Sunday, December 9, 2012

घट्ट धरुन रहा...!




हिलरिजच्या समुद्र किनार्यावर बसलो होतो. संध्याकाळची वेळ होती. एक तरुण हातात पॅराग्लायडर, सर्फिंग बोर्ड घेऊन समुद्राच्या लाटांवर जायचा प्रयत्न करत होता. थोड्या प्रयासानंतर तो यशस्वी झाला. जोराचा वारा त्याच्या ग्यायडरमध्ये भरला. ग्यायडरने आकार घेतला. क्षणार्धात त्याने सर्फिंग बोर्ड पायाखाली घेतला आणि लाटांवर स्वार झाला. आधी त्याला वारंवार उचलून समुद्राबाहेर फेकुन देणार्या लाटा आता त्याची सोबत करु लागल्या. कारण आता तो त्यावर स्वार झाला होता. इकडे ग्लायडरने त्याला अचाट शक्तीने ओढायला सुरुवात केली. लाटांवर थडथडत काही क्षणात त्याला किनार्यापासून लांबच लांब घेऊन गेला. पण तो तरुण दोन्ही हाताने त्या ग्लायडरला घट्ट धरुन होता. पायातल्या सर्फिंग बोर्डलाही त्याने सुटू दिले नाही. पण समुद्राच्या अचाट शक्तीपुढे मानवी अस्तित्व ते किती...!? एका अजस्त्र लाटेने त्याला टाळूवर उभे केले...! तो एकीकडे... सर्फ बोर्ड एकीकडे... ग्यायडर मुरुकुटून खाली पडला... त्यात धरलेली हवा अचानकच सुटून गेली. किनार्यापासून कितीतरी आत... खोल-खोल समुद्रामध्ये...!

पण पठ्ठ्या हार मानणारा नव्हता... आजुबाजूच्या हवेचा तो अंदाज घेत होता... ग्यायडरला सारखे दोरीने उचकवत होता... प्रयत्न करत होता की ते परत हवेला लागेल... आणि एका अवचित क्षणी एका वार्याच्या झंझावाताने त्याच्या प्रयत्नांना स्वरुप दिले... पुन्हा शिडात वारा भरला... पुन्हा कुठलाही क्षण न दवडता त्याने जवळच तरंगत असलेला सर्फ बोर्ड पायाशी घेतला. ह्यावेळी वारा किनार्याच्या दिशेने वाहात होता. पुन्हा थडथडत्या लाटांवर स्वार होऊन त्याच ग्यायडरच्या मदतीने तो किनार्यावर आला... ज्या आत्मविश्वासाने आत गेला होता त्याच्या कित्येक पट जास्त आत्मविश्वास घेऊन...!

हे एक प्रतिक आहे आपल्या आयुष्याचं... ग्लायडर, सर्फ बोर्ड इ. हे लागतं विंडसर्फिंगसाठी... आपलं शिक्षण, संस्कार, मित्र, हितचिंतक हे लागतं लाईफसर्फिंगसाठी...! आत जाणं आणि यशस्वी होऊन परत येणं जरी ह्यांच्या हातात नसलं तरी ह्यांच्याशिवाय शक्यही नाही...! सुरुवातीला आत जाऊ न देणार्या लाटा ही संकटं आहेत काही नविन करताना येणारी...! त्याला नुसते सामोरं जाऊन नव्हे त्यावर स्वार होऊन मिळेल वाट... दिशा काही करण्याची...! हातात धरलेलं ग्लायडर आहे तुमचं नशिब. कुठे न्यायचं... किती वेगाने न्यायचं हे सर्वस्वी त्याच्या हातात आहे. पण त्यावर विश्वास ठेऊन त्याला घट्ट धरुन ठेवणं तर तुमच्या हातात आहे...! त्या ग्यायडरला ओढतेय ती हवा. हवा ही तुमच्या आजुबाजूची परिस्थिती आहे... नशिब बलवान ठरतं परिस्थितीवर...! दोन्हीची सांगड बसली की वेग आलाच समजा...!

तुम्ही खोल समुद्रात... किनार्यापासून लांब... एकटे असताना एखादी लाट तडाखा देऊ शकते. तुमचे नशिब झोपवू शकते. हार मानू नका. धीर गमवू नका. नशिबाला परत हवा भरण्यासाठी उचकवत रहा. पण संस्कार, मित्र, हितचिंतक हे सर्फबोर्ड आसपासच तरंगते असू द्या. त्यांना अंतर देऊ नका. अचानक नशिबात वारा भरेल आणि एकही सर्फबोर्ड हाताशी नसेल तरी पुन्हा किनारा गाठणे अशक्य...!

जे नशिब तुम्हाला खोल-खोल समुद्रात घेऊन गेलं होतं तेच तुम्हाला परत किनार्यावर आणून सोडेल. विश्वास ठेवा. वारा भरल्या ग्लायडरला आणि सर्फबोर्डला मात्र घट्ट चिकटून रहा...!

प्रणव.

2 comments:

  1. superb!!!! खूप आवडली पोस्ट... फेसबुक वर सुद्धा टाक ना..👍👍

    ReplyDelete
  2. अरे जुनी पोस्ट आहे. मागे टाकली होती फ़ेसबुकवर. आज मुग्धामुळे परत वर काढली.

    ReplyDelete

माझ्या ब्लॉगची जन्मकथा

नारळ फुटी

बर्याच दिवसांपासुन काहीतरी लिखाण करावं असं मनापासुन वाटत होतं. कधी विषय सुचायचे पण शब्दांत उतरवायला वेळ नसायचा. कधी वेळ मिळालाच तर काय लिहाव...