जगात सगळे जपानला जपान... ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलिया... आणि अमेरिकेला अमेरिका म्हणतात... मग भारतालाच इंडिया का म्हणतात...!?
वरवरचं उत्तर पाहिलं तर आपला देशच असा आहे की त्याला कोणी काहिही म्हटलं तरी तो ऐकून घेतोच...! आणि सामान्या माणसाच्या... कॉमन मॅनच्या काळजातलं उत्तर ऐकायचं असेल तर दोन-तीन खोल कारणं आहेत... ऐका...!
इंग्रजी ओंजळीनं आपल्याइथले अजूनही पाणी पितात,
म्हणून जगात भारताला सगळे इंडिया-इंडिया म्हणतात...!
केजी, मॉंटेसरी.. इंग्रजी कविता घराघरात घुसली,
घाबरली रामरक्षा, गोपद्म-रांगोळॊ पुसली.
ओवाळणं गेलं, वाढदिवसाचं मेणबत्ती फुंकण्याची वेळ आली,
इतिहासजमा शुभंकरोति, तिच्याच आयुष्यात संध्याकाळ झाली.
अरे झेलत थुंकी त्यांची इथले चकोर पोटं भरतात...
म्हणून जगात भारताला सगळे इंडिया-इंडिया म्हणतात...!
भिक मागतो डॉलरची लिबर्टी स्टॅचू आधार दे,
भारतमातेची ज्योत पेटवायला थोडा अग्नी उधार दे.
शिकून-सवरुन अमेरिकेला पोरं जी गेली,
पांढर्या केसांची हिरवी मनं त्यांची वाट पाहून मेली.
अरे लाथ मारुन त्या हिरव्या मनाला, ते ग्रीन कार्ड मिळवतात...
म्हणून जगात भारताला सगळे इंडिया-इंडिया म्हणतात...!
शांतीसाठीच्या परिषदा ज्या दिवशी इथे भरतात,
त्याच दिवशी ते खुशाल आपल्या जवानांना गोळ्या घालतात
आपला प्रत्येक प्रश्न रक्ताळून येतो,
शांतिच्या कबुतरांचा शेवटी जटायू बनून येतो...
आपण काहीच प्रयत्न करत नाही म्हणुन ते येऊन टपल्या मारतात...
म्हणून जगात भारताला सगळे इंडिया-इंडिया म्हणतात...!
No comments:
Post a Comment