क्षणैक पाहता हे तान्हूलं
मनात माझ्या सहजं वाटलं
परतुन का रे येईना
हे बालपण मज का देईना...
मखमली त्वचेचा स्पर्श
डोळ्यांत निरागस हर्ष
तो निष्पापपणा का येईना
हे बालपण मज का देईना...
अलगद हृदय हे लोण्याचं
परी भय ना आग-पाण्याचं
ती निर्भयता का येईना
हे बालपण मज का देईना...
नसे कसलीच चिंता जगाची
भिस्त ना आल्या-गेल्याची
तो अलिप्तपणा का येईना
हे बालपण मज का देईना...
डोळे वटारताच कोणी
नयनांत तरारले पाणी
ही भावुकता का येईना
हे बालपण मज का देईना...
इवलिशी पावले अन इवलेसे तळहात
गोंडस गोजिरवाणे हास्य
करी क्षणात सगळ्यावर मात
ही मोहकता का येईना
हे बालपण मज का देईना...
मुले तर दुधावरची साय
आशिषाचे हात अन परमेशाचे पाय
ही सात्विकता का येईना
हे बालपण मज का देईना...
-प्रणव.
No comments:
Post a Comment