन कमवायला लागलोय
त्यांनी म्हणे माझं लग्न ठरवलयं
सगळ्या गोंधळात मी स्वत:लाच हरवलंय
मला स्वत:लाच थोडं शोधू द्या हो
आता तरी मला जाऊ द्या हो...!
स्वत:च्या मनासारखं शेवटी त्यांनी केलं
म्हणे गंगेत घोडं एक्दाचं न्हालं
संसाराचं ओझं माझ्या पाठीवर लादलं
मी सुद्धा दिलेलं काम मुकाट्यानं केलं
सगळ्याचा आता मला वीट आलाय हो
आता तरी मला जाऊ द्या हो...!
एकसष्ठी साजरी केली
पाठोपाठ पंच्याहत्तरी झाली
सहस्रदर्शनही घडवले
पाहता-पाहता शतक पूर्ण होत आले
आता मात्र मला करमत नाही हो
आता तरी मला जाऊ द्या हो...!
मी मूळ इकडचा नाही
ह्या कुणाशी संबंध नाही
घर माझे दूर तार्यांपलिकडे
वाट चुकून आलोय इकडे
इथे क्षणाचाच मी पाहूणा आहे हो...
आता तरी मला जाऊ द्या हो...!
प्रणव.
Class apart 👏🏻👏🏻👏🏻
ReplyDelete