Tuesday, June 6, 2023

फिजेट स्पिनर भाग ९ (मेघा कुळकर्णी)

दिल्ली मुक्कामात असतांनाच जाण्याच्या आदल्या रात्री, सगळे एकमेकांशी निरोपाची बोलणी करत असतांना, सरांनी एलाना आणि ब्रैडला संतोष त्यांच्या बरोबर न येता; आता इथेच राहणार असल्याची बातमी हलकेच दिली. ब्रैडने काळजीने एलानाकडे बघितले. तिने हळुवार हसत त्याच्या काळजीयुक्त नजरेला नजर भिडवली. "हो, त्याला प्रमोशन मिळालंय ना? मग आता इथे थांबावं लागणार त्याला. कल्पना आली होतीच मला त्याची. आणि इंडियात राहून त्याला त्याच्या घराकडे, त्याच्या आई वडिलांकडे लक्ष पुरवणं सोपं जाईल. हो ना? त्यांनी तरी किती काळ दूर राहावं त्याच्या पासून?"

बोलता बोलता भावनातिरेकाने तिच्या डोळ्यातून आसवे यायला लागली. संतोषने पटकन उठून तिच्या जवळ जाऊन तिला जवळ घेतले. जरा वेळ भावना डोळ्यातून वाहू दिल्यानंतर ती सावरली. म्हणाली, "मी तुझी जसोदामैय्या आहे ना? एक ना एक दिवस तुला देवकी मातेकडे परत जायलाच हवं. तिला तुझ्यापासून किती दिवस दूर ठेवणार? पण तू येत जाशील ना या मैय्याला भेटायला?" संतोषने डोळे पुसत होकारार्थी मान हलवली.

"तुला माझी काळजी वाटत होती ना ब्रैड? रॉजर गेल्यावर जशी मी वेडीपिशी झाले होते तशी संतोष दूर गेल्यावरही होईन म्हणून?" ब्रैडकडे वळून ती म्हणाली. "झाले असते पण कदाचित. पण इथे आल्यावर मला कळलंय आता, माझा रॉजर मेला नाहीये. कृष्णाने सांगितलेलं समजतंय मला आता. आत्मा अविनाशी असतो. रॉजर मला दिसत नसला तरी आहे...कुठेतरी आहे. माझा संतोष आणि माझा रॉजर शरीराने माझ्या जवळ नसले तरी जिथे असतील तिथे सुखातच असतील असा विश्वास निर्माण झालाय आता माझ्या मनात."

ब्रैडने काही न बोलता तिला छातीजवळ घेऊन थोपटले. संतोषने अजितसरांकडे बघितले. सरांसाठी त्यानेच आणलेले फिजेट स्पिनर फिरवत ते मंद स्मित करत बघत होते...अन सहज पलीकडे नजर गेली संतोषची, तर सरांच्या मागे असलेली फळीवरची चक्रपाणि मुर्तीही सगळ्यांकडे बघून मिस्कील हसत होती.

नक्की काय फिरलं होतं?... फिजेट स्पिनर?... की सुदर्शन स्पिनर?

समाप्त

फिजेट स्पिनर भाग ८ (मेघा कुळकर्णी)

होता होता महिना कसा संपत आला कोणालाही कळले नाही. शेवटचे काही दिवस मथुरा, वृन्दावन, आग्रा, फत्तेपूर सिक्री वगैरे करून दिल्लीहून विमानाचं तिकीट काढून लंडनहून नेदरलँड्सला जाण्याचे पाहुण्यांनी ठरवले.

अजूनही एलानाला संतोष त्यांच्या बरोबर येणार नसल्याचे माहीत नव्हते.
परत सगळी मंडळी दौर्यावर निघाली. मथुरा, वृन्दावनात कृष्ण जिथे जिथे गेला, खेळला तिथे प्रत्येक ठिकाणी एलाना जाऊन आली. दर ठिकाणी थांबून जणू काही ती कान्ह्याचं बाळपण, त्याच्या क्रिडा स्वतः अनुभवत होती. गाडीतून सगळ्यांनी गोवर्धनाची परीक्रमाही केली. सरांकडून गोवर्धनाची हकीकत ऐकतांना, निरुपयोगी रूढी परंपरा तोडणारा कान्हा एलानाला जाणवला. रॉजर असाच ठाम असायचा आपल्या मतावर.

नेमके ते दिवस होळीच्या सणाच्या आधीचे होते. बरसाना-राधेचं गाव, आणि नंदगाव-कृष्णाचं गाव, या दोन ठिकाणी लट्ठमार होळीची तयारी चालू होती. या सगळ्यांना ती गम्मतही बघायला मिळाली. कान्हा त्याच्या मित्राबरोबर बरसानाला आला होता आणि राधेला त्याने मस्करीत चिडवले म्हणून गोपी त्यांच्यामागे लाठ्या घेऊन नंद्गावापर्यंत आल्या, अशी आख्यायिका आहे. तिची आठवण म्हणून या दिवसात नन्दगावचे तरुण बरसानात येतात आणि ब्रज भाषेतील होळी गीते गातात. बरसानाच्या स्त्रियांना चिडवतात. मग बरसानाच्या स्त्रिया त्यांच्या मागे लाठ्या घेऊन धावतात आणि त्यांना मारतात. ते आपला बचाव ढाली घेऊन करतात. सगळा खेळच असतो तो. एकमेकांवर रंग उडवायचा. ब्रज भाषेत एकमेकांना चिडवणारी गाणी म्हणायची. भांग आणि लड्डूचा आस्वाद घ्यायचा. सगळ्यांनीच मनमुराद मजा करून घेतली त्या खेळात सहभागी होऊन. एलानाला कृष्णाचं आणखी एक खट्याळ रूप बघायला मिळालं. रॉजरचा हसरा चेहरा मध्येच डोळ्यासमोर तरळून गेला.

आग्र्याचा ताजमहाल, दिल्लीचा लालकिल्ला यांच्या भव्य दर्शनाने जितके सगळे भारावले तितकेच फत्तेपूर सिक्रीच्या सलीम चीस्तीच्या दर्ग्यावरच्या नक्षीकामानेही थक्क झाले. आग्र्याच्या राधास्वामी मंदिरावरचे संगमरवरी कोरीवकाम बघून हरखले. कुरुक्षेत्रावर सरांनी कौरव पांडवांच्या युद्धाचा प्रसंग, डोळ्यासमोर घडत असल्यासारखा, आपल्या शब्द सामर्थ्याने उभा केला. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि, नैनं दहति पावकः.. श्रीकृष्णाच्या गीतेचे शब्द कानावर पडत असतांना एलाना विचारात गढून गेली होती.

क्रमशः

फिजेट स्पिनर भाग ७ (मेघा कुळकर्णी)

मुंबईत हिंडतांना दुपारचे जेवण जुहूला इस्कॉनच्या मंदिरातच घ्यावे हेही त्यांनीच सुचवले. अप्रतिम जेवण तिथे मिळेल असे त्यांनी सांगितल्याने दुपारी सगळे जुहूला गेले.

मंदिराचा भव्य परिसर,तिथले शांत वातावरण याने मंडळी भारावली होती. एलानालाही तिथली शांती अंतर्मुख करून गेली. मुलाच्या मृत्युनंतर इतके शांत तिला कधीच वाटले नव्हते. श्रीकृष्णाची मूर्ती बघतांना तर ती हरवून गेली त्या रुपात. तिचा लेक, रॉजरच, तिच्याकडे बघून हसतोयसं वाटत होतं तिला. प्रसादाचं जेवण घेऊन तृप्तावलेल्या मनाने तिथली भजनं ऐकत संध्याकाळ पर्यंत त्या वातावरणातच सगळे थांबून राहिले. बाकीचं मुंबई दर्शन दुसर्या दिवशी करण्याचं एकमुखाने ठरवलं त्यांनी.

घरी आल्यावर एलानाने श्रीकृष्णाबद्दल जाणून घेण्याची इच्छा दाखवली. अजितसरही रात्री तिथेच थांबणार होते. त्यांनी रात्रीची जेवणं झाल्यावर श्रीकृष्णाच्या जन्मापासूनची कथा रसाळ भाषेत सांगितली. जन्माआधीपासून त्याच्यावर येणारी संकटं, त्यातून पार पडलेला तो, जन्मताच आई बापांपासून झालेली ताटातूट, गोकुळात त्याचं होणारं कौतुक, यशोदा-नंदाचं मिळालेलं प्रेम, गोप गोपिकांचा सखा...परदेशी पाहुण्यांबरोबरच देशी मंडळीही ती अवीट कथा पुन्हा अनुभवत होते.

नंतरचे काही दिवस रोज नवीन काही तरी पाहुण्यांना दाखवण्यात गेले. कार्ला केव्ह्ज झाल्या. मढ आयलंडचा गोल्डन पैगोडा बघून झाला. एकदा त्या दोघांना कंपनीच्या ऑफिसमध्ये नेऊन अजितसरांनी त्यांच्याशी नवं कॉन्ट्रेक्ट करून घेतलं. यात त्यांना पूर्वीपेक्षा जास्त फायदा होता. मुजुमदार सरांनी केलेले अन्याय अजितसर एक एक करून सुधारत होते.

काही दिवस सगळी मंडळी संतोषच्या गावाला जाऊन आली. त्यांच्यासाठी जमतील तितक्या सोयी करण्याचा प्रयत्न संतोषच्या घरच्यांनी केला होता. परदेशी पाहुण्यांनीही खेड्याच्या वातावरणात सामावून जाण्याचा पूर्ण प्रयत्न केला. एकमेकांना कसलाही त्रास होऊ नये याची सगळेच काळजी घेत होते.

आजी पार खंगली होती. पण चीवटपणाने अजून तग धरून होती. आजीची आणि घराची देखभाल करण्यासाठी काका घरीच थांबला होता. त्याची आणि आजीचीही संतोषशी भेट झाली तो प्रसंग हृदयद्रावक होता. आजीने थरथरता हात वर करून संतोषच्या चेहऱ्यावरून फिरवला. तिच्या डोळ्यातून पाणी घळघळा वाहत होते. त्याची आपली भेट होईल ही आशा तिने कधीच सोडली होती.

शेतावर गेल्यावर जुनं ग्रीन हाउस बघून संतोषला जुने दिवस आठवले. या सगळ्या सामुग्रीचा परत नीट उपयोग करायचा त्याने निश्चय केला. सरांचा आणि ब्रैडचा सल्ला घेऊन परत त्या जमिनीवर फुलांचे ताटवे उभे करण्याचं त्याने ठरवलं. बाजारपेठेची आता त्याला चांगली माहिती झाली होती.

यंदा शेतात गहू, बाजरी आणि तूर लावली होती. गेल्या वर्षी मका आणि मुग लावले होते पण त्या पिकांनी फारसा हात दिला नव्हता. काकाला तुरीसंबंधी काही जुजबी टिप्स सरांनी दिल्या. पोटापुरतं शेतात उगवत होतं. कर्जफेड करायला संतोष पाठवत असलेले पैसे कामी येत होते. बहिणींची शिक्षणं तालुक्याच्या महाविद्यालयात होत होती. त्या दोघींनीही दादासारखंच शेतकी विषयाचा डिप्लोमा करण्याचं ठरवलं होतं.

क्रमशः

फिजेट स्पिनर भाग ६ (मेघा कुळकर्णी)

मुंबईला उतरल्यावर त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. त्याला रिसीव करायला अजितसरांबरोबर त्याचे आई,बाबा आणि दोघी बहिणीही आल्या होत्या. सरांनी त्यांना बोलावून घेतलं होतं. संतोषला बघितल्यावर त्याच्या आईने त्याला मिठीत घेऊन अक्षरशः आसवांनी न्हाऊ घातलं होतं. एलाना भरलेल्या डोळ्यांनी ते दृष्य बघत उभी होती. त्या दोघांची संतोषच्या कुटुंबाशी सरांनी ओळख करून दिली. एलानाने संतोषला परमुलखात आईचं प्रेम दिल्याचं कळल्यावर एलानाचे हात हातात घेऊन संतोषच्या आईने तिचे हातही अश्रूंनी धुवून काढले. सरांच्या मुंबईतल्या घरी सगळ्यांचा नाश्ता-पाणी झाल्यावर सरांच्या कर्जतच्या फार्म हाउस कडे सगळ्यांनी कूच केली.

सगळ्या पाहुण्यांच्या राहण्याची व्यवस्था सरांनी माळीबुवा आणि त्यांची पत्नी रखमा हिला सांगून नेटकी करवून घेतली होती. तो प्रशस्त बंगला अत्यंत सुरेख रीतीने त्या दोघांनी मेंटेन केला होता. आजूबाजूला पसरलेली बाग माळीबुवांनी कसोशीने सांभाळली होती.

एलाना आणि संतोषच्या आईची चांगलीच गट्टी जमली होती. भाषेची अडचण दोघींनी मोडीत काढली होती. हातवाऱ्यांनी त्या एकमेकींना मनातलं सांगत होत्या. समजून घेत होत्या. उरलं पुरलं भाषांतर संतोषच्या बहिणी करत होत्या. सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय एकच होता; संतोष. म्हणून असेल कदाचित.

बाहेर माळीबुवा, अजितसर, संतोष आणि ब्रैड प्रत्येक झाड जवळून बघत होते. माळीबुवांना सरांच्या सूचना चाललेल्या होत्या. संतोष आणि ब्रैडनेही काही माहिती दिली. माळीबुवा तत्परतेने टिपून घेत होते सगळं.

सगळ्या बायकांनी स्वयंपाकघराचा ताबा घेतला होता. रखमा त्यांच्या हाताशी लुडबुड करत होती. हवं ते समान काढून देत होती. झक्कास पिठलं भाकरी खर्ड्याचा बेत झाला. वर पेलाभर थंड ताक मिळालं सगळ्यांना. विदेशी पाहुण्यांसाठी अंमळ कमी तिखट केलं होतं सगळं. पण तरी त्यांनी हाय हुय करतच खाल्लं.

एलाना आणि ब्रैड उत्सुकतेने या नाविन्यपूर्ण जीवनाचा आस्वाद घेत होते. इथल्या लोकांचं वागणं बोलणं, उठणं बसणं, जेवण खाण सगळ्याचंच त्यांना अप्रूप वाटत होतं. वेगळं होतं त्यांचं यांचं जीवन पण तरीही मायेने ते सगळे एकत्र बांधले गेले होते. दोन्हीकडच्या लोकांच्या मनातलं प्रेम एकसारखंच असल्याने सगळे एकमेकांत मिसळून गेले होते जणू. संतोषच्या बहिणी एलानाकडून तऱ्हे तऱ्हेचे ब्रेड्स आणि केक्स शिकून घेत होत्या.

अजितसरांनीच संतोषला सांगितले की गेले चार वर्ष त्याने एकही सुट्टी न घेता काम केले असल्याने महिनाभराची सुट्टी कंपनीने दिली आहे. नव्या कामावर रुजू होण्यापूर्वी त्याने आपल्या मंडळींबरोबर एक महिना काढावा. त्यांनीच संतोषच्या घरच्यांना आणि परदेशी पाहुण्यांना मुंबई दर्शन करवण्याची सोय करून दिली. आपली मोठी गाडी त्यांच्या दिमतीला दिली.

क्रमशः

फिजेट स्पिनर भाग ५ (मेघा कुळकर्णी)

जाणे किती काळ संतोष हातातलं स्पिनर गरगर फिरवत होंडीपकडे बघत बसला होता. दूरवरून गावातून मदर मेरी चापेलमधून सायंप्रार्थनेची घंटा घणघणायला लागल्यावर तो दचकून भानावर आला. विश्वरुपीमातेच्या देवळात आरती होतांना होणारा घंटानाद आठवून गेला त्याला. एक सुस्कारा टाकून घरी जाण्यासाठी तो उठला.

तेवढ्यात त्याच्या खिश्यातला मोबाईल खणखणला. अजितसरांचा कॉल होता.
पलीकडून त्यांनी सांगितलेली आनंदाची बातमी त्याला स्पर्शतच नव्हती. मुजुमदार सरांना दुसरीकडे चांगली पोस्ट मिळाल्याने त्यांनी या कंपनीतली नोकरी सोडली होती. आणि त्यांच्या जागेवर अजित सरांची बढती झाली होती. आणि आपल्या जागेसाठी अजितसरांनी वरिष्ठांना संतोषचे नाव सुचवले होते. ज्युनिअर असूनही त्याची मेहनत, कंपनीसाठी त्याने केलेले प्रयत्न, त्याच्यामुळे कंपनीला झालेला नफा, या सगळ्याचा विचार करता वरून त्या पदासाठी संतोषची निवड केली गेली होती. आता त्याला मुंबईला येता येणार होते. आपल्या आई वडिलांकडे लक्ष देता येणार होते. चार वर्ष घरापासून, आपल्या माणसांपासून दूर असल्याची त्याची खंत त्याने मागच्या वेळीच सरांना बोलून दाखवली होती. पण आज आता त्याला या बातमीने आनंद वाटत नव्हता. डोळ्यांसमोर एलानाचा चेहरा येत होता. तिला कसं सांगणार की त्याला तिला सोडून जावं लागणार होतं.
तो काहीच प्रतिसाद देत नसल्याचं जाणवून सरांनी त्याला काय झालं ते विचारलं. संतोषने घडलेली सगळी हकीकत त्यांना सांगितली. एलानाचा पुत्रवियोग सरांनाही माहीत होता. क्षणभर तेही स्तब्ध झाले. पण जराशाने सावरले. आपण काहीतरी मार्ग काढू याचा भरवसा त्यांनी संतोषला दिला.

दुसऱ्याच दिवशी सकाळी सरांचा ब्रैड-एलानाला फोन आला. संतोषला काही कामासाठी भारतात यावे लागणार आहे आणि त्याच्याबरोबर हे दोघही भारतात आले तर त्यांच्या व्यवसायाच्या दृष्टीने काही बोलणी करता येतील असे त्यांनी सांगितले. त्या निमित्ताने अजितसरांना त्यांचा पाहुणचारही करता येईल अशी पुस्ती जोडून आग्रहाचे निमंत्रण त्यांनी दिले. दोघांनी विचार विनिमय केला. एखादा महिना त्यांच्या सहकार्यांवर फार्महाउस सोडून जाणे शक्य होते. सगळी व्यवस्था लागलेली होतीच. जरा पाळीव प्राण्यांकडेच रोज बघावं लागणार होतं. पण त्यांच्या फार्मवरच्या मंडळींनी सगळं व्यवस्थित सांभाळण्याचं कबुल केलं.
संतोषने निघतांना भावूक होऊन ब्राऊनीचा, मोन्ट्टीचा निरोप घेतला. परत त्यांची कधी भेट होते की नाही तेही त्याला माहीत नव्हते.

एका बाजूला मांजरा, आई विश्वरूपी, हडकुळी तपकिरी गाय, तांबड्या कोंबडा, त्याच्या मागे धावणाऱ्या काळी आणि पांढरी नावाच्या कोंबड्या आणि आतड्याच्या मायेची माणसं. दुसरीकडे होंडीप, मदर मेरी, ब्राऊनी, मोन्ट्टी, आणि जीवलग होऊन बसलेले हे दोघ. तिसऱ्या बाजूला तो स्वतः आणि या सर्वांना गती देणारे अजितसर अक्षावर..मध्यभागी... फिजेट स्पिनर गरगरत होतं.

क्रमशः

फिजेट स्पिनर भाग ४ (प्रणव जतकर)

संतोषच्या यशाचा आनंद फ़क्त एकाच माणसाला नीट घेता येत नव्हता... अजित सर...!! मुजूमदार साहेबांनी किती कमी पैश्यात भोळ्या संतोषला गटवलं आहे हे फ़क्त त्यांनाच कळत होतं. पण कंपनी पॉलिसीमुळे बोलताही येत नव्हतं. संतोष परदेशात असला तरी अँमस्ट्रडॅमसपासून कित्येक मैल एका फ़ार्महाऊसवर राहणार होता आणि तिथे जेमतेम भागेल येवढेच पैसे मिळणार हे त्यांना माहित होतं. पैसे द्यावे लागले तरी निदान त्याची काळजी नीट घेतली जावी म्हणून पंधरा वर्षांपूर्वी अजित सर स्वत: राहात असलेल्या ब्रॅड आणि ऍलानाच्या फ़ार्मवर त्याची नेमणूक व्हावी येवढंच त्यांच्या हातात होतं आणि त्यांनी ते संतोषसाठी केलं...!!

ब्रॅड आणि ऍलाना.. साठी ओलांडून गेलेलं डच दांपत्य. उदरनिर्वाहासाठी फ़ुलशेती करणारे. युरोपात फ़ुलांना भाव जास्त मिळत असला तरी तिथल्या जीवघेण्या स्पर्धेला कंटाळून दूसरा मार्ग शोधत असतानाच अजित सरांसारखा सत्पुरुष त्यांना भेटला आणि त्यांच्या समस्येवर तोडगा निघाला. थोड्याफ़ार कमी भावात पण खात्रीशीर एक्सपोर्ट बिझनेस सेट करायला अजित सरांनी त्यांना खूप मदत केली. शहरापासून दूर फ़ार्महाऊसवर राहून कुत्र्या-मांजराला आणि अगदी त्यांच्या लाडक्या घोड्यालाही लेकरासारखा जीव लावणारे ब्रॅड-ऍलाना. आणि त्यांना मुलंबाळं..!? होतं ना... एक मुलगा होता. सरकारच्या नियमानुसार दोन वर्षे मिलिटरीमध्ये सर्विस करत होता. अचानक अफ़गाणिस्तानला नेमणूक झाली. युनिफॉर्मात तिकडे गेला आणि येताना झेंड्यात गुंडाळूनच परत आला. म्हातार्याला आधी पोराचा अभिमान होताच... तो आता अजूनच वाढला. म्हातारीने मात्र हाय खाल्ली.

संतोषला पहिल्या दिवशी पाहिल्यावर ऍलानाला तिच्या मुलाचाच भास झाला. संतोषही मुळचा लाघवी स्वभावाचा. म्हातारा-म्हातारी बरोबर फ़ार्महाऊसवर मेहनत करावी, फ़ुलांचे वाटे करावेत, अजित सरांना स्टॉकटेक ईमेल पाठवावा, शहराकडून आलेल्या कंटेनरमध्ये वर्गवारी करून कंपनीला एक्सपोर्ट करावा ह्या कामात तो लवकरच माहिर झाला. त्याचा साईटवर असण्याचा कंपनीलाही फ़ायदा होऊ लागला. महिन्याचा सर्व खर्च जाऊन राहिलेले पैसे गावाकडे पाठवून संतोष आपलं तेही कर्तव्य जमेल तसं पार पाडू लागला. पण मुजूमदार सरांनी मारून ठेवलेल्या कमी पगाराच्या पाचरीमुळे बापाचे काही लाख भरून काढायला त्याला अजून काही वर्ष असंच राहावं लागणार होतं. संतोषची पैश्याने आणि ऍलानाची लेकराच्या मायेची गरज भागत असतानाच ब्रॅडच्या डोक्यात आलार्म वाजला. संतोष आज आहे पण त्याचं काम झालं की म्हातारा-म्हातारीला सोडून तो परत जाणार... पुन्हा एकदा पुत्रविरहाचं दुख: आपल्या हळव्या बायकोला सहन करावं लागणार हे जाणून ब्रॅडने वेळीच संतोषला बाजूला केलं पाहिजे हे ताडलं.

एका संध्याकाळी फ़ार्मवरचं काम झाल्यानंतर ऍलाना नेहमीप्रमाणे ब्रेड बेक करायला गेली आहे असं बघून त्याने संतोषलला बोलावलं.. सगळं प्रेमळ भाषेत समजावून सांगितलं आणि जड अंत:करणाने थरथरत्या आवाजात निर्वाणीचं बोलला... ’इफ़ यु वोंट टू लिव अस देन लिव बिफ़ोर इट्स टू लेट’... ऍलानाने ख्रिसमसला गिफ़्ट म्हणून दिलेला फ़िजेट स्पिनर हातात घेऊन संतोष सुन्न अवस्थेत होन्डिप नदीच्या काठावर बसला होता. *हातात भिरभिरणारं फ़िजेट स्पिनर जणू त्याच्या मनाचं प्रतिक होतं... एक बाजू होती गावाकडे असलेल्या गरीब कुटूंबाची आर्थिक गरज... दुसरी बाजू होती त्याच्यावर आईसारखं प्रेम करणारी पण त्याच्यात गुंतत जाणारी ऍलाना... आणि तिसरी बाजू होती प्रोफ़ेशनल लेव्हलला जॉबविषयी असलेली बांधिलकी... मधल्या मध्ये अडकलेला संतोष... फ़िजेट स्पिनरचा अक्ष...!!

क्रमशः

फिजेट स्पिनर भाग ३ (प्रणव जतकर)

बापाचे उरले-सुरले पैसे आणि मळ्यातली फ़ुलं घेऊन संतोष पुन्हा तालुक्याच्या बाजारात उभा राहिला. झेंडू आणि शेवंतीच्या ढिगांमध्ये त्याची ती इंपोर्टेड फ़ुलंच गावठी दिसत होती. पाण्याखाली धरलेला श्वास गुदमरत असतानाच देवदूत दिसावा तसे अजित सर मोठ्या आश्चर्यकारक मुद्रेनं त्याच्याकडे येताना दिसले. शहराकडचा माणूस आपल्याकडे येतोय, थोडी तरी फ़ुलं विकली जातील अश्या आशेने संतोष थोडा सरसावून उभा राहिला. अजित सर त्याच्या जवळ येऊन मोठ्या आनंदाने विचारु लागले... "अश्या छोट्याश्या गावच्या बाजारात बटर कप आणि फ्लॉवर कप? कुठून आणलेस रे ही फ़ुलं?" आपल्या कष्टांचा कुणी जाणकार भेटल्याचं बघून परमुलुखात आपली भाषा कळणारं कुणीतरी भेटल्याचं समाधान संतोषला झालं. तो अगदी उत्साहाने मनापासून त्याला असलेली माहिती अजित सरांना सांगू लागला.

संतोषचं त्या फ़ुलांविषयीचं नॉलेज बघून आणि घरची सगळी परिस्थिती ऐकल्यावर तात्काळ अजित सरांनी त्याला मुंबईला नोकरीला येतोस का विचारलं. अजित सर एका फ़ुलांच्या इंपोर्ट-एक्स्पोर्ट करणार्या कंपनीत काम करत होते. अजित सरांच्या प्रश्नाने संतोष खरं तर भांबावलाच. एक पिवळ्या रंगाचा ट्यूलिप त्यांना भेट देऊन वडिलांना विचारून सांगतो असं सांगून त्यांने त्यांचा निरोप घेतला. अपेक्षेप्रमाणे तोट्याचा चेहरा घेऊन तो घरी आला खरा पण आता त्याच्या डोक्यात वेगळीच चक्रं फ़िरत होती. नाहीतरी आपल्याला घरच्या शेतीचं म्हणावं तसं ज्ञान नाहीच... आपल्याला कळतं ते इथे वळत नाही... बापाचे घालवलेले पैसे परत द्यायचे तर ती पाच एकर कोरडवाहू काही कामाची नाही. त्यात पाच जणांची तोंडं भरायचीसुद्धा ताकद नाहीये. शहराकडे नोकरी केली तर काही तरी पैसे परत फ़ेडता येतील... बास आता मुंबईच...!!

अजित सरांनी जाताना दिलेल्या कार्डावरच्या नंबरवर फ़ोन करून पुढच्याच महिन्यात संतोष मुंबईला ग्लोबल ऍग्रीटेक इंडियामध्ये रुजु झालादेखील. हताश झालेल्या बापाचा निरोप घेणं काही फ़ार अवघड नव्हतं.. पण पुन्हा आशा पल्लवीत झालेल्या आईने एकदा त्याला गावच्या विश्वरुपी देवीच्या देवळात नेऊन, देवीची खणा-नारळानं ओटी भरुन, मगच एसटीकडे सोडलं. फ़ुलांसाठी एकदोन वेळा मुंबईला येऊन गेल्यामुळे संतोषला नवीन शहरात जम बसवणं फ़ार अवघड गेलं नाही. थोड्याच कालावधीमध्ये त्याने अजित सरांची पारख किती अचूक आहे हे कंपनीचे उच्च अधिकारी मुजूमदार साहेबांना पटवून दिलं. ह्याचाच परिणाम म्हणून की काय मुजूमदार साहेबांनी आपल्या नेदरलँडच्या सप्लायरच्या फ़ार्मवर कंपनीचा रिप्रेझेंटेटीव म्हणून संतोषची निवड केली. ’तुला कंपनी परदेशात पाठवणार आहे’ हे सांगितल्यावर संतोष इतका एक्साईट झाला की त्या दिवशी त्याला रात्री झोपच आली नाही.

छोट्याश्या गावातून आलेल्या संतोषकडे जेमतेम गाडीचं लायसन्स होतं. पासपोर्ट त्याच्या घराण्यात कुणाकडे नव्हता. कंपनीने सगळा खर्च करून एका एजंटतर्फ़े पासपोर्ट, नेदरलँड्सचा व्हिसा, विमानाचं तिकीट सगळं करुन दिलं. परदेशी जाण्याआधी संतोष एकदा गावाकडे आपल्या आई-बापाला भेटायला गेला. गेल्या काही महिन्यांपासून थोडे पैसे घरी पाठवल्यामुळे बापाचा त्याच्यावरचा राग थोडा कमी झाला होता. आईला कौतुक वाटत असलं तरी शहाराकडे राहून रोडावलेल्या आपल्या लेकराकडे ती काळजीने बघत असे. खाटेवरची म्हातारी खंगल्याने पुर्वीसारखी बेंबीच्या देठापासून खोकत नव्हती. दोघी बहिणी आता शाळेच्या शेवटच्या वर्षाला होत्या. परदेशात जाणारं आपल्या घरातलं पहिलंच म्हणून सगळ्यांच्या चेहर्यावर उत्सुकता... आनंद... काळजी आणि अभिमान आलटून-पालटून येत होता. ह्या मेहनती आणि प्रामाणिक मुलाच्या कष्टाचं चीज होणार हे बघून घरच्यांबरोबर कंपनीचं सगळं डिपार्टमेंट आनंदी झालं. पण ह्या गोष्टीचा आनंद फ़क्त एकाच माणसाला नीट घेता येत नव्हता... अजित सर...!!

क्रमश:

माझ्या ब्लॉगची जन्मकथा

नारळ फुटी

बर्याच दिवसांपासुन काहीतरी लिखाण करावं असं मनापासुन वाटत होतं. कधी विषय सुचायचे पण शब्दांत उतरवायला वेळ नसायचा. कधी वेळ मिळालाच तर काय लिहाव...