Sunday, October 13, 2013

काजल...!

पावसाळ्याचे दिवस होते. ट्रेक संपवून गावाकडचं सौंदर्य बघत आम्ही काही मित्र चाललो होतो. समोरुन एक तीन-साडेतीन वर्षाचा मुलगा वेडावाकडा चालत येताना दिसला. त्याची अंगकाठीही काहिशी वेगळी दिसत होती. जवळ येईल तसा त्याच्या चेहर्याजवळच अजुन एक लहान चेहरा मला दिसला. खांद्यावर हात टाकून चालत चालल्यावर दिसतो तितका जवळ. काळ्या पँट मधल्या दोन पायांजवळ आणखी एक उघडा पाय दिसला. पुढे जाऊन जरा निरखून बघितल्यावर कळलं... ती जुळी सयामी भावंडं होती. एक मुलगा आणि दुसरी मुलगी. मुलाचं शरीर पुर्ण होतं... कमरेपासून एकच पाय आणि वरती संपुर्ण शरीर वेगळं असं काहीतरी आडनिडं जीवन त्या मुलीच्या वाट्याला आलं होतं. आधी मी काय बघतोय हेच मला कळेना. त्या मुलाच्या अंगावर फार महाग नाही पण बरे कपडे होते. आणि मुलीचे शरीर कमरेवर संपुर्ण उघडं... त्याखाली ते भावाच्या कपड्यात गेल्याने झाकले गेलेलं. माझ्या काळजात चर्र झालं... तीन वर्षाचं पोर ते... हवेत गारवा आणि अश्या अवस्थेत का? दोघे जुळे असले तरी तुपाचा घास मुलाच्या तोंडात जात असणार हे त्या दोघांच्या विषम वाढीवरुन लगेच लक्षात येत होतं. मी जवळ जाऊन त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला. त्यांचं नाव विचारलं. मुलाने सांगितलं दिपक. मुलीला विचारलं तर त्या लेकराच्या तोंडातुन शब्दच फुटेना. चेहर्यावर कमालीची संकोचयुक्त भिती ठेऊन ती सारखी ’दादा-दादा’ करत भावाकडे बोट दाखवत होती. मग दिपकनेच नाव सांगितलं... काजल...! तिच्या भेदरलेल्या चेहर्यावरुन मी हळूवार हात फिरवत खिशातुन चॉकलेट काढत विचारलं... तुम्हाला चॉकलेट हवं का...!? काजल अजुन हो नाही अश्या माना हलवत असतानाच दिपकने माझ्या हातातुन चॉकलेट घेऊन कागद काढायलाही सुरवात केली. मी म्हणलं... अरे तिला दे ना. ’तिला नको असतयं... आना हिकडं...!’ म्हणत दोन्ही त्यानेच गट्ट्म करुन टाकली. काजल अजुनही भेदरलेल्या चेहर्याने माझ्याकडे एकटक बघत होती. मी गुडघ्यावर बसत तिच्याजवळ गेलो आणि शक्य तितक्या हळूवार आवाजात विचारलं... ’तुलापण हवं का चॉकलेट...!?’ आणि एकच क्षण तिच्या डोळ्यात आकाश उतरल्यासारखं झालं... चेहरा हसरा झाला आणि पुढे होऊन तिने आपल्या छोट्याश्या हाताने माझ्या गळ्याला घट्ट मिठीच मारली. काही क्षण मलाही गोंधळल्यासारखं झालं पण माझ्याही नकळत मी तिला कुशीत घेतलं. माझ्या हातानी त्या पिल्लाच्या शरीराला शक्य तेवढं झाकलं. मायेच्या उबेला ते बाळ आसुसलेलं होतं. तिने माझ्या गालावर एक ओली पापी दिली आणि परत माझ्याकडे बघुन खुदकन हसली. तेवढ्यात तिला माझ्या कुशीतुन कोणीतरी ओढतय असं वाटायला लागलं. तिच्या दादाचं चोकलेट खाऊन झालं होतं आणि त्याला आता आपल्या मित्रांबरोबर खेळायला जायचं होतं. त्याने त्याच्या दोन्ही पायावर चालायला सुरुवात केली आणि काजल मात्र तिच्या वाट्याला आलेल्या एका पायावर फरपटत त्याच्या मागे जाऊ लागली. मला वाटत असेल त्यापेक्षा तिला माझ्याजवळ थांबावसं वाटत होतं हे तिच्या नजरेवरुन मला दिसत होतं. पण धटिंगण दादापुढे तिचं काहीच चालत नव्हतं. तश्याही अवस्थेत ती रडणं... हट्ट... काहीही न करता दादाच्या मागे-मागे लंगडत खुरडत जाऊ लागली. जाता-जाता मला छोट्याश्या हाताने टाटा करत होती.

तीची निरागस मिठी... नशिबाने दिलेली हतबलता आणि तरीही तिचा सगळ्या परिस्थितीचा नकळत स्वीकार... ह्या सगळ्याने माझ्या मनात मात्र विचारांचे काहूर माजले. तिच्या अंगात धड कपडे का नव्हते...!? दिपकइतके चांगले नसले तरी कमीतकमी थंडीत अंग झाकण्यापुरते तरी... दिपकसारखी ती टवटवीत का दिसत नव्हती...!? जुळी भावंडं... म्हणजे जन्म एकत्र झाला ना... मग तिने भावाला ’दादा’ का म्हणावे...!? तिला चॉकलेट नकोय हे तिच्याच वयाच्या भावाने परस्पर ठरवुन दोन्ही खाऊन टाकावीत हा त्याच्या आत्मविश्वास त्याच्यात कुठून आला...!? आणि तिला स्वत:चे नाव सुद्धा सांगता येऊ नये...!? काही वेळाने त्यांची नावं पण मला मुद्दाम ठेवल्यासारखी वाटू लागली. मुलगा कुल’दिपक’ आणि त्याला धरुन आलेली... पण नको असलेली काजळी... ’काजल’...! माझं डोकं कुणीतरी धरुन भिंतीवर आपटल्यासारखं सणकू लागलं. स्त्रीभ्रूण हत्या करणारे बरे म्हणायची पाळी आली ह्या नराधमांपुढे... निदान त्या न जन्माला आलेल्या जीवाला काय होतय ते कळत तरी नसतं...! अत्याचार सहन करणार्या स्त्रिया निदान शरिराने तरी स्वत:च्या असतात. आत्ता अंग झाकण्यापुरते कपडेही न देणारे आई-बाप पुढे-पुढे काय करतील तिचे...!? अश्या अवस्थेत ती जगणार कशी... आणि किती दिवस...!? का एक दिवस दिपक तेवता ठेवण्याच्या अट्टाहासात काजळी काढून टाकल्यासारखी तिला काढून टाकणार...!?

काजलवर होणार्या अत्याचाराची शिक्षा ठरवताना त्या चित्रगुप्ताची लेखणीसुद्धा थबकली असेल. काकुळतीला येऊन तो त्या सॄष्टीच्या निर्मात्यालाच म्हणला असेल... देवा... काय दोष आहे त्या कोवळ्या कळीचा... नशिब एखाद्याला किती हतबल करु शकतं आणि बाकीचे त्याला छळायला किती नीच पातळी गाठू शकतात हे पाहण्यासाठी का घातलंस जन्माला त्या लेकराला...!? काय मिळवलंस हा कॄर खेळ खेळून...!? कुठे फेडशील हे पाप...!?

प्रणव.

No comments:

Post a Comment

माझ्या ब्लॉगची जन्मकथा

नारळ फुटी

बर्याच दिवसांपासुन काहीतरी लिखाण करावं असं मनापासुन वाटत होतं. कधी विषय सुचायचे पण शब्दांत उतरवायला वेळ नसायचा. कधी वेळ मिळालाच तर काय लिहाव...