Saturday, August 31, 2013

शुद्धोदकं स्नानम समर्पयामि...!

अंघोळीच्या बाबतीत आपलं जरा हत्तीसारखं आहे... अंगाला पाण्याचा थेंब लागेपर्य़ंत हायड्रॊफोबिया झाल्यासारखं वागायचं आणि एकदा का अंघोळ सुरु झाली की फटाके वाजवून पाण्यातुन बाहेर काढायची वेळ यावी इतक्या वेळ डुंबायचं...! मुळात कंटाळा अंघोळीचा नसतो... तो परिणाम असतो अंगात असलेल्या राक्षसी आळसाचा...! पण ’गरज ही शोधाची जननी’ असेल तर ’आळस हा शोधाचा जनक’ आहे हा सिद्धांत आम्ही अंघोळीच्या गोळीचा शोध लावून पडताळून पाहिलेला आहे. अंघोळ न करता ती केल्यासारखं वाटावं असा मेकअप करण्याची कला हे त्या गोळीचे फलित. आता कित्येकदा प्रामाणिकपणे अंघोळ करुनही पारोसे दिसत असलेल्या लोकांना ही गोळी चटकन लागू पडते. फार कष्ट न घेता फक्त पाण्याचे थोडेफार आवाज बाथरुममध्ये करायचे आणि सुस्कारे सोड्त कोरड्या टॉवेलने कोरडे डोके आणखी कोरडे करत बाहेर यायचे...! मग थोडा तेलाचा हात लावायचा केसांना.. मस्त भांग पाडायचा आणि ताजेतवाने वाटत असल्याचा आव आणत घराबाहेर पडायचे. अर्थात हे सगळं तुमच्या स्वत:साठी. मुख्यत: तुमच्या अंघोळीची फक्त दोनच लोकांना काळजी असते. लहान वयात वळण लागावं म्हणून तुमच्या आईला... आणि खिजवायला कारण मिळावं म्हणून तुमच्या मित्रांना...! बाकी वडील लोकही ह्या मुद्द्याला फारसं धरुन बसत नाहीत. उलट आईलाच समजावतात, "जाऊ देत गं एखाद्या दिवशी बसला पारोसा तर... त्याला थोडंच सत्यनारायणाच्या पुजेला बसायचयं...!" ह्या त्यांच्या समजावण्यात कित्येकदा आपली बाजू घेण्यापेक्षा त्यांना अंघोळीच्या तापत्रयातुन गेल्याने आलेला हळवेपणा जास्त असतो. बाकी शिरीष कणेकरांनी फिल्लमबाजी मध्ये म्हटल्यासारखं... अंघोळ ही सत्यनारायणाच्या पुजेसारखी असते... ती घडावी लागते. करणारे, करविणारे आपण कोणी नसतो. ह्या सत्यनारायणदेवाच्या कथेचं एक मजेशिर आहे... साधूवाण्याच्या कलावतीने सत्यनारायणाचं व्रत करीन म्हणून प्राप्त झालेलं धन, पुजा करायची विसरली म्हणून जहाजासकट बुडालं... पुजा केली की परत वर आलं... प्रसाद खायचा विसरला की परत बुडालं... प्रसाद खाऊन आली की परत वर आलं...! एका शिर्याच्या मुदीपाई जहाजासकट त्यावरच्या सगळ्या खलाश्यांना समुद्रात दोनदा बुचकळून काढलं ह्याची पुराणात कुठे नोंदच नाही. त्या बिचार्यांचा काय दोष...!? सत्यनारायणदेवाचं महात्म्य दुसरं काय...!
बाकी अंघोळीचा कंटाळा एका लिमीटपर्यंतच... एकदा का आपण मनावर घेतलं की बघायला नको. एखाद्या राजाला लाजवेल इतका जामा-निमा करुन अंघोळीचा घाट घातला जातो. मग बदामतेलाने अर्धा-अर्धा तास मालिश... दिवाळी उलटून सहा महिने होऊन गेलेले असले तरी उटणं लावून... हळद आणि डाळीचं पिठ दुधावरच्या साईमध्ये कालवून अंघोळ...! शिकेकाईमध्ये वाळलेल्या लिंबाच्या फोडी उकळवून... मग ते गाळून... त्याने केस धुवायचे...! हे सोपस्कार थंडीच्या दिवसाचे. उन्हाळ्यात ह्या सगळ्याची जागा शॉवर जेल, शांम्पू, कंडिशनर ह्या सगळ्याने घेतली जाते. आठवड्याच्या दिवसांतली ऑफिसला जायच्या घाईत केलेली अंघोळ वेगळी आणि रविवारी निवांत तब्बेतीत केलेलं स्नान वेगळं. गुळगुळीत दाढी, तेलाने मसाज आणि मग अंघोळ... तासा दीड तासाची निश्चिंती... बाहेरच्याला वाटावं की हा आत कायमचा सेटलच झाला की काय...! ओल्या केसांचा चप्पट भांग पाडून सोज्वळ चेहरा करुन बसल्यावर थेट ’श्यामची आई’ पिक्चरमध्ये रोल द्यावा आणि... ’शाम... पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस तसा मनालाही जप हो...!’ असले डायलॉग गेंगण्या स्वरात म्हणायला सुरुवात करावी असले भाव. हा रविवारचा स्नानयोग मुख्यत्वेकरुन माध्यान्हानंतर येतो. मग जड डोळ्यांनी सात वाजताच्या बातम्या बघाव्यात... वरण-तुप-भात खावा आणि सज्जन बाळासारखं निद्रादेवीच्या कुशीत झोपून टाकावं. ह्याखेरीज कुठले भाव येतच नाहीत.
पहाटे लवकर केलेल्या अभ्यंग स्नानानंतर कडाललेल्या भुकेवर फराळ केला की येणारी पेंग हा एक वेगळाच अनुभव. दिवाळी ह्या अनुभवाशिवाय अपुरिच राहते. मी तर कित्येकदा सकाळी ऑफिसला जायची पुर्ण तयारी झाल्यावर अचानक बुट काढून बेडवर आडवा होतो. पंधरा-वीस मिनिटं मस्त एक डुलकी काढतो आणि मग निवांत डुलत-डुलत जमेल तेव्हा ऑफिसला जातो. शाळेत, मग इंजिनीयरींग आणि आता ऑफिस. जाण्याच्या जागा वयानुसार बदलल्या तरी माझा हा कार्यक्रम मी नित्य चालू ठेवलेला आहे.
अंघोळीला लागणार्या वेळेच्याही प्रत्येकाच्या तह्रा असतात बरं का. काही लोक इतके भर्र्कन बाहेर येतात की आपल्याला वाटावं हा टॉवेल विसरला आहे म्हणूनच बाहेर आला. प्रत्यक्षात तो अंघोळ उरकून आलेला असतो. आणि एकाद्याला आपण चार-पाच वेळा बाथरुममधुन आत-बाहेर करताना बघतो. आपल्याला वाटतं झाली असेल ह्याची अंघोळ तर अजुन बादली भरायचीच असते. काही लोकांच्या गानकळा डोक्यावर पाणी पडलं की वाढायला लागतात. जोरजोरात ताना घेऊन गाणी म्हणायला लागले की बाहेरचाच कोणी दार वाजवून त्याला आदीभौतिकातुन बाहेर आणतो. काहींची अंघोळ म्हणजे... इतना सन्नाटा क्यूं है भाई... अशी असते. पाणी पडल्याचादेखिल आवाज होत नाही. वाटावे की झोप लागली का काय ह्याला आतमध्ये. बाकी बाथटब आल्यापासून अंघोळ करता-करता डूलकी काढायचं स्वप्न देखिल आता पुरं होऊ लागलं आहे.
असो. शनिवार संध्याकाळच्या शॉवरखाली सुचलेलं हे स्नानपुराण डोक्यावर पडणार्या वाफमिश्रीत पाण्यासारखं वाहात असलं तरी कुठेतरी संपवायला हवं. तसंही अंघोळीवरच्या येवढ्या चर्चेनंतर निदान एका अंघोळीचं पुण्य तरी नक्कीच पदरी पडलं असणार. आता थेट सोमवारीच अंघोळ करण्याच्या निश्चयाच्या महामेरुवर मी केव्हाच आरुढ झालो आहे...!
- प्रणव.

1 comment:

माझ्या ब्लॉगची जन्मकथा

नारळ फुटी

बर्याच दिवसांपासुन काहीतरी लिखाण करावं असं मनापासुन वाटत होतं. कधी विषय सुचायचे पण शब्दांत उतरवायला वेळ नसायचा. कधी वेळ मिळालाच तर काय लिहाव...