Sunday, April 29, 2012

तो आणि ती: एक सुखसंवाद


ती: आई-बाबा मित्रमैत्रिणी सोडून आली तुझ्या घरी तिचे मन सांभाळायची आता कोणाची जबाबदारी ? अनोळख्या कुटुंबात इतकी ती एकरुप होते स्वतःची काही आवड होती हेच मुळी विसरुन जाते अशा तुझ्या पत्नीसाठी थोडासा बदलशील का ? तिच्या मनाचा थोडातरी विचार जरा करशील का ? कधी सकाळी लवकर उठून चहा तिला नेऊन दे वाफाळता गरम उपमा हळूच पुढ्यात आणून दे भाजीत मीठ नसले तरी हसून वेळ मारुन ने स्वैपाकाला कधी तरी कौतुकभरले शब्द दे "साडी मस्त शोभतीये आज" मनमोकळी दाद दे आठवणीने सुवासाचा कळीवाला गजरा दे सुटीत एखाद्या एकटीलाच आपणहून फिरायला ने खमंग कणीस खातानाचा आनंद मनात टिपून घे हॉटेलातील मेनू कधीतरी तिच्या चॉईसचा घेऊन दे आईस्क्रीमची आवड सोडून तिच्याबरोबर कॉफी घे मुलगीच समजून हट्ट एखादा तूच जरा समजून घे वाढदिवस नसतानाही प्रेझेंटचा धक्का दे वादात स्वर उंचावतातच शांतपणे ऐकून घे पुरुषप्रधान संस्कृती सोडून माणूसपणाला थारा दे झोपताना थोपटून तिला आधाराची कुशी दे जमलेच तर सुरात गुणगुणून स्वप्नांची मोकळीक दे हातात हात घेतलास लग्नात, आता खरी साथ दे नवरेपणा दूर टाकून विसावायला प्रेमळ खांदा दे अशी काहीशी साथ दे मित्रत्वाचा हात दे............


तो: सखे तुला माहितीये का? हे सगळं सांगुन तु माझ्यावरचा किती मोठा ताण कमी केला आहेस ते? तुझ्या अपेक्षा मी ओळखुन मग त्या पुर्ण करायच्या दिव्यातुन माझी सुटका केली आहेस ते? मला ह्याची पुर्ण जाणिव आहे की तु तुझे घर, माणसं, मित्र-मैत्रिणी सोडून आली आहेस ते. कुटुंबात एकरुप होण्यासाठी जमेल ती आणि आवश्यक ती सर्व मदत मी करीनच... पण ज्या कोमल मनाने तु हे सांगितलेस त्याच कोमल मनाने ह्या नाण्याच्या दुसर्या बाजूलाही समजून घेशील का?

लग्नानंतर जे नविन आणि अनपेक्षीत तुझ्या आयुष्यात घडतयं ते माझ्याही आयुष्यात घडतयं. जितकं हे सगळं तुला नविन आहे तितकं ते मलाही नविन आहे. माणसं आणि घर तेच दिसतय... पण त्याच माणसांतला तुझ्या येण्यानंतरचा फरक बघणं तेवढच अवघड आहे जेवढं तुला नविन घरांत वावरणं...! हा फरक वाईट नाही पण वेगळा आहे... जसं तुझं घर सोडून येणं... वाईट नाही पण वेगळं... अगदी तसचं...! तुझ्याप्रमाणे माझ्याही आवडी-निवडी बदलल्यात...! पुर्वीच्या माझ्या सवयींमध्ये बदल झालाय. फ़ुल्ल व्होल्युम मध्ये क्लासिकल म्युझिक ऐकण्यापासून... रात्री उशीरापर्यंत मित्रांबरोबर फिरायला जाण्यापर्यंत...! नॊन-व्हेज खाण्यापासून... दाढी-मिश्यांच्या स्टाईलपर्यंत... इंग्लिश पिक्चर बघण्यापासून कपडे घालण्याच्या स्टाईलपर्यंत... सगळ्याच...!

माझ्या समोर आदर्श गृहिणीची इमेज होती माझी आई...! तिच्या आणि तुझ्यात असलेला अमुलाग्र फरक बदलत्या काळानुरुप समजुन घेणं तुला सोपं वाटतं का? आपण आपल्या लहानपणी खाल्लेल्या पापडाच्या पिठाच्या बोट्या... कच्च्या कैरीचे ताजे लोणचे... हे सगळे आपल्या मुलांना मिळणे तर लांबच पण त्यांना आता पाळणाघरांत बालपण घालवावे लागतयं ही खंत त्यांच्या दोन्ही आजी-आजोबांना आहे तेवढी मलाही आहे. पण हे तुझ्या करिअरसाठी इतरांनी सामावुन घेतलेले बदल तु लक्षात घे. महागाईसाठी नोकरी करते म्हणशील तर ती तेवढीच वाढते जेवढे आपले पगार...! आपल्या बाबांना गलेलठ्ठ पगार होते म्हणून आपली आई गृहिणी नव्हती. संसाराच्या कावडीची एक बाजू ती सांभाळत होती.

आणि ’पुरुषप्रधान संस्कृती’ ही तर संकल्पनाच भाकड आहे. आपल्या शरिराचे बाह्यांग दिसत असते म्हणून तेच फक्त महत्वाचे असे म्हणण्यापैकी आहे हे...! शरिरातील अंतर्गत भाग जी महत्वाची भुमिका बजावतात त्यावर बाह्यांगाचे दिसणे... राहाणे असते...! समाजातील शांतता ही घरातील संस्कारांवर अवलंबुन असते. आणि ते देण्याची कितीतरी महत्वाची आणि जोखमीची जबाबदारी स्त्रीवर असते. समाजात सगळीकडे फक्त पुरुषांचा वावर दिसणे ह्याला पुरुषप्रधान संस्कृती म्हणत नाहीत. खरा पुरुषी स्वभाव साधे लग्नही करायला तयार होणार नाही. त्यापुढे जाऊन मुलांचे... आजारी पत्नीचे... आईचे... सगळे करायला तयार होणारा पुरुष ’माणूसपणा’ सोडलेला असेलच कसा...!? बाहेरच्या जगाचे चट्के खाऊन घरी परत आल्यावर प्रेमाने विचारपुस करण्यार्या व्यक्तीची त्याच्याही मनाची गरज आहे. तुला शिवलिंगाची संकल्पना माहित आहे का? अगं तो काही देव नाही... ते आहे समाजाचे एक प्रतिक...! पुरुषाच्या राकट, विध्वंसक प्रकृतीला जर तुझ्या प्रेमाने जखडून शांत केलेस तर तेच एखाद्या सुंदर नवनिर्माणाला कारण होऊ शकते.

शेवटी असं आहे ना सखे की तुझं मी ऐकून घ्यायचं आणि माझं तु...! बाकी नाती ही निसर्गदत्त असतात. पण हेच नातं आपल्याला घडवून आणावं लागतं... आपण आणतोही...! कारण ती गरज असते... ’दोघांची...!

- प्रणव

सुचना: वरील संवाद हे नवरा-बायको मधील प्रातिनिधीक स्वरुपाचे असून त्याचा कोणत्याही जीवीत अथवा विवाहित व्यक्तीशी संबंध नसून असल्यास तो एक निव्वळ योगायोग समजावा.

1 comment:

माझ्या ब्लॉगची जन्मकथा

नारळ फुटी

बर्याच दिवसांपासुन काहीतरी लिखाण करावं असं मनापासुन वाटत होतं. कधी विषय सुचायचे पण शब्दांत उतरवायला वेळ नसायचा. कधी वेळ मिळालाच तर काय लिहाव...