Thursday, December 19, 2013

माइंड स्विंग

                       
साड मुरबाड मातीवरुन पाय खरडत चाललो आहे. डोक्यावर उन्हाच्या झळांनी डोळ्यासमोर अंधारी यायला लागलीये. डोक्यात विचारांचा गुंता झालाय. जबाबदारी घेऊन व्यंगुन-थकुन गेलेलं मन कसलाही विचार करायला आणि त्यावर निर्णय घ्यायला तयार नाही. झाडाचं पानही हलत नाहीये. उकाड्याने जीव हैराण झालाय. घामेघुम झालेलं शरीर अजुनच थकून गेलयं. का चाललो आहे... कुठे चाललो आहे... का जगतो आहे... आणि कोणासाठी जगतो आहे अशी संभ्रमावस्था बेचैनी अजुनच वाढवत आहे. आपल्यावर अवलंबुन असलेल्यांच्या महत्वाचे निर्णय आपल्या जबाबदारीवर घ्यायचे... नुसते महत्वाचे नव्हेत तर त्यांच्या आयुष्याचे निर्णय घ्यायचे... त्यात एखादी छोटीशी चुक झाली आणि भविष्यात आपल्याला प्रश्न विचारला की का केलंत हे तर काय उत्तर द्यायचं ह्याचं दडपण आत्ताच यायला लागलंय. घेतलेले निर्णय विचारांती घेतले असले तरी कालानुरुप यथायोग्य फलित मिळण्याची शाश्वती वाटेनाशी झालीये. थांबता येत नाही म्हणुन पुढे-पुढे जातोय. विषण्ण मन विचारशक्ती थांबल्यानं रिकामं झालय. काट्याकुट्यातुन वाट नागमोडी वळणं घेत पुढे जातेय. पायाखालची माती मऊ आणि पांढरी शुभ्र होत चालली आहे. समुद्राची गाज दुरुन ऐकू येऊ लागली आहे. मधुन-अधुन छोटी वार्याची मंद झुळूक अंगावरुन जातेय. शाळेतुन आलेलं लहान मुल दप्तर भिरकाऊन खेळायला पळतं तसं... विचारांचं गाठोडं भिरकाऊन... सगळे पाश सोडून... पुढे जायची ओढ लागली आहे. पायांत अचानक जीव आला आहे. भर-भर पावलं उचलत अंतर पार करुन पुढे काय ह्याची ओढ वाढत आहे. काटेरी केवड्याची एक घनदाट भिंत समोर दिसते आहे आणि एक बेचका त्या भिंतीतुन फट काढून देतोय. त्यामागे काय ह्याची उत्कंठा आता श्वासाचीही उसंत देत नाहीये. काहीतरी अथांग... अचाट असण्याची कुण-कुण मात्र लागते आहे. एकच क्षण तिथे पोचुन बेचक्यात शिरायला... लहानपणापासून कथा-कादंबर्यात ऐकलेल्या केवड्यातल्या भुजंगाची तमा न बाळगता थेट सुर त्या भव्यतेकडे... आत शिरताना आणि पुढे जात असताना केवड्याच्या टोकदार पानांनी हाता-पायावर ओढल्या जाणार्या ओरखड्याचीसुद्धा आत्ता फिकीर नाही. आणि इतक्यावेळ पापण्या बंद असाव्यात आणि अचानक डोळे उघडून पाहावे असे एका नजरेत न भरता येणारे विश्वरुपदर्शन... मोरपंखी निळ्याशार रंगाचा... लाटांनी फेसरुप तयार झालेल्या मोत्यांच्या माळा लगडलेला द्वारकाधीश निवांत पहुडलेला असावा तसा. बासरीचे हलके-हलके मंजूळ स्वर हवेत तरळत ठेवत असावा तसा. त्यानेच आपल्या मेघदासांना पाठवून सुर्याच्या तप्त किरणांना जणू काबूत आणलयं. थंडगार वारं होडीच्या शिडात भरावं तसं फुफ्फुस्सात भरुन ताजंतवानं वाटतय. मोकळ्या श्वासातुन नवा जोम अंगात शिरु पाहतोय. ह्या अचाट शक्तिपुढे आयुष्यातले निर्णय भातुकलीच्या खेळातले वाटू लागलेत. जर विचार करुन घेतलेत निर्णय तर यश का नाही येणार... ज्या अडचणी येणार त्या चुकणार थोड्चं... आणि त्या आल्या तरी त्यांना उधळुन पुढे जाण्याची धमक येईल असा आत्मविश्वास कुठेतरी वाटू लागला आहे. हाताच्या मुठी घट्ट वळून नव्या उत्साहात पावले झर-झर पुढे टाकत निघालोय... नव्याने पुढचं आयुष्य जगायला... आयुष्याची लढाई लढायला... आणि जिंकायला...!!
प्रणव
.

No comments:

Post a Comment

माझ्या ब्लॉगची जन्मकथा

नारळ फुटी

बर्याच दिवसांपासुन काहीतरी लिखाण करावं असं मनापासुन वाटत होतं. कधी विषय सुचायचे पण शब्दांत उतरवायला वेळ नसायचा. कधी वेळ मिळालाच तर काय लिहाव...