निमीत्त होते एका कॅमेराचे पण त्याच्या पायगुणाने (की लेन्सगुणाने) एक अभूतपुर्व योग माझ्या आयुष्यात जुळून आला... मंगेश तेंडूलकरांच्या भेटीचा...! माझ्या काकांच्याबरोबर मला त्यांच्या घरी जाण्याची संधी मिळाली. सकाळी अकरा वाजता भेटीची वेळ ठरली. अगदी अकराच्या ठोक्याला आम्ही त्यांच्या घरी टच झालो. मी तर इतका एक्साईटेड होतो की १०-१५ मिनीटं आधीच तिथं पोचलो होतो. दारावर त्यांच्या स्वाक्षरीचीच नेमप्लेट... बेल वाजवताच मंगेश सरांनी स्वत:च दार उघडलं. जवळ जवळ सहा फुट उंची, अंगात खादीचा कुडता आणि प्रसन्न हास्य... प्रतिभावान माणसांचं आणि पांढर्याशुभ्र दाढीचं काही नातं आहे की काय हे कुणीतरी अभ्यासायला हवं... माणूस प्रतिभावान असतो म्हणून पांढरी दाढी ठेवतो की पांढरी दाढी ठेवल्याने प्रतिभा येते हे माझ्यासारख्या अतिसामान्य बुध्दीच्या माणसाला कुणीतरी सांगितलं तर बरं होईल. त्यात ती चित्रकाराची पांढरी दाढी... ती चेहर्यावर रेखीव कोरलेली नसेल तरच नवल....! एखादा माणूस कलाकार आहे हे सांगायला लागणं हेच ते कलाकाराचं पहिलं अपयश असतं असं म्हणतात... तेंडूलकरांकडे बघून चित्रकलेच्या औरंगजेबाच्या चेहर्यावरदेखिल एका अनुभवी, श्रेष्ठ-ज्येष्ठ कलाकाराला पाहिल्याचे भाव उठल्याशिवाय राहणार नाहीत...!
काही मिनीटं मला कळायलाच गेली की मी खरोखर अश्या व्यक्तीला भेटतोय की ज्यांची व्यंगचित्रं मी लहानपणापासून पहात आलो आहे. त्यांची कित्येक प्रदर्शनं मी पाहिली. त्यात त्यांना लांबून बघत आलो होतो. त्यात एखादं वाक्य त्यांच्याशी बोलयचं तर त्यांच्या चाहत्यांचा गराडा. त्यात आपण विचारणार काय आणि ते उत्तर देणार काय...! पण आज माझ्या आयुष्यात लक्षात राहणारा आणि लिहून ठेवावा... मनात साठवून ठेवावा असा दिवस उगवला होता...!
दार उघडून आत जाताच एका मधुर घंटेच्या किणकीणीने आमचे स्वागत केले. गावाकडे गाय-बैलाच्या गळ्यात असणारी घंटा सरांनी दाराला लावली होती. त्यावर त्यांची भावना होती की पुण्यासारख्या शहरात वर्षानुवर्ष राहिलो तरी गावाकडची ओढ आपल्याला कायमच असते... त्याच वातावरणाची दिवसातुन काहीवेळा आठवण होते ह्या किणकीणीमुळे...!
त्यांच्या घराचा हॉल तर विचारुच नका... हॉलमध्ये बक्षिसं नव्हतीच... बक्षिसांच्या मध्ये थोडा-थोडा हॉल दिसत होता... दाराच्या उजव्या टोकापासून माझी नजर चारही भिंती फिरुन आली... पडद्यांच्या पेलमेंटसपासून, शोकेसवर, टीव्हीवर, कपाटांवर... बक्षिसांची... मानचिन्हांची... पदकांची नुसती रास होती.
सर आम्हाला स्वयंपाकघर ओलांडून त्यांच्या खोलीत घेऊन गेले... खोली कसली कार्टून्स तयार करण्याचा कारखानाच...! जेमतेम दहा बाय दहा असेल पण एक कलाविश्व... एकदा माणूस आत गेला की गेलाच... बाहेरच्या भौतिक जगाचा विसर पडावा असेच वातावरण...! एका बाजूला सरांचा ड्रॉईंगबोर्ड... त्याला लावलेल्या असंख्या वस्तू की ज्यामुळे साधा माणूस बुचकळ्यातच पडेल. कोल्ड्रींकच्या कॅनमध्ये अनेक आकाराचे ब्रश, पेन्सिल्स, पेन्स, रोटरिंग्ज... वॉटर कलर्स, क्रेयॉन्स, पोस्टर कलर्स, फेवीकॉल, स्टेपलर, नेलकटर, वजनताण, रिस्टवॉच... आणि काय-काय... पण त्यातल्या कोणत्या वस्तुचा उपयोग कधी होईल हे कलेची जाण असणाराच सांगू शकेल. नेलकटर असून कलाकाराची नखं कायम वाढलेलीच असतात. कारण नेल्कटरचा उपयोग ब्रशचे केस कापून सारखे करायला केला जातो...! एक-दोन भांड्यात स्वच्छ पाणी दिसलं की चित्राची पुर्वतयारी... आणि भांड्यात काळ्या रंगाचे पाणी म्हणजे नुकतीच कुठल्यातरी कलाक्रुतीचा अविष्कार...! निसर्ग नावाच्या कलाकाराचं हे जरा उलट असतं...! काळंभोर आकाश झालं की निसर्ग चित्र काढायला बसलाय असं समजायचं... आकाश निरभ्र... पांढरं शुभ्र झालं की त्याच्या पटलावर एक मनमोहक चित्र रेखटून झालेलं असतं...!
त्या खोलीत ह्या सगळयातुन राहिलेल्या जागेत असंख्य चित्र...! मागच्या कपाटातही अशीच हजारो चित्र असल्याचं मला काकांनी सांगितलं...! भरीस भर म्हणून की काय... सरांच्या खिडकीला एक सलाईन लावलेलं. पण ते वापरलं जात होतं स्प्रेपेटींगसाठी...! ज्याने कुणी ती सलाईनची सुई आणि बाटली बनवली असेल त्याने स्वप्नातही कधी विचार केला नसेल की ही एक स्पेशल बाटली आहे आणि ती कुणाला जगवणार नाहीये तर ’का जगायचं’ ह्याचं कारण शिकवणार आहे...! सोबतीला एक फ्रिजचा कॉम्प्रेसरही होता... स्प्रेला प्रेशर येण्यासाठी...! का...? टेक्नॉलॉजीचा मक्ता फक्त इंजिनीयरन्सनी नाही घेतलेला. इंजिनीयरींग ही कला असेल तर कलेतही थोडे इंजिनीयरींग येणारच की...!
आणि सगळ्यात महत्वाचं... कोपर्यात एक म्युसिक सिस्टीम... अर्थातच वातावरण निर्मीतीसाठी... कलेत पुरतं बुडवून घेण्यासाठी... ब्रम्हानंदी टाळी लागण्यासाठी संगीतासारखं दुसरं माध्यम नाही. त्या म्युसिक सिस्टीमवर भारतीय शास्त्रीय संगीत तर वाजत असणारच पण सरांकडे पाहता मधुन अधून त्यावर फिल कोलिन्सचा जेनसिसदेखिल वाजत असणार अशी मला खात्री आहे...! अजुनही पाऊस पडल्यावर ते बाईकवरुन चक्कर मारुन येतात ह्यावरुनच त्यांच्यातल्या तरुण मनाची झलक जाणवते...!
ह्या सगळ्याच्या जोडीला अत्याधुनिक कॉम्प्युटर विथ पॉईंटर सेन्सीटीव्ह स्केचपॅड. सरांनी पहिले चित्र काढले असेल तेव्हा झेरॉक्स मशिन्सदेखिल नसतील आणि इकडे सर स्वत:च काढलेलं चित्र स्कॅन करुन फोटोशॉपमध्ये एडिट करतात.
सरांनी आमच्याशी बोलायला सुरुवात केली. त्यांना प्रदर्शनातुन आलेल्या चांगल्या-वाईट अनुभवांपासून त्यांच्याकडे येणार्या आणि रोजच्या उठण्या-बसण्यात असलेल्या सेलिब्रिटीजपर्यंत सगळे विषय ते आमच्याशी बोलत होते. अधुन मधुन मी त्यांचे फोटो घेत होतो. मी आणि माझ्या मित्रानी ५-६ वर्षांपुर्वी प्रदर्शनात पाहिलेल्या एका चित्राविषयी मी त्यांना विचारले. त्यांच्या चित्राविषयी विचारल्यावर त्यांचा चेहरा अधिक खुलत होता आणि त्यांच्याआधी बोलका होत होता...! २-३ चित्रांचे तपशिल दिल्यावर माझ्या निरीक्षणाचे त्यांनी कौतुक केले. मग माझ्या कॅमेरातुन फोटो बघून त्याचेही कौतुक केले. कॅमेरा छान आहे हो तुझा असे म्हणत-म्हणत त्यांचा कॅमेरा दाखवला. नुकताच माझा कॅमेरावर थोडाफार अभ्यास झाल्याने त्यांच्या कॅमेराची क्षमता ओळखणे मला फार अवघड गेले नाही.
तात्पर्य की आमच्या कितीतरी पट पुढच्या सगळ्या गोष्टी असुनही तेंडूलकर सर आमच्याशी कौतुकाने... प्रेमभावननेनेच बोलत होते. आणि हीच विशेष गोष्ट असते जी त्यांना आपल्यापासून वेगळे करते... काहीतरी स्पेशल करते...! पु.लं.नी म्हटले आहे की मला जन्मजात काय मिळाले असेल तर तो आहे ’स्नेहभाव’... दुसर्याकडे प्रेमानेच पाहण्याची नजर... आणि तुम्हाला जर काही कलानिर्मीती करायची असेल तर हा स्नेह भाव अत्यंत गरजेचा आहे. कारण कलेपासून आपण जर काही करत असलो तर ते जोडत असतो. ’ये ह्रुदयीचे ते ह्रुदयी’ पोचवत असतो...!
मला वाटतं की देव सकाळच्या फ्रेश मुडमध्ये ही असली माणसं बनवत असेल. त्यात स्नेहभाव आणि कला एकास एक प्रमाणात... अचाट कल्पकता... सतत कार्यशीलता... आणि पाचवं पंचमहाभूत म्हणून झपाटलेपण...! नंतर माणसं बनवण्याचं मशीन ऑटॊ मोडवर टाकून विश्रांती घ्यायला जात असणार आणि आमच्यासारख्यांचा खच पडत असणार...! असो.
एकेक अनुभवांच्या क्षणांची शिदोरी मी जमा करत होतो न होतो तोच ह्या भेटीचा परमोच्च क्षण आला... माझ्या नकळत... पण मला माझ्या आयुष्याच्या अंतापर्यंत सोबत करणारा क्षण... बोलता-बोलता तेंडूलकर सर कलेच्या जोपासनेविषयी बोलू लागले, "माणसाला तरुण वयात, धकाधकीच्या काळात कला जोपासता येत नाही... त्याची गरजही वाटत नाही पण जेव्हा सगळ्या जबाबदार्या संपत जातात... आपल्या जवळ असलेली माणसं चांगल्या वाईट कारणांनी दूरावत जातात... आणि तुम्ही तुमच्या एका शुन्य अवकाशात एकटे उरता तेव्हा तुम्हाला साथ देते ती तुमची कला... तुमचा छंद...! ही बहुदा निसर्गाचीच रचना असावी की म्हातारपणी माणूस विरक्त होत जातो... नात्यांतुन बाजूला होत जातो आणि हीच अवस्था त्याला जगाचा निरोप घेताना यातना सुसह्य करु शकते. ह्या त्याच्या सरत्या-एकट्या काळात त्याची कला ही इतरांना आणि मुख्यत्वेकरुन त्याला स्वत:ला आनंददायी असते...!"
कलेचा आयुष्याच्या भयाण एकलकॊंडेपणाशी इतका सुंदर मिलाफ खरोखर ज्या माणसाला करता येईल त्याला स्मुथ एक्झीट कशी घ्यायची हे पुरते उमगले आहे असं म्हणायला हरकत नाही. शेवटी धडपड कशासाठी आहे? कमीतकमी त्रासात ह्या जगाचा निरोप घेता यावा ह्याचीच ना? मग त्याचीच गुरुकिल्ली जर तुमच्या हाती कुणी सोपवली आणि तीही न मागता तर अजुन काय हवंय...!?
इहलोकातील मुक्काम संपवून परतल्यावर ’त्यानी’ विचारलं की गेला होतात तिकडे... काही केलंत की नाही... कशाला गेला होतात...? तेव्हा काय म्हणायचं...?
"हे आपलं असंच...!!?"
प्रणव.
प्रिय प्रणव ,
ReplyDeleteलेख पूर्ण वाचला , आजवर आपल्या भेटीत केवळ अर्थ विषयक (निरर्थक-पैसा) गोष्टींचीच चर्चा झाली , पण आज व्यासंगी प्रणव वाचून खूप छान वाटले , मंगेश तेंडूलकर हे एक अजब रसायन पण त्याचे नेमके पृथाकरण करणारा तुमच्यातला कलावंत ही खूप भावला
प्रियतोष विसाळ