गुळगुळीत मोकळ्या रस्त्यावरुन संथपणे कार घराकडे जात होती. लांबून हिरवा दिसणारा सिग्नल नारंगी झाला. अजून वेग कमी करत मी वातावरणाची प्रसन्नता मनांत साठवत सिग्नल लाल व्हायच्या आधीच गाडी थांबवली. अश्यावेळी घरी जायची पण घाई करावी वाटत नाही. आज येवढं का छान वाटतयं हे अजून विचार करतोय तोच कारण समोर उभं राहिलं...! आत्तापर्यंत नुसतं प्रसन्न वाटत होतं... आता ह्रदयाचे ठोके जाणवू लागले... स्टेरिंगवर धरलेल्या हाताला बाष्प जाणवू लागलं... कार कितीही कंफर्टेबल असली तरी एक अनमिक अनकंफर्ट जाणवू लागला. रोज संध्याकाळी काऊंटरच्या पलिकडे दिसणारं जपानी सौंदर्य आज वेगळ्याच ढंगात सामोरं आलं होतं...! ते बदामी काळेभोर डोळे... चाफ्याच्या न उमललेल्या कळीसारखं बसकं नाक... पिंगट गोरापान रंग... मऊ रेशमी लांबसडक केस...! बिलींग कौंटरवर न दिसलेले ह्या हिरकणीचे कितीतरी पैलू त्या संध्याकाळच्या सोनेरी किरणांत लखाकून गेले...! आणि त्यात माझ्याकडे बघितल्यावर केलेलं हळूवार स्मितहास्य... गुलबक्षी ओठांतुन चमकलेली नाजूक एकसारख्या पांढर्याशुभ्र दातांची ओळ...! बास...! संध्याकाळच नव्हे आयुष्य सत्कारणी लावणारा तो क्षण...! दोनच सेकंदाची ती नजरभेट... कितीतरी भावनांची देवाणघेवाण... वीजेच्या... प्रकाशाच्या... कश्याच्याही वेगापेक्षा जास्त वेगांत...! सगळं जग ते दोन क्षण थबकलेलं...!
- प्रणव

No comments:
Post a Comment