Monday, July 18, 2011

खरच देव आहे का हो?

देव आहे की नाही हा विषय जगातील कुठल्याही धर्मात... जातीत... पोटजातीत... स्त्री-पुरूषात... कुठल्याही महिन्यात... ऋतुत... सणवारांत... विवादास्पदच होईल असे माझे स्पष्ट मत आहे... आज हा ब्लॉग लिहीतोय खरा पण ह्यात माझ्या मताशी किती जण सहमत असतील ह्याची खात्री मी नाही घेऊ शकत... पण आपलं आधीच ठरलंय... इथं जे काही असेल ते ’हे आपलं असचं’ असेल... पटलं तर चांगलं म्हणा नाहीतर वरच्या कोपर्यात लाल चौकोनात ’X’ ह्या खुणेवर क्लिक करा...!

परवाच जपानमध्ये झालेल्या भुकंपाने आणि त्सुनामीने केलेल्या हाहा:काराने सगळे जग हादरले. ऑफिसमधल्या रुटीन मेल फॉरवर्डमध्ये नविन विषय मिळाला. जपान बिफोर आणि आफ़्टरच्या शिर्षकाखाली आधीच्या जपानमधल्या टुमदार शहरांचे रेखीव फोटो आणि त्सुनामीने विध्वंस केलेले फोटो शेजारी-शेजारी लावण्यात आले होते. झालं...चहापानाला चर्चा सुरु... आधीचे शहर किती सुंदर होते, आता परत तसे करायचे तर किती वेळ, पैसा, कष्ट खर्च करावे लागणार होते. बिचारे जपानी लोक दुसर्या महायुद्धानंतर काहीना काही संकटांना तोंड देत-देत आपली प्रगती करुन घेतायत... आणि तेवढ्यात एका ’प्रासंगिक’ हळव्या मनाने आपले मत मांडले... ह्या अतिरेक्यांच्या अड्ड्यांवर का नाही येत ही त्सुनामी...!? दुष्टांना सुरक्षा आणि कष्टकर्यांना सततच्या समस्या...? ह्या तुमच्या देवाला दिसतयं का हे सगळं...? सांगा...!! तेवढ्यात साहेब येताना दिसले. कपातले कषायपेय घाईगडबडीने प्राशन करुन जपानला...अतिरेक्यांना आणि मुख्य त्या देवाला तिथेच सोडुन सगळेजण आपापल्या वाट्याचे तेल काढायला घाण्याभोवती फिरु लागला... अहो तेच ते हो... कॉम्पुटरवर काम करु लागला... साधन वेगळे... साध्य तेच...!

दुपारी जेवताना दुसरा प्रसंग... पेपरात कुणा सतरा वर्षीय शालेय राजकुमाराने हट्टाने आपल्या वडिलांची कार मित्रांना चक्कर मारायला नेली आणि भीषण अपघात झाला त्यात तो मुलगा स्वत: तर जायबंदी झालाच पण त्याचा मित्र तात्काळ हे जग सोडुन गेला... वय वर्ष पंधरा... ह्या वेळी हळव्या मनांच्या संख्येत भर पडली होती. पुन्हा एकदा ऑब्जेक्शन न घेणार्या पार्टीचं नाव पुढे आलं... ज्यांचा एकुलता एक मुलगा त्या अपघातात गेला त्या बिचार्या मातापित्यांनी तुमच्या देवाचं काय वाकडं केलं होतं...? त्यांनी आता काय करायचं...? देवाला रिटायर करा म्हणतात ना त्यात काही गैर नाही... कित्येक तीर्थस्थळांना भेटी देणार्या बसेसना अपघात होतात आणि लोक आपला जीव गमावतात... मंदीरांमध्ये गर्दीत हरवतात... चेंगर-चेंगरी मध्ये जखमी होतात... मरतात देखील...! म्हणजे आपल्या भक्तांनासुद्धा देव सोडत नाही तर...!
अश्या अनेक प्रसंगातुन देव आहे की नाही हा विषय आमच्या ओफिसमध्ये आणि मित्रमंडळीमध्ये दिवसेंदिवस तापत चालला होता... पुर्वी माझ्या काकांबरोबरसुद्धा असाच एक वरकरणी खेळकर वाटणारा पण आतुन गंभीर परिणाम करणारा एक जास्त ’वाद’ पण तरी ’संवाद’ झालेला माझ्या अनुभवात होता...! त्याच पार्श्वभुमीवर... माझ्या आत्तापर्यंतच्या वाचनावर... लोकांच्या सांगण्यावर... त्यांच्याशी केलेल्या चर्चेवर... आणि जागा मिळाली म्हणुन ह्या संधीवर मी माझी स्वत:चे आणखी एक पालुपद ह्या वादाला जोडून देऊ इच्छीतो... ते खालीलप्रमाणे...!

मानवी मनाला आधार वाटणारी, गेलेला आत्मविश्वास परत मिळवुन देणारी, शांतता देणारी पॉसिटीव्ह एनर्जी म्हणजेच देव... ह्याउलट भयकंपीत करणारी, उरलासुरला आत्मविश्वास घालवणारी, मनाची अस्वस्थता वाढवणारी निगेटीव्ह एनर्जी म्हणजेच भूत किंवा राक्षस...! सोपे उदाहरणच द्यायचे झाले तर असे इमॅजिन करा की तुम्ही एकटेच काळोख्या रात्री जंगलातुन चालत जात आहात... भितीने तुमची आधीच गाळण उडाली आहे... त्यात तुम्ही वरील दोन्ही एनर्जी एकापाठोपाठ डोक्यात आणल्यात तर कुठल्या एनर्जीमध्ये तुम्ही जास्त राहू इच्छीता...? आधीच जंगलात, काळोखात एकटे आहात आणि त्यात निगेटीव्ह विचार कराल तर भितीने तुमची विचारशक्ती बंद पडेल. त्या संकटातुन मार्ग काढणे राहील बाजूला आणि अजुनच संकटात अडकत जाल... हेच एखाद्या पॊसिटीव्ह शक्तीचा विचार कराल तर मन शांत होईल, डोकं शांत होईल आणि ते तिथुन बाहेर पडायचा मार्ग शोधू लागेल.

आता प्रत्येकवेळी तुम्ही जंगलातच अडकायला जाणार आहात का? तर नाही पण आजकालच्या शहरातदेखील एकमेकांना न विचारणारी आणि आपल्याच तंदरीत असणारी... उलटपक्षी वेळ साधताच तुमचा घात करणारी माणसच आसपास असताना आपण जंगलातच जास्त सुरक्षित राहू असे तुम्हाला वाटले तर ते फार वावगं वाटू नये. रोजच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येत असतात की त्यात आपल्याला कुठल्या तरी मानसिक आधाराची गरज असते. गाडीवर ऑफीसला जाण्यापासून मुलांना शाळेत ऍडमिशन मिळण्यापर्यंत... पगार वाढण्यापासून स्वत:चे घर होण्यापर्यंत... परदेशी वारीपासुन ते चांगल्या जोडीदाराबरोबर लग्न होण्यापर्यंत... व.पुं. नी ’वपुर्झा’ मध्ये ह्या अस्थिरतेची अचूक वाख्या केली आहे... ते म्हणतात की सेकंदाला जोडून येणार्या पुढच्या सेकंदाला काय होणार आहे हे जर आपल्याला कळत नसेल... दिसत नसेल तर ह्याला अंधारात चालणं म्हणतात नाहीतर काय...!? माहीत असलेल्या ठिकाणी आपण अंधारातही जातो पण अपरिचीत ठिकाणी लगेचच असुरक्षित समजून चाचपडायला लागतो...!

त्यात माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे... का आहे? तो एकटा का राहु शकत नाही कारण तो शरीराने... मुख्यत्वे करुन मनाने कमकुवत आहे... त्याला कुणाच्या ना कुणाच्या सहवासाची गरज असते. एखाद्याच्या प्रेमाची, कौतुकाची, मायेची अगदी रागाचीसुद्धा त्याला गरज असते. एखाद्या गोष्टीचा आनंद त्याला ती गोष्ट घडण्यापेक्षा ती आपल्या लोकांशी शेअर करण्यात जास्त असतो. उदाहरणार्थ...

काही वर्षांपुर्वी सुरेंद्र चव्हाण ह्या मराठी तरुणाने एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत केल्याच्या निमीत्ताने त्याचा सत्कार करण्यात आला. समारंभात कुणीतरी त्यांना विचारले की एव्हरेस्ट्च्या शिखरावर... जगातील सर्वांत अत्युच स्थानावर उभे राहिल्यावर तुम्हाला खुप आनंद झाला असेल ना? ह्या प्रश्नाचे उत्तर ’नाही’ दिल्यावर समस्तास अचंबा जाहला. त्यांचे त्यावर स्पष्टीकरण असे होते की ’तिथे पोचल्यावर मोहिम सफल होत नाही. एव्हरेस्ट शिखर पाहुन परतीच्या वाटेवर अपघाती मरण पावलेले दुर्दैवी गिर्यारोहकसुद्धा आहेत. मला खरा आनंद झाला मी बेसकॅंपवर परत आल्यावर माझ्या सहकार्यांना भेटलो तेव्हा... आणि नंतर तुम्हा पुणेकरांनी सत्काराला बोलावलेत तेव्हा...!’ म्हणजे आपला खरा आनंद जगातील सर्वांत उंच स्थानही देउ शकत नाही पण आपल्या लोकांत तो मिळु शकतो हेच त्यांच्या भाषणाचे मर्म होते...!

माणसाच्या स्वभावाच्या गुणधर्मावर ’कास्ट अवे’ ह्या इंग्रजी सिनेमात फार छान प्रसंग घेतला आहे... एका विमान अपघातात सुदैवाने बचावलेल्या पण दुर्दैवाने एका निर्मनुष्य बेटावर अडकलेल्या माणसाची ही कथा आहे... सुरवातीचे काही दिवस एकलकोंड्या राहात असलेल्या माणसाची सहवासाची गरज एका चेंडुवर चुकून बनलेल्या मानवी चेहर्याने पुर्ण होते. त्याचे नाव तो ठेवतो ’विल्सन’...दिवस रात्र विल्सनशी बोलुन... त्याला आपली सुख-दुख: सांगुन तो दिवस कंठत असतो. काही दिवसांनी चेंडुवरचा विल्सन पुसट होतो तर आपल्या हातातले रक्त दगडी चिपेने काढुन त्याला नाक डोळे रंगवतो...! अथक परिश्रमाने हवेचा समुद्राच्या लाटांचा अभ्यास करुन एक मोडकी-तोडकी तराफ बनवतो... ती बनवत असताना ’तु काळजी करु नकोस... मी तुला सुखरुप घरी नेईन’ हे विल्सनला समजावत असतो...! एक प्रकारे स्वत:लाच समजावत असतो...! शेवटी समुद्राच्या मध्यावर त्याची त्या विल्सन बरोबर ताटातुट होते. थकव्यामुळे झोप लागल्याने विल्सन लाटेवर तरंगत दुर जात असल्याचे त्याला समजत नाही. जाग आल्यावर दूर गेलेला विल्सन ज्याने आपल्याला एका निर्जन बेटावर साथ केली त्याच्या दुखा:ने एखाद्या लहान मुलासारखा हंबरडा फोडुन तो रडु लागतो. अमेरिकेसारख्या... अगदी प्रॅक्टीकल थिंकींग असलेल्या दिग्दर्शकालासुद्धा हा प्रसंग दाखवावासा वाटला. ह्याचा अर्थ वर-वर कितीही प्रोफेशनल बिहेविअर दाखवले तरी माणुस हा समाजप्रियच...!

मग ह्या कमकुवत मनाला जर एखाद्या प्रसन्न...मनोहारी...शक्तीशाली...काल्पनिक श्रद्धास्थान मिळाले तर बिघडले कुठे...!? आणि मुख्यत्वेकरुन ह्या ठिकाणी अपेक्शांचे ओझे नाही... कुठलाही खर्च नाही... तुम्हाला पाहिजे तेव्हा तुमच्या मनात हजर... कसलीही सक्ती नाही...! ह्यातुनच मुर्त रुप देण्याची गरज कुणा वाटली म्हणून देवळे झाली... देव झाले... मग त्यांचे दिवस ठरले... त्यांच्या मनोहारी कथा झाल्या... त्यांच्यावर श्रद्धा बसावी तर त्यांचे पराक्रम दाखवावे लागले... निरनिराळ्या कथा झाल्या... पोथ्या झाल्या...! इथवर सगळं कसं अगदी ’राजश्री प्रोडक्शन’ च्या सिनेमासारखं ’गुडी-गुडी’ चाललं होतं...! आणि कधीतरी ह्याच मसाल्यात कुणीतरी बिब्बा घातला... चमत्कार जोडून...!

नियतीने श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्यांच्यातली पुसट सीमारेषा, भाबड्या आणि मुर्ख लोकांत आखली... बहुत जनांनी ती ओलांडली आणि सगळा खेळ फिसकटला...! पुन्हा एकदा काहीही न बोलणार्यावर गदा आली... मुर्खांचे खापर देवावर फुटले...! माणसाने आपल्याच आधारासाठी एक सुंदर कल्पना जन्माला घातली आणि त्याच्या आहारी जाऊन नुकसान झाल्यावर स्वत:ची चूक कबुल न करता परस्पर निकाल लावून मोकळा झाला...! आता तुम्ही म्हणाल येवढा शहाणपणा दुसर्याला सांगून स्वत: काय दिवे लावतायत हे महाशय...!?

तर मी स्वत: माझ्या आयुष्यात अनुभवलेला प्रसंग सांगतो आणि त्यावरुन माझा माझ्यापरिने काढलेला उपायही सांगतो...
माझी इंजिनीअरींगची परिक्षा चालू होती. माझ्या आईच्या सांगण्यावरुन मी गजानन महाराजांच्या पोथीचा एक अध्याय रोज वाचून जात होतो. त्यादिवशी आमच्या ’हायड्रोलिक्स’ नामक एक जिवावरच्या दुखण्याचा मला छळायचा दिवस होता. त्यात माझ्या काही मित्रांनी ’उद्याचा पेपर अवघड आहे’ ही सुवार्ता आधीच माझ्यापर्यंत पोचवली होती. मुळात अभ्यास झालेलाच नाही अशी भावना पेपर संपवून देऊन येईपर्यंत असतेच... त्यात भरिस भर म्हणून मी नेमका त्याच दिवशी ’चुकुन पोथी न वाचता’ घरातून निघालो. माझे घर आणि कॉलेज ह्यामधील अंतर ट्मटम ने कापावे लागायचे. पोथी न वाचता बाहेर पडल्याचे मला टमटम मध्ये लक्षात आले... झालं... माझ्या पायाखालची जमीन सरकली... डोळ्यासमोर अंधारी येऊ लागली... काही सुचेनासे झाले... ज्या पेपरात आपण पास होऊ की नाही अशी शंका होती त्यात आपण आता नापासच होणार अशी खात्री पटली...! मनोमन गजानन महाराजांचा धावा सुरु केला... रिग्रेट लेटरचे ड्राफ्टींग सुरु केले... अभ्यास तर डोक्यातून कापरासारखा उडून गेला होता...! मिटलेले डोळे अलगद उघडले आणि माझ्या डोळ्यांवर माझा विश्वासच बसेना... माझ्या समोर एक मेंढपाळ बसलेला... कळकट्ट धोतर... खांद्यावर गोधडी... एका हातात उंच काठी आणि दुसर्या हातात ’गजानन महाराजांची पोथी’...! मी क्षणाचाही विलंब न करता त्याला ती मागून घेतली. मधलेच कुठलेतरी पान उलगडले आणि दिसतील त्या पाच ओळी वाचून काढल्या... एकही अक्षर लागत नव्हते. मी रोज वाचायचो त्यापेक्षा ही वेगळीच पोथी होती. पण मला आत्ता कशाशीच कर्तव्य नव्हतं. माझं काम झालं होतं. हळू-हळू माझं ब्लडप्रेशर नॉर्मलला आलं. हायड्रोलिक्सच्या डेफिनेशन्स पुसटश्या आठवू लागल्या. आता ह्या प्रसंगाला आपण काय म्हणाल...!? भक्त मंडळी महाराजांचा प्रत्यय आला म्हणतील... प्रक्टीकल लोक योगायोग म्हणतील... दाभोळकरांसारखे लोक मुर्खपणा म्हणतील.
मला स्वत:ला असे जाणवले की मी पोथीच्या जरा जास्त आहारी गेलो होतो. त्यावर नकळत विसंबलो होतो. पोथी वाचायची विसरल्यावर माझा आत्मविश्वास हरवून बसलो. केलेला अभ्यास, कष्ट, प्रयत्न जर एका छोट्या गोष्टीमुळं जाणार असतील तर ती गोष्ट आपण टाळणंच योग्य. पण ह्या प्रकारात मी माझ्या गजानन महारांवरील श्रद्धेला कुठेही धक्का लागू दिला नाही. फरक फक्त इतकाच केला की पेपरला जाण्याअगोदर पोथी वाचण्यापेक्षा... इन शॉर्ट काहीतरी मदत पाहिजे तेव्हापेक्षा काहीही नको असेल तेव्हा वाचू लागलो. काहीही साध्य करायचे असेल तर त्यासाठी योग्य ते प्लनिंग, प्रयत्न, कष्ट, सावधपणा, ज्येष्ठांशी विचारविनीमय ह्याला प्रेफरंन्स देऊ लागलो. मात्र इप्सीत साध्य झाल्यावर त्याचे श्रेय आमच्या महाराजांना देणं आणि त्यासाठी आभार मानणं हे काम करायचा प्रयत्न आजवर करत आलो आहे. तेव्हा साध्या परिक्षेचं दडपण आलं होतं पण आता कळतय की बाहेरच्या संकटांपेक्षा ते फारच सुसह्य होतं. त्यानंतर नोकरी, स्वत:च घर, लग्न आणि पिल्लू ह्या सगळ्याच्या वेळेस महाराजांना फक्त आभार स्विकारण्याचाच रोल दिला होता. आणि गंमत म्हणजे हल्ली देव्हार्यातल्या त्यांच्या फोटॊतला चेहरा माझ्याकडे बघून प्रसन्न स्मित करतानाच मला दिसतो...!

प्रणव.

7 comments:

  1. dev shodhayacha prayant ha kadhich ani konachahi safal zala nahi. devavar vishwas aso wa naso tyacha pratyay ha tumchya akalan shakti war asto awalambun. vay ani anubhav ya barobar ti badalate itakech kay te. nahi ka!

    ReplyDelete
  2. देव धर्म हे आधार देण्यासाठी आहेत. देवांकडे धर्माच्या नावाने भीक मागणे हि अंधश्रद्धा असु शकते. पण जी शक्ती आपल्याला आधार देते त्या शक्तिच्या पायी माथा टेकवणे ही श्रद्धाच. श्रद्धेचा मार्ग काट्याकुट्यांनी भरलेला आहे, त्यात जो टिकुन राहिला तो मुक्कामी पोहचला. बाकी मोह मायेच्या जंजाळात गुंतलेले.

    ReplyDelete
  3. देव धर्म हे आधार देण्यासाठी आहेत. देवांकडे धर्माच्या नावाने भीक मागणे हि अंधश्रद्धा असु शकते. पण जी शक्ती आपल्याला आधार देते त्या शक्तिच्या पायी माथा टेकवणे ही श्रद्धाच. श्रद्धेचा मार्ग काट्याकुट्यांनी भरलेला आहे, त्यात जो टिकुन राहिला तो मुक्कामी पोहचला. बाकी मोह मायेच्या जंजाळात गुंतलेले.

    ReplyDelete
  4. Je lok dev mantat aani mansa mansat bhedbhav kartat tyanchi kasli shradha. ... tyanchya shradhe sarkha tyancha dev pan khota.... je aahe samor diste te swikarayche nahi aani dev dev karat bhakta bananayat dhanyata mantat...faltu aahe sagale... jar ashi kuthli shakti asti tar tar itke dharma jaat dev paida zale aste ka... yache sarvanche balatpan mansanech kele...jar tase aste kharach dev asta tar jagat ekach dharma aani ekach bhasha astitwat asti....

    ReplyDelete
  5. Je lok dev mantat aani mansa mansat bhedbhav kartat tyanchi kasli shradha. ... tyanchya shradhe sarkha tyancha dev pan khota.... je aahe samor diste te swikarayche nahi aani dev dev karat bhakta bananayat dhanyata mantat...faltu aahe sagale... jar ashi kuthli shakti asti tar tar itke dharma jaat dev paida zale aste ka... yache sarvanche balatpan mansanech kele...jar tase aste kharach dev asta tar jagat ekach dharma aani ekach bhasha astitwat asti....

    ReplyDelete
  6. प्रणव, फार सुंदर लिहील आहेस रे …. Keep it up

    ReplyDelete

माझ्या ब्लॉगची जन्मकथा

नारळ फुटी

बर्याच दिवसांपासुन काहीतरी लिखाण करावं असं मनापासुन वाटत होतं. कधी विषय सुचायचे पण शब्दांत उतरवायला वेळ नसायचा. कधी वेळ मिळालाच तर काय लिहाव...