Tuesday, May 21, 2013

आमचा गणा... एव्हरेस्टवर

काल फेसबुकवर आमच्या गणाला एव्हरेस्टवर तिरंगा फडकवताना पाहिलं आणि गेल्या १२-१३ वर्षांतील त्याच्याबरोबरच्या अनेक आठवणी झर-झर डोळ्यासमोरुन गेल्या... त्यात त्याने आता एव्हरेस्ट सर केल्यामुळे ’सर गणेश मोरे’ ह्यांच्याविषयी काही लिहीलं तर वावगं वाटू नये...! तो एव्हरेस्टवर जाऊन आला तरी मी त्याला ’आमचा गणा’च म्हणणार... त्यातली आपुलकी मला घालवायची नाहीये...!

 मला आठवतयं... आम्ही पन्हाळगड-विशाळगड ट्रेकला गेलो होतो... दीड दिवस पावसात जंगलवाट... भाताची शेतं... दगड-धॊंड्यांच्यामधुन... घसरड्या पायवाटेवरुन... ५५ किमी चालायचा घाट घातला होता. आम्ही शुक्रवारी रात्रीच पुण्याहून सुमो करुन निघालो. शनिवारी सकाळी पन्हाळगड सोडला. दिवसभरात ३५ किमी चालून पार केले. एका ठिकाणी रात्री मुक्काम केला. दुसर्या दिवशी... रविवारी सकाळी पुन्हा चालायला सुरुवात केली. गणाला शनिवारचे ऑफिस असल्याने तो आमच्याबरोबर येऊ शकला नव्हता. पण हा पठ्ठ्या ऑफिस झाल्यावर घरी न जाता आम्हाला भेटायला मलकापुरपर्यंत आला... जुलैचा महिना... ऑफिसच्या कपड्यांत... शनिवार रात्री बाईकवर दोनशे किमी... फक्त आम्ही कुठे आहोत हे बघायला. हा शरिरानेच ऑफिसमध्ये होता. मन आमच्याबरोबर रानावनात घिरट्या घालत होतं...!

 गणा ट्रेकला बरोबर आहे म्हणलं की नेहमी आधार वाटायचा ह्याचं मुख्य कारण म्हणजे... एरवी एकही शब्द न बोलता सगळ्यांच्या पुढे असलेला गणा कधीही कुणाला ट्रेकमध्ये काही त्रास होतोय म्हटलं की मदतीला हजर. हृषिकेश तर त्याला Rescue Squad च म्हणायचा...! कुठल्याही परिस्थितीत स्वत:च डोकं शांत ठेऊन दुसर्यांना धीर देत सावकाश आणि सुखरुप बाहेर काढणं ही गण्याची स्पेश्यालिटी...! मग ते बोराट्याच्या नाळीत ट्रेकला स्लिपर घालून आलेल्या काकू असोत की राजगड-तोरणा ट्रेकला उन्हाच्या तडाख्यात पाणी संपल्यामुळे जेरीला आलेले ट्रेकर्स असोत...!
अलंगवरची चाळीसफुटी खडकाची भिंत चढून जाण्याचा ’मोठ्ठा’ पराक्रम माझ्या हातुन घडण्याचे संपुर्ण श्रेय गणाला... एक तर हे असं काहीतरी करायचंय हे त्याने मला त्या कातळापाशी जाईपर्यंत सांगितलं नाही. नाहीतर कदाचित मी पुण्यातुन त्याला टाटा केला असता. इथेही सगळ्यांत आधी तो वर गेला. सगळ्या दोर्यांची बांधाबांध केली आणि मग आम्ही एक-एक करुन वर गेलो.
आम्ही सरसगड-सुधागड ट्रेकला गेलो होतो. मी आणि अजुन दोन मित्र आगाऊपणा करुन असेच एका आडवाटेने खडकावरुन वर चढलो. बुरुज बराच वर पण समोरच दिसत होता. सहज पोचू असं वाटलं. पण थोडं चढल्यावर वरती ग्रीप्स सापडेनात. तिथुन वर जाता येईना. खाली परत जावं म्हणलं तर लक्षात आलं की आता खाली पण उतरता येत नाहीये. आमच्या मागोमाग गण्यापण आला होता. चौघांमध्ये एकटा तोच शांत होता. बाकी तिघे चांगलेच घाबरले होते. पण गणा स्वत: आधी खाली उतरला आणि एक-एक करत सगळ्यांना खाली आणले.

प्रत्येकवेळी गणाला मी ट्रेकच्याच निमित्ताने भेटलो. मी जेव्हा इंजिनीयरींगला होतो तेव्हा गणा नोकरी करत-करत डिग्री होता. गणा, मी, हृषिकेश, अमोल आणि आमचे बाकी काही मित्र ह्यांचा भेटायचा पेटंट अड्डा म्हणजे शनिवारवाडा. गण्याचा प्रत्येक वीकएंड्ला कुठेतरी ट्रेक ठरलेलाच. शुक्रवारी ऑफिसवरून डायरेक्ट ट्रेकला... ते थेट रविवारीच घरी. तेसुद्धा सोमवारी सकाळी कामावर जावे लागणार म्हणुन...! नाहीतर हा बाबा डोंगरावरुन खालीच आला नसता...! ज्या दिवशी कुठे ट्रेकला जाणं जमणार नाही त्यादिवशी फर्ग्युसनच्या मागच्या बाजूच्या कातळावर... नाहीतर भाऊंच्या घरी... ह्याचं rock climbing चालूच...! 

सामान्यत: ट्रेकचा असतो तो छंद... आवड... पण एव्हरेस्टवर जायला लागतं ते वेड... जे आमच्या गणाला होतं... आहे... असंच राहिल...! त्याचंच हे फळ... घवघवीत यश...! शुभेच्छा तरी काय देणार... एकदा एव्हरेस्ट चढून आल्यावर अजुन उंचीवर जा तरी कसं म्हणणार...!? पण आम्हाला प्रचंड अभिमान आहे तुझा... मराठी नाव जागतिक यादीत कोरुन ठेवल्याचा... आणि सगळ्यात म्हणजे आमचा एक मित्र जगातल्या सर्वात उंच शिखरावर जाऊन आल्याचा...!
मला आठवतयं... मी, गणा आणि हृषिकेश... तिघांनी मिळून एक ट्रेकिंगची संस्था काढली होती... ’सह्यभरारी’ नावाची... त्याच्या नोंदणी वहीवर बाबासाहेब पुरंदरेंचा एक संदेश होता... "वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही... वेडी माणसंच इतिहास घडवतात...!" आमच्या गणाने तो आज खरा करुन दाखवला...!!!


प्रणव.

No comments:

Post a Comment

माझ्या ब्लॉगची जन्मकथा

नारळ फुटी

बर्याच दिवसांपासुन काहीतरी लिखाण करावं असं मनापासुन वाटत होतं. कधी विषय सुचायचे पण शब्दांत उतरवायला वेळ नसायचा. कधी वेळ मिळालाच तर काय लिहाव...