पु.ल. आणि सुनिताबाई एडनबर्गमध्ये
पु.लं.नी १९८७ साली न्युजर्सीमध्ये झालेल्या भाषणामध्ये सांगितलेला हा किस्सा... ते एकदा एडनबेर्गमध्ये सुनिताबाईंबरोबर शहर बघत फिरत होते. शहरात असणार्या एका डबलडेक बसमध्ये ते वरती गेले आणि तिकडे पाहतात ते सगळ्या गोर्या ’सिनीअरसिटीझनाबाई’... त्यांच्याकडे पाहात पु.ल. आपल्या पत्निला म्हणाले,"का गं, इकडे तर सगळ्या थेरड्याच दिसताहेत...!?" त्यांचे बोलणे ऐकून त्या बायकांतील एक बाई म्हणाल्या,"आपण मर्हाटी का?" त्याचक्षणी पु.लं.च्या छातीत धडकी भरली. मराठी साहित्यीकाचा एडनबर्गात अपम्रुत्यू अश्या बातम्या त्यांच्या डोळ्यापुढे दिसू लागल्या... भयंकर अवस्था हो...! पण तेवढ्यात त्या स्कॉटिश बाई पुढे आल्या आणि त्यांनी ते कुठले काय अशी त्यांची मराठीतून चौकशी केली. त्या बाईंचा जन्म भारतातीलच एका ऍंग्लो-इंडियन वसाहतीत झाला होता... तिथे तिचे आई-वडिल मिशनरी होते. लहानपणापासून तिच्या कानावर मराठीच पडलेली होती. त्या बाईंचे बालपण नगरच्या दीनदुबळ्या गरीब लोकांच्यात गेल्याने तिच्या मराठी बोलण्याला एक नगरी ग्रामीण असा हेलकावाही होता. कित्येक दिवसांनी मराठी कोणीतरी भेटल्याचा तिला आनंद होता. त्या बाई पु.लं.ना सपत्निक आपल्या घरी घेऊन गेल्या... मोठ्या मायेनं... प्रेमानं त्यांचा पाहूणचार केला. सुनिताबाईंची त्यांनी ओटी भरली. आणि आपल्या आपल्या मैत्रीणींशी ह्यांची ओळख करुन दिली... "माज्या म्हाहेरची मानसं...!!" जाताना तिने सुनिताबाईंच्या वरुन हाताने ओवाळून स्वत:च्या कानशिलावर बोटं मोडली आणि "पुना कवा येशील गं बया...!?" असे म्हणाली. त्यांच्या दोघांच्या डोळ्यात त्याचवेळी पाणी तरारले. कोण कुठली स्कॉटीश बाई, पण ह्या मराठी भाषेने त्यांच्यातील वंश, धर्म, जात... सगळी बंधनं क्षुद्र ठरवून त्यांना जवळ आणलं होतं...!
पु.ल. आणि कन्नड भाषिक यांच्यातील शाब्दिक चकमक
संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर मराठी-कानडी वाद सुरु झाला. हा भेदभाव कमी करण्यासाठी कधी नव्हे ते साहित्य मंडळाच्या लोकांनी सुरुवात केली. तरीही मधुन-अधून त्यांच्यात शाब्दिक चकमकी होतच असत. एकदा एक कानडी ग्रुहस्थ पु.लं.ना चेष्टेच्या स्वरात म्हणाले,"तुमची मराठी भाषा म्हणजे एकदम चमत्कारीच की होsss... एकच लाकुड... जात्यात घातलं की ’खुंटा’ होतयं... गोठ्यात ठोकलं की ’खुंट’ होतयं आणि भिंतीत घातलं तर ’खुंटी’ होतयं... लाकुड तेवडंच... ते तरी बदला की होsss...!!" त्यावर पु.ल. हसत-हसत म्हणाले,"प्रत्येक भाषेत काहीतरी असणारच की. तुमच्या कानडीत नाही का... घोडा आणि घोड्याची बायको, दोन्हीही नपुसकलिंगी, हे कसं काय तुमच्या भाषेत...? पण तुमच्या कानडीने मराठीला जे ’अण्णा’, ’अक्का’ आणि ’अप्पा’ हे तीन मायेचे शब्द दिले आहेत त्याची सरच नाही. नाहीतर आमच्या मराठीत मोठ्या भावाला, मोठ्या बहिणीला आणि वडिलांना बोलवायला इतके प्रेमळ शब्द मिळालेच नसते." पु.लं.च्या मार्मिक, भेदक पण तरीही प्रेमळ अश्या टिपणीने त्या ग्रुहस्थाला आपली चूक कळली. कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमारेषा असतात आणि मराठी आणि कानडी भाषांच्या ’मिलनरेषा’ असतात...! सीमारेषा हे तु आत येऊ नकोस हे सांगणारी असते. त्याला बलाची एक जोड असते आणि मिलनरेषेला मात्र फक्त प्रेमबलाची जोड असते. मिलनरेषा एकदा म्हटल्यावर ह्या भाषेतले शब्द त्या भाषेत किती आले हा हिशेबच कुणी लावू शकणार नाही. भाषेने प्रांतभेद... वर्णभेद... मतभेद करुन पदरी काहीच पडत नाही. शेवटी भाषा हे एक माध्यम आहे पण ’ये ह्रुदयीचे ते ह्रुदयी’ पोचणे महत्वाचे आहे. पुढे पु.लं.च्या कित्येक लेखांचे कानडीत भाषांतरही झाले. ते कानडी बांधवांनाही भावले असणार ह्यात काही शंका नाही.
पेटीवाले पु.ल. आणि वसंतराव देशपांडे
पु.ल. देशपांडे ह्यांना आपण एक विनोदी लेखक म्हणुन ओळखतो पण त्यांची मुळ आवड ही पेटी वादनाची होती हे फार कमी लोकांना माहित आहे. त्यांना स्वत:लादेखिल आधी पेटीवादक म्हणून म्हणवुन घ्यायला जास्त आवडायचे. गोविंदराव टेंभेंच्या आधी पेटी किंवा हार्मोनियम हे एक कोपर्यात बसून गायकाला जिथे कमी पडेल तिथे वाजवायचे एक वाद्य होते. त्याला स्वतंत्र अशी जागा नव्हती. गोविंदरावांनी ती मिळवून दिली. त्याचबरोबर पेटीवाल्यालाही विशेष असे महत्व कोणी देत नसे. ह्याचीच एक गंमत सांगताना पु.ल. म्हणतात...
वसंतराव देशपांडेंना एकदा नागपुर जवळच्या एका तालुक्याच्या बड्या घराण्याकडून गाण्याच्या कार्यक्रमाचे आमंत्रण आले. सरावाचे नेहमीचे पेटीचे साथीदार म्हणुन त्यांनी पु.लं.ना बरोबर घेऊन जायचे ठरवले. नागपुरकरांना तसे कळवलेही की पु.ल. बरोबर येणार आहेत म्हणुन. तोपावेतो पु.ल. एक विनोदी लेखक म्हणुन घराघरांत पोहोचले होते. काही कामानिमीत्त वसंतराव मागहून येणार होते आणि पु.लं.ना पुढच्या गाडीने जावे लागले. स्टेशनवर रिसिव्ह करायला आलेल्या मंडळीत छोट्यात छोटा स्वागतगुच्छरुपी तुरा घेऊन मंडळी उभी होती.
त्यातलेच एक संस्थेचे सेक्रेटरी म्हणुन कोणालाही ओळखू येणारे एक ग्रुहस्थ पुढे आले आणि म्हणाले,"ते पु.ल. देशपांडे येणार होते ना हो या गाडीला...!?" पु.ल.देशपांडेंच्या लगेच लक्षात आले की काहितरी घोटाळा आहे. पण त्यांना आपण स्वत:च पु.ल.देशपांडे असल्याचे कळू न देता ते म्हणाले,"काही कल्पना नाही बुवा. मी वसंतरावांच्या बरोबर आलोय, त्यांचा पेटीवाला." ते ऐकुन त्या लोकांच्या चेहर्यावर प्रचंड निराशा पसरली. क्षणार्धात त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन मंडळी पु.लं.ना शोधू लागली. एका शिपायाने खोली दाखवत ह्या ’अतरंगी पेटीवाल्याला’ तुसड्या आवाजात सांगितले,"ते तुमचं काय असेल ते इकडं टाका." मागोमाग दुसर्या गाडीने वसंतराव देशपांडे हजर झाले. त्यांनी उतरताच रिसीव्ह करायला आलेल्या मंडळींना विचारले की P.L. आला नाही...!? मंडळी बुचकळ्यात पडल्याचे पाहून वसंतरावांच्या लक्षात आले की पु.लं.नी ह्या लोकांची काहितरी टांग खेचली आहे म्हणुन. नंतर बराच वेळ गेला. अगदी कार्यक्रम सुरु होण्याची वेळ आली. मंडळी काळजीत पडली की पु.ल. देशपांडे अजुन कसे आले नाहीत म्हणुन. तेव्हा लोकांचा फार अंत न पाहता पु.ल. म्हणाले,"तुमची काही हरकत नसेल तर... मीच पु. ल. देशपांडे...!!!" तेही त्यांना तितकसं खरं वाटलं नाही. कारण पु.ल.देशपांडे पेटीची साथ करण्यासारखं हलकं काम कसं करतील असं त्यांना वाटत होतं.
त्या मैफिलीत सगळा जामा-निमा होता... रुजामे घाललेले... बैठकी होत्या... पडदे होते... झुंबरं होती... अत्तरदाण्या होत्या... नव्हता तो श्रोताच... ’गर्दी’ अपार होती पण ’दर्दी’ कुणीच नव्हता... वसंतरावांचे गायन सुरु होऊन अर्धा तास होऊन गेला पण दाद कुणाचीच येईना. पण वसंतराव तसे कच्चे खेळाडू नव्हते. ते पु.लं.ना म्हणाले,"भाई... आज जरा रियाज करुन घेऊया...!!!" सगळ्या मुखदुर्बलांचा एखाद्या फोटोग्राफरने असा फोटॊ घेतला असता तर "शोकसभेचा ठराव ऐकताना...!" असा खाली मथळा द्यायला काहीच हरकत नव्हती.
आणि तेवढ्यात कोपर्यातुन आवाज येऊ लागला... वा:.. वा:... क्या बात है... बहुत अच्छे...! तहानलेल्याला पाण्याचा झरा दिसावा तसे काहीतरी त्या दोघांना झाले. त्या दोघांनी तिकडे पाहिले तर एक माणूस कोपर्यात अंग चोरुन उभा होता आणि वसंतरावांच्या गाण्याला दाद देत होता...! वसंतरावांनी त्याला पुढे बोलावुन घेतले. बुजत-बिचकत, नाही-नाही म्हणत तो माणूस पुढे येऊन बसला. त्यांनी नीट निरखून पाहिले तर ज्या माणसाने त्यांना स्टेशनवरुन आणले होते तो ’टांगेवाला’ होता ’तो’. देवाने त्याच्या कानात सूर भरले होते आणि बाकी ’अ’सूरच राहिले होते. त्यानंतर पुढले दोन-अडीच तास ते दोघे फक्त त्या टांगेवाल्याकरिता गात-वाजवत होते...!!!
गो.नि. दांडेकर आणि बाबासाहेब पुरंदरे
पावसाळ्याचे दिवस होते. गोनिदा आपल्या काही सहकार्यांबरोबर महाबळेश्वराहून कमांडर जीपमधून पुण्याकडे परतत होते. मागच्या हूडमधून ते बाहेर कोसळणार्या महाभयंकर पावसाचे दर्शन घेत होते. ढगफुटीच जणु... दहा पावलांवरचे स्पष्ट दिसत नव्हते इतका पाऊस...! बाबासाहेब पुरंदरेंनी सह्याद्रीत पडणार्या पावसाचे वर्णनच केलय... की इथे इतका पाऊस पडतो की उडत्या पाखराच्या पंखांवर शेवाळं जमावं...! तेवढ्यात गोनिदांना दुरवरुन अस्पष्ट आक्रुती दिसू लागली... कुणीतरी सायकलवरुन येत होते. कुणीतरी स्थानिक असावा म्हणुन पावसाची आणि वादळाचा अंदाज घेण्यासाठी त्यांना थांबवण्यासाठी त्यांनी हात बाहेर केला. ती सायकलवरुन येणारी व्यक्ती जस-जशी जवळ येऊ लागली तस-तशी आक्रुती ओळखीची वाटू लागली. पुर्ण स्पष्ट झाल्यावर सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. ते होते ब.मो.पुरंदरे... बाबासाहेब पुरंदरे...! ह्या वेड्या धाडसाचे कारण विचारताच बाबासाहेब उत्तरले,"प्रतापगडी महाराजांचा एक कागद सापडलाय... पावसाने पुण्याहून महाबळेश्वराकडे जाणार्या सगळ्या गाड्या बंद झाल्या म्हणून सायकलीवरच निघालो आहे गडावर...!!!" काय म्हणावे ह्या माणसाला...!? पुण्याहून महाबळेश्वराचा रस्ता आजही किती बिकट आहे! चारचाकीतुन... सहापदरी हायवेवरुन... अंगाला पाण्याचा टिपुसही न लागता... आपल्या मनोरंजनासाठी... ट्रीपसाठी आपण अश्या पावसातुन जाण्याचे टाळतो आणि तो तीस-पस्तीस वर्षांपुर्वीचा काळ... पावसाळा... सायकलवर... एकटेच... घाटातुन... आणि तेही कशासाठी तर इतिहासातला एक कागद अभ्यासण्यासाठी...!? कहर... कहर... परत त्यांच्याच शब्दाचा आधार घेऊन सांगायचे तर... "वेड लागलेली माणसेच इतिहास घडवतात, वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही." हे वाक्य ते शिवाजी महारांजांकडे बघून बोलले... पण त्यांची ही स्वत:ची क्रुतीदेखिल काही कमी नाही ह्या वाक्याच्या उपमेला...!
No comments:
Post a Comment