Tuesday, June 2, 2015

'bucket लिस्ट'

जगण्याची वर्ष धडाधड संपत चालली आहेत पण ज्याच्यासाठी जगायचं ती 'bucket लिस्ट' मात्र हळूहळूच पुढे सरकतेय... बरंच राहून गेलंय अजून... जे करायचयं...

पंधरा हजार फुट उंचीवरून अवनीकडे एकदा झेपावून बघायचंय...

समुद्राच्या तळाशी दडलेलं थर्ड वर्ल्ड डुबकी मारून बघायचंय...

मिलर सारखं water कलर्स घेऊन व्हेनिसच्या कालव्यावर तरंगणार्या होडीचं चित्र रंगवायचंय...

अथेन्सच्या भग्ना वषेशाकडे पाहून सुस्कारे सोडायचेत...

पडक्या-मोडक्या ट्रोय कडे पाहून हळहळायचंय... तरीपण आर्किलीजच्या टाचेला श्रीकृष्णाच्या तळपायाची उपमा देण्यात धन्यता मानायचीय...

क्लिंट इस्टवुडसारखं टेक्सासच्या वाळवंटात तळपत्या उन्हातून घोड्यावरून एक तरी रपेट मारायचीय...

मी स्वत: काम केलेल्या वेगसच्या 'त्याच' कॅसिनो मध्ये वीस डॉलर्स का होईना... Black Jack खेळायचाय...

आल्प्सच्या बर्फाच्छादित उतारावरून धडपडत का होईना स्किईङ्ग करायचंय...

लंडनच्या संग्रहालयात 'भवानी' बघून रक्त जाळायचंय...

रायगडाच्या त्या समाधीपुढं पुन्हा एकदा नतमस्तक व्हायचंय...

हरिश्चन्द्राच्या कोकणकड्यावरुन खोलखोल बघायचंय...

मुल्हेरच्या अंधार्या शिवालयाच्या गाभार्यात पुन्हा एकदा धीरगंभीर ॐकार लावायचाय...

कानात हेडफोन लावून का होईना, आळंदीच्या इन्द्रायणीतीरी 'हरिपाठ' ऐकायचाय...

जगात कुठे का असेना, 'तुकाराम बीज' प्रभातचा 'संत तुकाराम' बघूनच साजरी करायचीय...

DSLR कॅमेरा घेऊन पंढरपूरच्या वारीमध्ये 'तुळशीमाळ गळा, भाळी चंदनाचा टिळा...' टिपायला जायचंय...

दासबोधातला 'एक'च पण 'संपूर्ण' समास मनापासून आचरणात आणायचाय...

हळ्ळेबिडच्या शिल्पांचं तासंतास निरीक्षण करत बसायचंय...

हंपीच्या गतवैभवाला आणि पुरातन आधुनिकतेला बघून तोंडात बोटं घालायचीयेत...

कंबोडियाच्या अंगकोरला बसून देवालायांची चित्र रेखाटायची आहेत...

पुन्हा एकदा पाडवा पहाट संजीव अभ्यंकरांचा 'भिन्न षड्ज' ऐकून मंत्रमुग्ध करायचीय...

फक्त तबलाच नाही... फोटोग्राफी, पेंटिंग, स्केचिंग, ट्रेकींग, rock climbing, writing आणि जे जे राहिलेले किडे आहेत ते सगळे पुर्ण करायचेत...

'वीस विकत आणि बाकी फुकट' का होईना... स्वत:च एक तरी पुस्तक छापायचंय...

हे करायचंय आणि ते करायचंय... रात्र थोडी आणि सोंग फार... पण माझी कमिटमेण्ट आहे स्वत:लाच... ह्या लिस्टमधली पाच तरी गोष्टी 'करणारच'...!!

आणि कमिटमेण्ट्च्या बाबतीत आपण एकदम सल्लुभाईच्या उलट आहोत... 'एकबार जो कमिटमेण्ट कर दी... तर काय नाय... प्रयत्न करतो जसं जमेल तसं...!!'

प्रणव.

No comments:

Post a Comment

माझ्या ब्लॉगची जन्मकथा

नारळ फुटी

बर्याच दिवसांपासुन काहीतरी लिखाण करावं असं मनापासुन वाटत होतं. कधी विषय सुचायचे पण शब्दांत उतरवायला वेळ नसायचा. कधी वेळ मिळालाच तर काय लिहाव...