Sunday, December 9, 2012

मॅन्ड्रा आणि ऍना

र्वसाधारणपणे रियालिटी सिरीजकडे बघण्याचा आपला द्रूष्टीकोन जरा निगेटीव्हच असतो. पण काल टिव्हीवर एक एपिसोड बघितला. सिरीजचं नाव होतं Beauty & Beast... खुप विचार करायला लावणारी रियालिटी बेस्ड सिरीज आहे इथे. दोन टोकाच्या विचारसरणीच्या लोकांना एकत्र आणतात आणि एकमेकांच्या विचारांच्या देवाणघेवाणीतून दोघांतही काही सुधारणा होते का ते बघतात...!

कालचा एपिसोड दोन विवाहीत बायकांवर होता. एकीचे नाव मॅन्ड्रा आणि दुसरी ऍना... अंदाजे ४३ ते ४५ वर्षांच्या... दोघींची लग्न झालेली. दोघींना २-३ मुलं... पण दोघींच्या सौंदर्यामध्ये दोन ध्रुवांइतका फरक. आणि इथेच ह्या सिरीजची खरी मेख आहे...

मॅन्ड्रा एक घटस्फोटीत... ३ मुलांची आई... मोठी मुलगी १८ वर्षांची... पण ती स्वत: तिचे वाढणारे वय आणि घटत जाणारे सौंदर्य मानायला तयार नाही. गेल्या चार वर्षांत तिने कॉस्मेटीक सर्जरीवर जवळ-जवळ वीस हजार पौंड खर्च केलेत आणि महिना तीन हजार पौंडस, महागडी सौंदर्य़ प्रसाधनं, जीम, डाएट इ. वर खर्च करतेय. तिच्या ह्या वेडापाई तिची १८ वर्षांची मुलगी तिला कंटाळली आहे. तिच्या दोन लहान भावंडांना आई तिच्या भरोश्यावर टाकते आणि जाते कुठे तर पार्लर, जीम आणि सहा-सहा तास नट्टापट्टा करुन नाईट क्लबमध्ये...!

ऍना ह्याच्या उलट टोक. जन्मत: निसर्गानेच अन्याय केला. नाक, डोळे, कपाळ जिथल्या तिथे दिलेच नाही. पाच महिन्याची असतानाच पहिली सर्जरी करावी लागली चेहरा थोडातरी जागेवर आणायला. या अग्नीदिव्यात डाव्या डोळ्याची आहूती द्यावी लागली. त्यानंतर न कळत्या वयाची काही वर्ष बरी गेली आणि खरा त्रास सुरु झाला जेव्हा आजुबाजूच्यांनी... मित्रमैत्रिणींनी नाव ठेवलं... ’पिग्गी’...! शाळा, कॉलेजची वर्ष कशी काढली ते तिलाच माहित. तारुण्यात काढलेले फोटो सगळ्यांना आयुष्यभर पाहायला आवडतात पण हा अनुभव ऍनाच्या नशिबात नव्हता. तिच्या दु:खावर खरी फुंकर घातली ते तिच्या आयुष्याच्या साथीदाराने. तिच्या कुरुप चेहर्यापेक्षा प्राधान्य दिले तिच्या निर्मळ मनाला. आणि ऍनाचे सुखाचे दिवस सुरु झाले. दोन मुले आणि नवरा यांच्याबरोबर बावीस वर्ष ती सुखात आहे.

ह्या दोन टोकांना एकत्र आणण्याच घाट घातला एका टीमने. उद्देश एकच... मॅन्ड्रा काही दिवसांत एका अजुन महागड्या सर्जरीवर पैसे खर्च करणार आहे. हिच वेळ आहे तिला बाह्य सौंदर्यापेक्षा बाकी बर्याच गोष्टी महत्वाच्या आहेत हे दाखवण्याची. दोघींशी चर्चा करुन टीमने ह्या दोघींना काही आठवडे एकत्र घालवायचे ठरवले. ऍना काही आठवड्यांसाठी मॅन्ड्राच्या घरी राहयला आली. तिचे रोजचे जीम, पार्लर, डाएट इ. बघून तर ती अवाकच झाली. येवढा वेळ आणि पैसा कोणी फक्त स्वत:साठी खर्च करु शकतं हे तिला पटतच नव्हतं. ती सकाळी रनिंगला गेल्यावर तिच्या मुलीशी तिने गप्पा मारल्या. त्यात तिला बर्याच गोष्टी कळल्या. आधी असं कुणी वेळ देऊन बोलणारंच नव्हतं त्या १८ वर्षांच्या मुलीशी. आई सतत आपल्याच नादात दंग... आणि सोबतीला दोन लहान भावंडांची जबाबदारी...! आपली आई आपल्याच वयाच्या मुलींबरोबर नाईटक्लब मध्ये जाते हे तिला पटत नव्हतं पण कुणाला सांगताही येत नव्हतं. पण ऍनाच्या निमीत्ताने आज तिला मन मोकळं करता आलं होतं. जे आपल्या स्वत:च्या आईबरोबर इतक्या वर्षांत करता आलं नव्हतं तो कंफर्ट ह्या बाईने काही तासात दिला होता...!

ह्याच दिवसांत मॅन्ड्राबरोबर ऍना एका पार्लर मध्ये गेली. फेशियल आणि मसाज करायला. कुणा दुसर्याचा आपल्या कुरुप चेहर्याला येवढ्या वेळ फेशियलच्या निमीत्ताने का होईना पण कुरवाळण्याचा अनुभव तिला भरुन आणणारा होता. आपण ह्या द्रुष्टीने कधीच विचार करणार नाही. ह्या अनुभवासाठी ऍनासारखं आयुष्य घालवावं लागेल बहुदा...!

आता मॅन्ड्राची पाळी होती ऍनाच्या घरी जायची. तिच्या घरी तिचा नवरा आणि दोन मुलं. सगळे दिसायला यथातथाच. पण सतत आनंदी. एकमेकांना सारखे सांभाळणारे. एकत्र जेवायला बसणारे. टिव्ही एकत्र बघणारे. मॅन्ड्रा हे ऍनाचे सुख जास्त वेळ बघू शकली नाही. स्वत:ला ऍनापुढे सौंदर्याची खाण समजणारी मॅन्ड्रा काही तासातच अस्वस्थ झाली आणि त्याच रात्री हॉटेलवर राहायला गेली. दुसर्या दिवशी सकाळी परत येऊन तिने ऍनाची आणि तिच्या कुटुंबियांची माफी मागितली. पण ती आता बदलली होती.

जेव्हा ती स्वत:चे सौंदर्य जपण्याचा अट्टाहास करत होती तेव्हा तिला कुठेतरी गिल्टी फिल होतं. सगळ्याच गोष्टींचं... स्वत:वर अतोनात पैसा खर्च झाल्याचं... मुलांना वेळ न देऊ शकल्याचं... आपल्या ह्याच वेडापाई नवरा सोडून गेल्याचं... आणि मुख्य म्हणजे येवढं सगळं करुन जसं हवं तसं सौंदर्य परत न मिळाल्याचं...! पण ऍनाच्या काही दिवसांच्या सहवासांतच तिच्या ह्या सगळ्या संघर्षातुन तिला मोकळी वाट मिळाली होती. आपल्या घरी परत जाताना ती ऍनाला कडकडून मिठी मारुन फक्त म्हणाली... thank you so much...!!!

प्रणव.

P.S. इथे फक्त ऍनाचा फोटो टाकतोय. गोष्टीची खोली लक्षात येण्यासाठी. बाकी बाह्यसौंदर्याला प्राधान्य देणारी मॅन्ड्रा आपल्याला रोज आरश्यात दिसतेच...!


No comments:

Post a Comment

माझ्या ब्लॉगची जन्मकथा

नारळ फुटी

बर्याच दिवसांपासुन काहीतरी लिखाण करावं असं मनापासुन वाटत होतं. कधी विषय सुचायचे पण शब्दांत उतरवायला वेळ नसायचा. कधी वेळ मिळालाच तर काय लिहाव...