Friday, April 6, 2012

अहिंसा सशक्ताचीच...

ज महावीर जयंती. इसवीसन पुर्व सहाशे वर्ष... जेव्हा धर्माच्या नावाखाली काही समाजकंटकांनी समाजातले सर्वाधिकार जखडून ठेवले होते तो काळ... खर्या अर्थाने समाजप्रबोधनाची... धर्मप्रबोधनाची गरज असलेला काळ...! फार वर्णन करण्याची गरज नाही. आज जे काही चालू आहे तेच आणि अगदी तसचं चालू असलेला काळ...! एक राजपुत्र... ज्याने जन्मापासून राजवाड्यातील सुखं, धन, आराम, हिरवळ, मेवा-मिठाई, हिरव्यागार बागा आणि थुई-थुई नाचणारी कारंजी ह्याखेरीज काही पाहिलेही नव्हते...! वडिलांची नजर चुकवुन तो महालाबाहेर पडतो आणि थोड्याश्या दुखा:ने त्याचे उर फुटून येते. तो अंत:करणातुन खचतो. पण विधात्याचा खेळ इथुन सुरु होतो... दुखा:चे शस्त्र करण्याची दैवी शक्ती घेऊन तो आलेला असतो. सर्वसामान्य माणसाला जिथे सगळे संपले असे वाटते तिथुन ह्या अश्या अतिमानवांचा खरा प्रवास सुरू होतो...! समाजातील जातीय भेदभाव, स्त्री-पुरुष भेदभाव, उच्च-नीच भेदभाव सगळे सोडून एका छत्राखाली येण्यासाठी लोकांना प्रव्रुत्त करतो. अहिंसा हा माणसातील सर्वश्रेष्ठ गुण अंगी बाणवायला सांगतो. पण सामान्य माणसाचा गोंधळ उड्तो तो इथेच... अहिंसा आणि स्व-संरक्षण ह्यातील फरक लक्षात येत नाही आणि सगळा घोटाळा होतो. दुसर्याला स्वत:हून त्रास देणे हि हिंसा होऊ शकते पण आपले दुष्टापासून संरक्षण करणे ही हिंसा नाही... प्रतिकार आहे. दुसर्याकडून होणारी हिंसा सहन करणे ही देखील हिंसाच आहे...!

एक सोप्पे उदाहरण घेऊ... एका जंगलात तीन प्रकारचे प्राणी असतात. वाघ, ससा आणि हत्ती...! ह्यात स्वत:हून दुसर्याला फाडून खाणारा वाघ अर्थातच ’हिंसा’ करणारा... दुर्बल सश्याला वाघ विचारत बसणार नाही... "का रे बाबा... तु अहिंसावादी आहेस का? मग जा. मी तुला काही करणार नाही हं...!" सरळ फडश्या पाडणार. म्हणजे सश्याने कितीही डिंडोरा पिटला तरी तो अहिंसावादी होत नाही. आता हत्तीची गोष्ट घ्या...! त्याच्यासमोर वाघ आला आणि त्याला त्रास देऊ लागला तर सोंडेत उचलून फेकून द्यायला त्याच्याकडे शक्ती आहे. पण तो स्वत:हून सश्याला आणि वाघाला त्रास देणार नाही. ह्याचा मतितार्थ असा की... जर तुमच्यात शक्तीच नाही... तुम्ही दुर्बल आहात तर तुम्हाला कुणी विचारलेच नाहीये की तु कुठल्या पक्षात आहेस म्हणून...!

मुळ मुद्दा असा आहे की अहिंसेचा संदेश तेव्हाच पुर्ण होतो जेव्हा तुम्ही वेळप्रसंगी दुष्टाला नामशेष करण्याचे बळ अंगी बाळगता. आणि हेच संत तुकारामांनी, संत रामदासांनी, शिवाजी महाराजांनी, श्रीकॄष्णानी, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आणि अनेक महापुरूषांनी वेळोवेळी सांगितले आहे. स्वातंत्र्य जसे स्वयंशिस्तीशिवाय पुर्ण होत नाही तशीच अहिंसा ही बलाशिवाय पुर्ण होत नाही. कुणी तुमच्या एका गालावर देखिल मारायला धजावणार नाही इतका सशक्तपणा तुमच्या अंगी असलाच पाहिजे. आता हा सशक्तपणा म्हणजे प्रत्येक वेळी शरिराचाच नसतो. तो शुद्ध चारित्र्याचा, व्यसनं न करण्याचा, वेळेच्या काटेकोरपणाचा, शुद्धलेखनाचा, पाठांतराचा, उच्चशिक्षणाचा... अगदी नेहेमी खरं बोलण्याचा देखिल असू शकतो. तुम्ही एखादी गोष्ट नित्यनेमाने करताय... जसे एखाद्या ठिकाणी वेळेवरच जाताय, एखादे नेमुन दिलेलं काम जबाबदारीने पूर्णच करताय, तुम्ही दिलेल्या कमिटमेंट्स नेहमी पाळताय, कुणाविषयीही कसालाही निगेटीव्ह विचार करत नाही... तर कुठलाही पापात्मा तुम्हाला बिचकल्याशिवाय राहणार नाही.

मिलिटरीमध्ये साध्या चालक पदावर असणार्या आणि नंतर राळेगणसिद्धीसारख्या छोट्या गावात समाजकार्य करणार्या पण चारित्र्याने शुद्ध असणार्या अण्णा हजारेंसारख्या सामान्य नागरिकाने सव्वाशेकोटी लोकांवर राज्य करणार्या सरकारला जेरीला आणले. ह्याला म्हणतात शक्ती... त्याचवेळेस अण्णा हजारेंना कैद केल्यावर जवळ-जवळ सगळा देश त्यांच्या एका शब्दावर काय वाट्टेल ते करु शकला असता. सर्व दंगलीत होतात त्या जाळपोळी, तोडफोडी, मालमत्तेचे नुकसान, लुटालूट आणि बंद तेही करु शकले असते. पण अण्णांनी अश्या कुठल्याही आतताई सुचना आपल्या अनुन्यायांना केल्या नाहीत आणि शांतता राखायला प्रवृत्त केले. ह्यालाच म्हणतात अहिंसा...!!!

- प्रणव

No comments:

Post a Comment

माझ्या ब्लॉगची जन्मकथा

नारळ फुटी

बर्याच दिवसांपासुन काहीतरी लिखाण करावं असं मनापासुन वाटत होतं. कधी विषय सुचायचे पण शब्दांत उतरवायला वेळ नसायचा. कधी वेळ मिळालाच तर काय लिहाव...