Sunday, June 25, 2017

पुढच्या मुक्कामी...!!

र्थ... 'वाका स्टेडियम' हे क्रिकेटमुळे ऐकलेलं नाव सोडलं तर पर्थ कुठे आहे हे माहितही नव्हतं.. इकडे जॉब मिळाल्यावर आधी गुगल मॅपवर बघितलं. ऑस्ट्रेलिया म्हणलं की सिडनी हार्बर ब्रिज आणि ऑपेरा हाऊस एवढंच माहित असलेल्याना एका टोकाचं वेस्टर्न ऑस्ट्रेलिया अजिबात झेपत नाही.

पर्थला दोनच वेळा लोक स्वतःहून येतात.. स्टेट स्पॉन्सर्ड व्हिसा असेल तर किंवा डायरेक्ट इकडे जॉब मिळाला तर. आम्ही दुसऱ्या कॅटेगरीतले...!!
परदेशातली पहिली नोकरी. अमुक-अमुक व्यापाऱ्यांचे आजोबा जसे फक्त तांब्या आणि कपड्याची वळकटी घेऊन एका गावात जातात आणि पुढे बिझनेस सेट करून करोडपती होतात, अगदी तशी सुरुवात... फक्त एक कपड्याची बॅग घेऊन आमची इकडे एंट्री...!! (लगेच करोडपती झालो का विचारू नका... वाईज दम धरा.. क्योंकी पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त...!!)

'एका मराठी माणसाचा फोन नंबर' एवढीच काय ती माहिती.. (ज्याला पुढचा एक वर्ष फोनदेखील केला नाही.) बाकी औषधालासुद्धा एकाचीही ओळख नाही. एयरपोर्टला रिसिव्ह करणारी एच. आर. लेडी आणि दुसऱ्या दिवशीपासून सुरु होणारा जॉब येवढ्याच काय त्या आधाराच्या गोष्टी...!!

एका प्रदेशतज्ञाच्या मते (म्हणजे मीच हो) ऑस्ट्रेलियात पर्थ हे रत्नागिरी आहे, मेलबर्न हे पुणे आहे आणि सिडनी हे मुंबई आहे.

रत्नागिरीसारख्या नयनरम्य समुद्रकिनाऱ्यापासून ते झाडाचे वासे वापरून केलेल्या लाईटच्या खांबापर्यंत आणि कौलारू टुमदार घरांपासून त्यात राहणाऱ्या जीवाला जीव लावणाऱ्या प्रेमळ माणसांपर्यंत पर्थ अगदी आपल्याकडच्या एखाद्या टुमदार गावाप्रमाणे आहे.

पर्थमध्ये कित्येक गोष्टी शिकलो. परदेशात राहण्याचा, वावरण्याचा, पैसे कमवण्याचा, हर तर्हेचे मित्र बनवण्याचा आणि माहित नाही अश्या कित्येक गोष्टींचा कॉन्फिडन्स पर्थने दिला...!!

आज बरोब्बर चार वर्षे आणि सहा महिने झाले.. आमचा इथला मुक्काम संपला. विंचवाचं बिर्हाड पुन्हा एकदा पाठीवर चढलं. पुढच्या मुक्कामी.. मुक्काम पोस्ट मेलबर्न...!!

नवीन शहर, नवीन ऑफिस, नवीन मित्र आणि नवीन वातावरण.. तिकडे जाऊन काय दिवे लावीन ते काळ दाखवेलच पण पर्थमधून मात्र खूप आनंदात, समाधानाने आणि कृतज्ञतेच्या भावनेनं जात आहे.
आमच्या आठवणींच्या अल्बममध्ये ही साडेचार वर्ष एक सेक्शन आयुष्यभरासाठी व्यापून राहतील हे नक्की...!!

प्रणव.

No comments:

Post a Comment

माझ्या ब्लॉगची जन्मकथा

नारळ फुटी

बर्याच दिवसांपासुन काहीतरी लिखाण करावं असं मनापासुन वाटत होतं. कधी विषय सुचायचे पण शब्दांत उतरवायला वेळ नसायचा. कधी वेळ मिळालाच तर काय लिहाव...