Sunday, June 25, 2017

#INDvsAUS

आमच्या गल्लीत एकांकडे कुत्रं सतत बांधून ठेवल्याने भयानक तिखट चिडकं झालेलं. एकदा संध्याकाळी ते चुकून सुटलं आणि थेट शेजारच्या अंगणात बसलेल्या काकूंच्या अंगावर गेलं. त्यांच्या हाताचा त्या कुत्र्याने इतका जोरात चावा घेतला की हात मनगट ते कोपरा पूर्ण ओरबाडून निघाला.

पहिला झटका ओसरल्यावर आणि काकूंच्या आरडाओरड्याने कुत्र्याने जायचा प्रयत्न केला पण आता त्याचे दात काकूंच्या हाताच्या लिगमेंट्समध्ये अडकले होते. झटापटीत काकू गंभीर जखमी झाल्या. हॉस्पिटलात ऍडमिट करून टाके, ऑपरेशन वगैरे प्रकार सुरु झाले.

कुत्र्याच्या मालकांनी त्या कुटुंबाची माफी मागत ट्रीटमेंटचा संपूर्ण खर्च देण्याची तयारी दाखवली. थोड्याफार तणावात पण भांडण मिटलं.

ऑस्ट्रेलियामध्ये कुत्रं माणसालाच नाही तर दुसर्या कुत्र्याला चावलं तरी संध्याकाळच्या बातम्यांमध्ये टीव्हीवर दाखवतात... कुत्रं अंगावर आल्याने रस्त्यावरचा माणूस घाबरला तरी श्वानमालकावर ऍक्शन होऊ शकते. रस्त्यावर 'मोकाट कुत्रा' हा प्रकार अस्तित्वातच नाही. बाकी ट्रीटमेंट, पेट हायजिन, पेट रजिस्ट्रेशन, त्याचा इन्श्युरन्स आणि पट्टयातल्या मायक्रोचिप सहित सगळी आन्हिकं पाळावी लागतात.

येवढं करून जर तुमचा कुत्रा कुणाला चावलाच तर तुम्ही मेलातच. जो काय बांबू तुम्हाला लागेल तो तुम्हाला जवळ-जवळ आयुष्यातूनच उठवेल. आणि ज्याला कॉम्पेन्सेशन मिळेल त्याला जॅकपॉटच... कुत्रा जेवढा जोरात चावेल तेवढी भरपाई जास्ती...!!

इथल्या युनिव्हर्सिटीत शिकायला असलेल्या माझ्या एका मित्राला कुत्र्याने जरासं बोचकारलं. भरपाईखातर ह्याला मिळालेल्या पैशातून अख्ख्या एका टर्मची फी निघाली. हा सोंड्या मला म्हणतोय, "यार असं प्रत्येक टर्मला मी कुत्र्याकडून चावून घ्यायला तयार आहे... टर्मची फी निघाली म्हणजे झालं....!!"

#INDvsAUS



भारताच्या तीन चतुर्थांश क्षेत्रफळ असलेल्या आमच्या स्टेटची लोकसंख्या पाहुणे धरून तीस लाखसुद्धा होत नाही. दरवर्षी तीन-चार महिने बऱ्यापैकी पाऊस पडूनदेखील एकूण शहराच्या वापरापैकी 'चाळीस टक्के' पाणी desalination करून वापरलं जातं. म्हणजे समुद्राचं पाणी शुद्ध करून आणि वेस्ट वॉटर प्रोसेस करून वापरण्याचे प्लांट्स आहेत.

गार्डन रेटिक्युलेशन हे वेस्ट वॉटरचंच असणं सक्तीचं आहे. असं असून पावसाळ्याचे चार महिने जर गार्डन sprinkler सुरु दिसले तर ऑन दी स्पॉट $१००० दंड आहे.

पुण्याला आम्ही कसब्यात रहात असताना नळाला तोटीच (टॅप) नसायची. कॉर्पोरेशननेच बंद केलं तरच पाणी बंद होणार नाहीतर गंगा वाहती...!! ह्याला प्रमुख कारण म्हणजे नळ लावला तरी दुसर्या दिवशी चोरीला जायचा. मग राहू देत वाहता..!!

जिथे एका नळाच्या तोटीपेक्षा रोज वाहिलेलं पाणी परवडत असेल तर त्या मानाने पाण्याची चांगलीच सुबत्ता होती म्हणा की..!!

#INDvsAUS



इकडे काही सिटी कौन्सिलच्या नियमनुसारच घर बांधावं लागतं. हे नियम घराच्या बाह्यरंगापासून, विटांचा रंग, कौलांचा रंग, कंपाउंडचा रंग किंवा कंपाउंड लाकडी किंवा पत्र्याचं करायचं इथपर्यंत लागू होतात. दोन किंवा तीन ऑप्शनमध्येच निवड करावी लागते. तुम्ही कितीही लाख डॉलर्स खर्च करत असलात तरीही...!!
केवळ सबर्ब एकसारखं दिसावं म्हणून... नाही पटलं तर सबर्ब बदला...!!

माझ्या लहानपणी आमच्या गल्लीत नव्यानेच बौद्ध दीक्षा घेतलेल्या जमदाडे काकांनी घरासमोरचं लोखंडी गेट निळ्याशार रंगांनी रंगवून काढलं. त्यांच्याशी खुन्नस असलेल्या सूर्यवंशी काकांनी लगेच आपल्या गेटला भगवा जर्द मुलामा चढवला. त्या दोघांच्या सापटीत सापडलेल्या आणि गेल्याच वर्षांपूर्वी बाप्तिझ्मा घेतलेल्या साळवी काकांनी मात्र आपल्या पांढर्या शुभ्र गेटला हात लावला नाही.

आम्ही पोरं संक्रांतीच्या दिवशी तिन्ही घरी तिळगुळ देऊन मोठ्यांच्या पाया पडायचो.
त्या मानाने बरंच चाललं होतं म्हणा की...!!

#INDvsAUS



अडीच कोटी लोकसंख्या... प्राथमिक शिक्षण सक्तीचं... मतदान नाही केलं तर दंड... दोनच प्रमुख पक्ष...
चार वर्षात चौथा पंतप्रधान आहे इथं... जरा खुट्ट झालं की 'खो' देतात... आधीच्या सगळ्या पॉलिसी अपसाईड डाऊन...!!

त्या मानाने बरं चाललंय म्हणा की...!!

#INDvsAUS



इथं ७६ लाख स्क्वेअर किलोमीटर एरियामध्ये 'अडीच कोटी' जनता राहतेय...
आणि तिथं ३२ लाख स्क्वेअर किलोमीटर एरियामध्ये '~एकशे तीस' कोटी जनता राहतेय...!!

त्यामानाने बरं चाललंय म्हणा की..!!

#INDvsAUS

No comments:

Post a Comment

माझ्या ब्लॉगची जन्मकथा

नारळ फुटी

बर्याच दिवसांपासुन काहीतरी लिखाण करावं असं मनापासुन वाटत होतं. कधी विषय सुचायचे पण शब्दांत उतरवायला वेळ नसायचा. कधी वेळ मिळालाच तर काय लिहाव...