आज जिजाऊ आईसाहेबांची जयंती. एका युगपुरुषाची आई... गुरु... आणि त्याचं सर्वस्व...!!! शिवबा आणि जिजाऊचं खरं नातं इतिहासाच्या पुस्तकात कधीच कळत नाही. ते आईच्या कुशीत शिरूनच जाणून घेता येतं.
प्रत्येकाच्या मनात त्याचा स्वत:चा एक 'शिवबा' असतो. थेट स्वराज्य नाही पण काहीतरी कर्तुत्व दाखवण्याची उमेद असते... त्यातून एक धमक त्याच्या अंगी येते. हातून काहीतरी चांगली गोष्ट घडतेही... मग त्याचे मन मागे वळते ते मिळालेल्या यशावर कौतुक ऐकायला.
अश्यावेळी त्याला जगाच्या कोरड्या... बेगडी कौतुकापेक्षा एकच वात्सल्याची नजर हवी असते. आपल्या आईची...!!
माझी आई... जिजाई...!!
ती माझी आई... जिजाई...!!
त्वचा-पेशी-श्वास तुझा
त्यासवे बनला जीव माझा
मी म्हणे हा वेगळा मी-मी...
तुझा चालता अंगभाग मी...!!
तव उपकाराचा न होणे उतराई...!!
ती माझी आई... जिजाई... जिजाई...!!
प्रणव.

No comments:
Post a Comment